मित्रहो, नमस्कार, आज
सकाळी एक अनोळखी नंबरहुन फोन अला. आणि बोलाया लागले, “हॅलो, ज्ञानेश्वर जाधवर
तुम्हीच का?” मी “हो” म्हणंल आन ते ढसा ढसा रडाया लागले..मी विचारतोय काय झालयं ?
ते हुंदके देत बोलतात “मी एका बीड जिल्ह्यातील माध्यमीक विनाअनुदानित शाळेतील
शिक्षक हाय, गेल्या १० वर्षापासून फुकट नौकरी करतोय, दररोज आतल्या आत कुढतोय,
कुणाला दु:ख सांगावा हे कळतच नाय, बायकोच बी डीएड हाय आन ती क्लास वर शिकवतीय”. मी
पुढं विचारल, नेमक झालं काय? ते म्हणाले “तुमची यसन कादंबरी वाचली, त्याततील
कादंबरीच्या उत्तराधार्तील पावण्याची गोष्ट मला माझीच वाटू लागली आन पाच सहा वेळा पुस्तका कडे बघत एकटाच आतल्या आत
रडत होतो, यसन कादंबरीनं माझ्या दबलेल्या भावनेला वाट करून दिली” .. हे ऎकून माझ्याही
डोळ्यात आश्रू आले.. फोनवरच्या आवाजाला बांध फुटला होता.. “मी म्हणत होतो आपण नंतर
बोलु पण रडत रडतच फोन कट झाला...
नंतर फोन करून निंवात
बोलेन त्यांच्याशी.. पण जी गोष्ट त्यांनी कादंबरीतील वाचून दडपलेल्या भावनेला वाट
करून दिली ती ही...
पावनं बी.ए. बीएड
असून ऊस तोडत व्हतं. त्यान्ला सारी पावनं म्हणायची. १९९८ साली पावण्याला लोणावळ्या जवळच्या एका
माध्यमिक विनाअनुदानीत शाळेवर शिकवायला घेतलं. पगार मिळत नव्हता म्हनून त्यांनी
लोणवळ्यात सकाळ संध्याकाळ वडापावाची गाडी लावली. सकाळ संध्याकाळ वडापावाची गाडी
चालवायची आन दिसंभर शाळेत शिकवायच. बायको बी होतकरू व्हती. तिचं डि.एड झाल्याल. तीबी
शिलाई मशिन शिकल्याली. कापडं शिवायची. आन संसाराला हात भार लावायची. गावाकडं
पावन्याच म्हातारं आय बाप व्हतं. दोन वरीस आसं करता करता ह्यांच चांगल रूटीन
लागलं. त्याच शाळेवर आजून एक जागा व्हती म्हनून पावन्यानी बायकोला संस्थापकाच्या
हातापाया पडून घ्यायाला लावलं. वीस टक्के अनुदान मिळाल्यामुळं आज ना उद्या फुल
पगार मिळलं ह्या आशेवर संसाराचा गाडा हाकत व्हती. ऊस तोडण्यापरीस बर हाय. चार पैस
कमी का असाना पन उन्हातान्हाचा तरास नाय.
शाळेत दोघालाबी
दहा हजार पगार मिळाया लागल्यावर वडापावाचा गाडा बंद केला. लोणावळ्यातून येऊन जाऊन
करायची. जाण्या-येण्यासाठी जुनी मोटारसायकल घेतली. गावाकडी बी चार पैसं द्यायचा.
