नुकतीचं वाचनात आलेली कादंबरी “अवकाळी
पावसाच्या दरम्यानची गोष्ट”
लोकवाड:मय गृह प्रकाशित व आनंद विंगकर लिखित कादंबरीने गेली दोन दिवस
झालं अस्वथ केलंय आणि विचार करण्यास भाग पाडलय. कारण एखादा माणूस ज्यावेळी
आत्महत्या करतो त्यावेळी तो फक्त माणूस मरत नाही तर संपूर्ण कुंटूब उधवस्त होतय.
नव-याच्या डोक्यात हा विचार आला तर तो बायकोला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडतो,
बायको लाहान मुलांना भाग पाडते. का बरं असं होतं असेल? त्यावेळी त्यांना कोणताच
जगण्यासाठी आशेचा किरण मिळत नाही का? गावातील, भावकीतील कोणीच कसं त्यावेळी
आधाराला धावून येत नाही. मानसिकता एवढी कशी खचते. एकट्या शेतक-याने आत्महत्या करण वेगळ
पण सामुहिक आत्महत्या करण म्हणजे ज्याच्या डोक्यात पहिल्यांदा नकारात्मक विचार आला
तो व्यक्ती इतर व्यक्तीनां आत्महत्या करण्यास भाग पाडतोय याचा अर्थ दिवसेंदिवस
नकारात्मक विचारांचे प्राबल्य वाढलेलं आहे. कौटुंबीक, सामाजिक नकारात्मकता मोठ्या
प्रमाणात वाढली आहे. त्यावेळी ओळखीच्या लोकांची मानसिकता काय असते? नातेवाईक कसे
वागतात? गावातील इतर माणसं त्या कुटंबाशी कसं वागतात? आत्महत्या केल्यावर तरी या
लोकांची मानसिकता बदलते का? तर.. नाही. हेच या कादंबरीत रेखाटलय.
ज्वारी व शाळू काढण्याचे दिवस आहेत. कथेचा
नायक यशानाना आपल्या बायको – मुलासह रानात शाळू काढत असतो. अचानक त्या रात्री आभाळ
गर्जत आणि अवकाळी पाऊस येण्याचं चिन्हं दिसतं. त्या अवकाळी पावसामुळे कोणी
आत्महत्या करतो का? तर वरवर पाहाता कोणीही नही म्हणेल पण ज्याचे आयुष्याच त्या
पिकावर आहे आणि ते पिकचं आता पाऊसाच्या पाण्यात वाहून जाणार म्हटल्यावर तो माणूस
खचतो तसं यशानाना खचला. कारण घर चालवण्यासाठी घेतलेलं सावकाराचं देणं, पतसंस्थेच
कर्ज आणि सातत्याने त्यांना येणार अपयश त्यामुळे त्यांना जगावास वाटत नाही. अजून
एक महत्वाचा सामाजिक घटक म्हणजे त्यांना मुलगा पाहिजे असतो पण तीनही मुलीच असतात.
त्यामुळे यशानाना बायकोवर सारखा चिडायचा व ओरडायचा. त्याच्यातून त्यांच्यात वादावादी
व्हायची. त्यातूनच त्यांना नैराश्य येत. पण ते दु:ख पचवूनही संसार करत असतो. मात्र
एका टप्प्यावर त्याला हे सारं असाह्य होतं. मुलीनां शिकवतो. थोरली उषा धाडसाने
शेतातील काम करत माहाविद्यालयीन शिक्षण घेते. मधवी आशा आणि धाकली नकुशी. नको
असताना झाली म्हणून तीला नकुशी म्हणायची. हे सारं कुटुंब यशानाना आणि पार्वती मिळेल
त्या कामावर, शेतातील मजुरीवर चालवत असतात. मग अचानक का बरं हे सारं कोलमडत. तर ते
अचानक नाही. हे हळूहळू सुरू झालं. पत्येक टप्प्यावरं ते वाढतच गेलं. कधीच त्यांच्या
मनासारखं घडलं नाही. त्यांनी त्याच्या नौकरी असणा-या भावाकडं अपेक्षा केली पण मदत
नाही मिळाली. गावातील लोकांना मदत मागितली पण नाही मिळाली. शेतीतून उत्पन्न मिळाल
नाही. कधी पिक चांगल यायच पण काहीतरी नैसर्गिक अपत्ती यायची आणि नुकसान व्हायचं.
वंशाला मुलगा नाही याची खंत. बायकोबरोबर होणारी भांडण. घर चालवण्यासाठी घेतलेले
सावकाराचे कर्ज जे दिवसेंदिवस वाढतच गेले. ते फेडता आले नाही म्हणून सावकाराने जमीन
मागितली. त्याचा त्रास यशनानाला झाला. मग मात्र त्याला वाटलं की जगण आता शक्य
नाही. म्हणून त्याने मृत्यू जवळचा केला. बायकोनेही नव-याचा शब्द प्रमाण मानला आणि
दोघांही विष घेतलं.
