माणसांच जगण व वागण सृष्टीच्या पटलावरती कोरलेलं असतं ते कागदावर उतरवून त्याची अनुभूती वाचकाला मिळते...ते साहित्य
Thursday, December 19, 2019
Tuesday, December 10, 2019
“शेवटची रक्ताळलेली जिलबी”
त्या वक्ताला लय
वंगाळ घडलं. आमच्या गवचा धनाप्पा लय भला माणूस पण परिस्थितीन गांजला. लेकाला आन
सुनाला घिऊन कारखाना करत व्हता. धनाप्पान जल्मभर कारखाना केल्याला. त्यातूनच त्यान
तीन पोरीची लग्न करून दिल्याली. शेवटचा पोरगा व्हता. त्याच बी लगीन झाल्याल.
त्याला तीन वरसाच एक पोरग हाय. त्याच नाव प्रविण ठिवल्याल पन लाडान त्याला प-या
म्हणायची. लेकाच लगीन झाल्यापासून ऊस
तोडायच बंद केलं व्हत. पण धनाप्पाच्या बायूकच्या पोटाच आपरेशन झालं. त्याला लय
खर्च आला. दवाखान्यासाठी कर्ज घेतलं. ते फॆडण्यासाठी उतारत्या वयात लेकाला आन
सुनाला संग घिऊन ऊस तोडायला गाडी लावली.
दररोजच्या प्रमान
त्या दिसीबी लवकर उठून फडात गेली. धनाप्पाला वयामुळं काम व्हत नव्हतं पण बळचं
आंगात ऊसन आवसान आनून काम करत व्हतं. त्या दिशी बायकून लेकाला आन सुनाला आवडतय
म्हनून वांग्याच भरीत करून चिरगुटात भाकरी बांदून दिल्या. नातासाठी दूध गरम करून
बाटलीत भरून दिल्यालं. फडात आल्या आल्या धनाप्पान चांगली पात धरून ऊस तोडायला सुरू
केलं. लेक बी तोडू लागत व्हता. दोघानी भराभरा गाडीभर ऊस तोडला. पाठीमागून सुन
मोळ्या बांधत व्हती. आन ऊसाच वाड्याच भेळ बाजूला काडून ठिवीत व्हती. ऊस तोडून झाला
की सारीजन राहिल्याल्या मोळ्या बांधायची. मोळ्या बांधून झाल्यावर सुनबाई तान्या
प-याला घिऊन आडूसा बघून पाजू लागली. सासून दिलेल दूध बी प-याला पाजलं. तवर बाप
लेकांनी ऊसाची गाडी भरली. दिस आता टक-यावर आला व्हता. जेवायला गाडीतच घिऊ असं
म्हणून गाडी हाणायला सुरू केलं. धनप्पाचा लेक म्होरल्या तोडांला बसून ऊसान
भरल्याली गाडी हाकाया लागला. फडातून गाडी रस्त्याला लागली की सुनबाईन चिरगुटातील
भाक-या सोडल्या. आज सासून वांग्याच भरीत दिलं व्हतं. लय आप्रूप वाटाया लागलं
म्हणून म्हनाली,
“ आव आज बघा तुमच्या
मायन तुम्हांला आवडतय म्हणून वांग्याच भरीत दिलय”
“ तुला नाय काय आवडत?
औ,,,,”
“मला आवडतय पन
तुमच्या एवढ नाय, पन जाऊ द्या मायचा लयच जिव हाय बघा तुमच्यावर”
“ आग किती केलं तरी
माय हाय ती माझी”
असं बोलत बोलत तिन सा-यांस्नी भाकरी आन
त्याच्या वर वांग्याच भरित दिलं. धनाप्पा गाडीच्या मागच्या बाजूला बसून हातावर
भाकर घिऊन येना-या जाना-या वाहानाकडं बघून घास तोंडात कोंबत व्हता. लेकांन बी
खायाला सुरू केलं. जर गाडी पळाया लागली तर मध्येच बैलाला दापायचा आन यसन वडायचा. असं
करता करता गाडी आता गावाच्या कडाला आली. कोप-यावरच हाटेल बगून लगेच बारक्या प-यान
आई कडं बघत,
“आयंव मला दिलबी (जिलेबी)
खायचीय”
“ कुथं दिसतीय माझ्या
सोन्याला”
हात त्या हाटेलाकडं करत
“तोक त्या कोपल्यावल”
जस गाडी कोपरा वलांडून पुढ
चालली तसं प-या मोठ्यान वरडाया लागला. आई त्याला गप बसवित व्हती पण तो काय गप बसत
नव्हता. आता मातर तो पाय खोडून खोडून रडायाला लागला.
“आयव.......... SSSSSSS..आयवSSSSS, मला दिलबी खायचीय”
“आपून पुन्हा घिऊ, आज ऊशील
झालाय”
“नाय मला आजच, घ्यायचीय”
हा आवाज ऎकून प-याच्या
बापान झपकन एक रटा मारला तसा प-या जोरात रडाया लागला. हे बघून धनाप्पाला काय
राहवलं नाय.
“आर लेकराला मारत असत्यात
व्ह्य? त्या मोहरल्या कोप-यावर गाडी थांबव”
“आव सारख लेकराच लाड पुरवून
वौताग आलाय नुसता? नाय खाल्ली जिलबी एकांद्यादिसी म्हंजी काय मरतय काय ?”