बघता बघता दहा वर्ष झाली आन संस्थेला शंभर टक्के आनुदान मिळालं. शिक्षकांना बी फुल
पगार मिळाया लागला. बारा वरीस वाट पाहिल्याच फळं आता मिळालं व्हतं. त्यांचा आनंद
गगणात मावाना. गावाकडं आय-बापासाठी सिमेटच्या दोन खोल्या बांधून दिल्या. ह्यांची लेकर इंग्लिश मिडीयम स्कूल मधी
लोणावळ्यात घातली व्हती. सारं कस आता मनासारख झालंत. पन एके दिशी संस्थापकान
बोलावलं आन पावन्याच्या पायाखालची जमीन सरकली. पावना कावराबावरा झाला. संस्थापकान
सांगितल की रोस्टर बनवलय त्यात ती जागा दुस-या जातीला जातेय. त्याच्यामुळं
दोघांपैकी एकाला नौकरी सोडावी लागलं. नाय व्हय करता करता या तिरगा मिरगीत महिना
गेला. पावना गांगारून गेल्या सारख कराया लागलं. शेवटी संस्थापकान पावन्याला
शाळेतून काढून टाकलं. आन त्यांच्या बायकूला निम्या पगारीवर ठिवलं. त्यांच्या
जाग्यावर संस्थापकाच्या नातेवाईकातील नवीन शिक्षक घेताला. पावना मनान खचला व्हता. पन
दोन सोन्यासारखी लेकर हायती. त्यांच्याकड बघून स्वत:ला सावरत व्हता. म्हणायचा, “हाताच
गेलं काय म्हनून कपाळावरचं नेहील काय कोण?” अस म्हनून त्यांनी परत बंद केलेला
वडापावाचा गाडा सुरू केला. आता मातर दिसंभर वडापाव इकायच. दुस-या कुठल्या तरी
साळातल्या जागा निघल्यात असं त्यांच्या मित्रान सांगितलं तर त्यांन मित्राला श्या
दिवून घराच्या बाहेर लावलं. “आयुष्यात पुन्हा मातर शिक्षक व्हणार नाय. निम्म
आयुष्य गेलंय. ऊस तोडलं, भंग्याचा डब्बा उचलल पन फुकटचा मास्तर व्हनार नाय.
संस्थापक गांडू हायती. आमच्या रक्तावर जगत्यात. आमच शोषण करत्यात. आमच्या कष्टाचा
पैसा खात्याती... मादरचोद साले...” आस म्हणायचा आन राग राग दिसलं ते भांडी फेकून
द्यायचा.
कसंतरी सावरत
वडापावाची गाडी चालवत स्वत:ला धीर देत बायकोच्या येणा-या पगारीवर घर चालत व्हतं. ह्याच्यात
वरीस गेलं. पन त्यांची बायको आतून खचत चालली व्हती. सारखं गेल्या दोन महिन्यापासून
एकटक बघायची. शाळेतून आली की तिला काय काम करतेय तेच कळायच नाय. पावनं इचारायच, “काय
झालय तुला? तू आशी का वागतेयस?” पन त्या काय बोलत नव्हत्या. तीन चार महिन ओलांडलं.
त्यात मातर त्या पार गळून गेल्या. कुनाला सांगावा हेच कळत नव्हतं. परमुलखातून
जगायला इकडं आलाव आन काय पदरात वाडुन ठेवलय. कुनाला बोलाया जावा तर नौकरी जाईल मग
काय करायच? नव-याला सांगाव तर दुसरच काय तरी हुईल. ह्याच्यात त्या बाई पार आतून
पिळवटून गेल्या. शाळेत त्यांच शिकवण्यावर लक्ष लागाना. कवा कवा तर साळा सुट्ल्याली बी कळायच नाय. आश्यात त्यांनी एक
दिशी स्वता:ला संपवलं. शाळेत विज्ञानाच्या प्रयोग शाळेत विष पेऊन आत्महत्या केली.
पावन्याना तर
जगूच नाय अस वाटाया लागलं. सा-या शाळेत चर्चा व्हती की संस्थापकाने जबरदस्तीने
बाईंनवर अत्याचार केला व्हता. अगोदरच नव-याची नौकरी गेल्याली म्ह्णून त्या कुणालाच
बोलल्या नायत. एकदा झालं दोनदा झालं त्यांनी गपचूप सहन केलं. पन पुन्हा पुन्हा हे
सहन व्हतं नव्हतं. चारित्र्य हे सर्वस्व माननारी बाई तेच गेल्यावर काय म्हनून
जगायच. कोणत्या तोंडान समाज्यासमोर उभा राहायच? पावन्यारावळ्यात कसं जायच? नव-याला
काय सांगायच?. लेकराना कस तोंड दाखवायच? आन त्याच्या पेक्षाही कहर म्हंजी
विद्यार्थ्यान समोर आत्मविश्वासनं कंस शिकवायच? या इचाराने त्या बाई गळून गेल्या
आन स्वता: जिवन संपवण्याचा मार्ग जवळचा केला.
संस्थापकाने हे
प्रकरण खूप शितापीने मिटवलं. त्या बाईच्या जाग्यावर दुसरी मॅडम घेतली. आन साळा
सुरू राहिली. पन आमच्या पावन्याच घर उधवस्त झालय. आयुष्य लयाला लागलंय. एवढ हुवून
ही बिचारे पावने दोन निरागस लेकराकड बघत. वडापावाची गाडी लावून शाळेसमोर वडापाव
इकतात आन तुटलेला संसार चालवतात.