या सा-या अडचणीच्या काळात कोणत्यातरी
टप्प्यावर जर गावातील कोणीही पाठीशी उभा राहिलं असतं आणि धिर दिला असता तर यशनानांन
आत्महत्या केली नसती. आज कित्येक यशानाना आणि पार्वतीबाई आधार नाही म्हणून
आत्महत्या करतात. कारण आज गावातील निर्मळ मनाची, प्रमाणिक, दुस-यांना आधार देणारी
जाणकार पिढीचं संपुष्टात आलीय. जे आहेत त्यांना आजची गावव्यवस्था विचारात घेत
नाही. अगदी बोटावर मोजण्याएवढे प्रमाणिक गावकरी शिल्लक आहेत. ते या व्यवस्थेच्या
बाहेर फेकले आहेत. एकटे पडलेत. गावात धुमाकूळ आहे तो स्वार्थी राजकारणी, सावकार,
काही नौकरदार आणि ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांचा. हा एक गट तयार झाला आहे. त्यामुळे कष्टकरी लोकांना नैतिकतेने आधार देणारी
गावव्यवस्था दिसेनासी झालीय. एवढ्यातही गावातील नवबौध्द जे आजही गरीब आहेत तेच
मराठा व इतर जातीतील गरीबांना मदत करतात म्हणजे जात विसरून मदतीस येणारा हा वर्ग
आर्थिक विवेचनातील आहे. आणि दुस-या बाजूला सर्व जातीतील श्रीमंत एका बाजूला येत
आहेत आणि तेच गावावर राज्य करत आहेत. पण त्यात सर्वांगीन विकासाला आणि माणसाला
मानसिक आधार देणा-या मूल्यांना महत्व नाही. यातून आहिरे आणि नाहिरे वर्गाचा उदय आज
गावव्यवस्थेत बघायला मिळतोय. त्यामुळे अशा आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. याच
आठवड्यात जालना जिल्ह्यात तीन मुलीसह आईने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली.
तिच्या नव-या ने काही महिन्यांनपूर्वच आत्महत्या केली होती. परवाच्या दिवशी
बार्शीत एका कुटंबाने दोनमुलांसह विष घेवून आयुष्य संपवलय. कुठे चाललीय आपली मानवी
व्यवस्था कोणी सांगेल का?
कादंबरीत पुढे यशानानाच्या मृत्यू नंतर त्या तीन
मुलीच काय होत? कोण आधाराला धावून येत.? उषा ही थोरली ,त्यामुळे सारी जबाबदारी
तिच्यावर येते.. ती सावरण्याचा प्रयत्न करते पण तरीही गावातील नाठाळ लोकांच्या
नजरा त्यां तिघी बहिणीना जगू देतील का? हे सारं आपणाला कादंबरीत सापडेल. उषा ही
आर्मीतील सुभाष नावाच्या कानाड्याच्या मुलावर प्रेम करतेय. ते लाहनपणापासूनचे
दोस्त आहेत. ती त्याच्याबरोबर पूळ्न जाणार असतेय आणि त्याच दिवशी अवकाळी पाऊस
येतो. आणि घरी आई वडिल विष पेतात. आईला दवाखान्यात नेहलं जात. तिथ हा सुभाष मदतीला
धावून जातो. गावातील आणि भावकीतिल एकच माणूस असतो. तिथली बिल हा सुभाष देतो. पण
पार्वती काही वाचत नाही. तिच प्रेत मिळेपर्यंत गावकरी पोहचतात आणि त्यांची चर्चा
सुरू होते की पोरगी पळून जाणार म्हणून आईने विष घेतलय. गावात उषावरच आरोप होतात. पण
शेवटी उषाच स्वात:ला धीर देऊन लहान बहिनीना आधार देते. उषाचे चुलते गेल्यावर त्या
घरात त्या तिघी राहातात. त्यावेळी मात्र त्यांची काय अवस्था होते ह्याची कल्पना न
केलेली बरी. ज्या घरात काल पर्यंत आई-वडिलां सोबत राहेचे आणि आज तेच घरात नाहीत.
त्यावेळी त्या चिमुकल्या मुलीची काय स्थिती झाली असेल. पुढं जगण्याचा त्यांना धिर
मिळेल का? का त्यांनाही वाटेल आपण संपवून द्याव आयुष्य.. हे येणारा काळच सांगेल.
आनंद
विंगकर यांनी आत्महत्या घडण्यापूर्वीचं आणि घडल्या नंतरचं कुटंबातील व त्यांच्या
अवतीभवतीच वातावरण जे मांडलय ते अस्वस्थ करतयं.