“आर बट्या तसं नसतय,
लेकराचा नाद असतोय, थांबव गाडी म्या घिऊन येतो, माझ्याकड हायती इसीक रुपये”
मग हाटेला म्होरं
गाडी थांबवली. धनाप्पा खाली उतरलं आन पावशेर जिलबी घिऊन आलं. गाडीवर चडताच
नातवाच्या हातात पुढा दिला. लगेच प-यान पुढा सोडला आन जिलबीचा एक येडा घिऊन,
“आय... तू खा.. धल.. ह्यो
चांगला हाय. धल.. धल की”
“बाबा तुला धल.. ह्यो मोता
येला हाय, घे”
“आन हे अप्पाला... आप्पा
धल्ला तुम्हाला”
प-यानं सा-यास्नी एक एक
येडा दिला अन त्यान एक हातात घेतला. खात खात आई कड बघत..
“अप्पाच चांगल हायती”
“आम्ही बी चांगल हाव कीर..
तू बी हाय, पन बाबा थोलाच चांगला हाय”
“ आजून खा”
“ नाय, लाहूदी सांच्याला
खायाला, आता बास मला”
नातान दिलेला येडा
तोडांत घातला आन धनाप्पा आतल्या आत हसतबी आन रडतबी व्हता. आता गाडी कारखान्याच्या
जवळ आली व्हती. पुल वलांडला की कारखानाच व्हता. पण पुलाच्या आगुदर मोठ वळण व्हतं.
त्याला उतार बी व्हता. नेमक त्या वळणावर गाडी आली आन मागून ऊसान भरलेला टरक आला.
पुढच्या बाजून काही वाहन व्हती. चार पाच ऊसाच्या गाड्या म्होर चालत व्हत्या. मागून
आल्याला टरक वेगात व्हता. पुढून आल्याल्या वाहानाला धडक बसलं म्हनून टरकवाल्यान
टरक डाव्या बाजूला वळवली तशी धनाप्पाच्य़ा गाडीला धडक बसली. गाडी जाग्यावर पलटी
झाली. पुढच्या दोन तीन गाड्या बी आदाळल्या. पण धनाप्पाच्या गाडी मातर दहा मिटर तरी
घसरत गेली. बैलांनी मातर मोठ्य़ान डरकाळी फोड्ली. टाहोफोडून माणसं रडतात तसं दोन्ही
बैलं मार लागल्या लागल्या वरडली. बैलाला बी लय मार लागला. लेक आन सुन टरकाच्या
मागच्या चाकाखाली सापडली. आन चेद्यामेंध्या झाली. धनाप्पाच्या पायावरून ऊसाची गाडी
गेली. दोन्ही पायच तुकड पडलं. नातू मातर लांब जाऊन पडला व्हता. त्याच्या हाता
जिलेबीचा येडा तसाच व्हता. त्याच्या लेकाच्या तोंडात जिलेबी व्हती. सुनाचा हात
खरकटाच व्हता. उरलेली भाकर आन जिलेबीच तुकडं रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेलं व्हतं. अपघात
झाल्या झाल्या कुनालाच काय सुधराना. बाकीच्या ऊसतोड गाडीवानानी गाड्या बाजूला
घेतल्या. धनाप्पाला बाहेर काढायाला धावून आली. तवर पोलीस आले. टरक ड्रायव्हरला
पकडलं पण त्याच बी पायं मोडलं व्हतं. धनाप्पाला आन त्याच्या लेका सुनाला नातासोबत
दवाखान्यात नेहलं. दोन चार दिसांन धनाप्पा सुद्धीवर आल्यावर कळंल की लेक आन सुन
जाग्यावरच मेली. नातू जिवंत हाय. पण मुका मार लागला व्हता. धनाप्पाच पाय तर मोडला
व्हताच शिवाय मनक्याला मार लागला व्हता. मनक्यातली नस तुटल्यामुळं तो कवाच जोडला
जावू शकनार नव्हता. कोन सांगायच पुण्याच्या नायतर मुंबईच्या दवाखान्यात जोडला
जातोय पण तो पाच सहा लाख रूपयेचा खर्च कोन
करणार? कुठून आननार एवढा पैसा.? पहिलचं बायकूच्या दवाखान्याच कर्ज फॆडता फॆडता
नाकी नव आलं व्हतं. आन आता हे वाढून
ठेवल्यालं. नातू मातर शुद्दीवर आला व्हता. हातपायानी धडधाकट व्हता. धनाप्पाला
त्याचच कौतुक वाटायचं. एवढ्या मोठ्या आपघातातून लेकरू वाचलय. म्हणतात ना देव तारी
त्याला कोन मारी. तवा पासून धनाप्पा गावातच पांगूळ गाड्यावरून दोन शेरडं हातात
धरून ५५ वर्षाच्या बायकूच्या आधारावर नातवासाठी जिव मुठित धरून जगतोय. स्वता:च्या जिवापरिस नाताला जपतोय. नातानं कवा जिलबी
मागितली तर धन्नाप्पा आतल्या आत रडतोय. पण जिलबी खायचं नाव घेत नाय.
हा प्रसंग यसन या कादंबरीतील आहे.
Subscribe to:
Comments (Atom)
सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड
या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...
Popular Posts
-
शांताराम गंगावणे बी.ए. बीएड असून ऊस तोडत व्हतं. त्यान्ला सारी पावनं म्हणायची. १९९८ साली पावण्याला लोणावळ्या जवळच्या एका माध्यमि...
-
“पाहाटेचा गार वारा, मंद प्रकाश, हळू हळू लालसर, व नंतर तांबूस होत जाणारा सूर्य जो एखाद्या नदी किनारी वर येताना पाहताना मन प्रसन्...
-
संध्याकाळची पाचची वेळ होती. ऑफिस मधून सुटायला मनिषला अजून एक तास बाकी होता. पण मनिषच्या बायकोच्या त्याला सारखे फोन येत होते. आलेला...
