“बुध्द की युध्द ”
असं मांडणारा कवी “जयप्रभू”
गोव्यात गेल्यावर जयप्रभू नावाच्या एक
प्रमाणिक शिक्षकाची ओळख झाली. ओळख झाल्यावर त्यांनी मला त्यांचे दोन कविता संग्रह
दिले ते म्हणजे “लॉग आऊट” व “ठळक नोंदी आणि इतर कविता”. घरी परत आल्यावर रिकाम्या वेळेत
सहज त्यांचा ठळक नोंदी आणि इतर कविता हा संग्रह चाळला आणि आवकच झालो. कारण ज्या
माणसाने अत्यंत शांतपणे आमचा पाहुणचार केला. बोलताना साधेपणा व कमीत कमी शब्दात मत
व्यक्त करणारे जयप्रभू हे कवितेतून सभोवतालच्या एकंदरित परिस्थिती बद्द्ल त्यांचा
अस्वस्थपणा अत्यंत मार्मिकपणे टिपतात.
या कविता संग्रहात ३९ कविता आहेत.
संग्राहाची सुरवात ही “विठ्याची सैर आणि रूक्मिणीचा एकांतवास” या कवितेने होते.
विठ्ठल पसार होतो आणि रूक्मिणी शोधायला जाते. पण लवकर काही विठ्ठल सापडत नाही. मग
शेवटी वैतागून रुक्मिणी परत येते तर विठठल तिच्या अगोदर गाभा-यात असतो. हे प्रतिकात्म
माणसाच जगण आणि जगाच्या शोध घेणं या कवितेतून मनापर्यंत जात. यातील काही कविता थेट
काळजाला भिडतात. ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार भिडणा-या कविता आहेत. ज्यांनी
विनाअनुदानित, खाजगी कॉलेज, व अनुदानितवर तासिकेवर काम केलं आहे किंवा करत आहेत.
त्यांना नक्कीच अस्वस्थ करणारी कविता म्हणजे –
“कवच”
पगार कधी होणार? तिचा
जिवघेणा प्रश्न
आणि हॅंग
झालेल्या कंप्युटरसारखा असतो तिच्या समोर उभा.
मागणी तसा पुरवठा
हे तत्व लागू होत नाही तिच्या आयुष्यात.
तिने केलेल्या
कोणत्याही मागणीचा पुरवठा
पुरा करू शकत
नाही
माझ्या जगण्यातील
पंचेचाळीस मिनिटाचा काटा
तिने
सांगितलेल्या वेळेत.
म्हणूनच तिने
दिलेली वस्तूंची यादी
छेदत जाते माझे
नेटसेटचे कवच आणि
उघडा पडत जातो मी
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी
तिच्या पगाराच्या
प्रश्नाने.
या कविता वाचल्यानंतर
जयप्रभू यांच्या विचारांतील प्राणिकपणा जाणवला. खरं तर हल्ली प्रामाणिक माणसाना
जगण खूप अवघड झालय. त्यावेळी कथा, कविता, नाटक, चित्र, संगीत या सारख्या कलाच आधार
देतात. असचं जयप्रभूंच्या कविता संग्रह वाचल्यावर भासलं. सर्व काही समजतय पण करता
काहीच येत नाही. कारण हाताशी काहीच नाही. अशावेळी मनातल्या मनात कलाकृतीच्या माध्यमातून
मनाचीच समजूत घालत आयुष्य जगणारे असंख्य कलाकार आहेत. खरंतर साहित्यीक आणि
कलाकारांच्या विचारांचा फायदा हा समाजव्यवस्था उत्तम व्हावी आणि टिकून राहावी
याच्यासाठी अपेक्षीत आहे. पण हल्ली तसं होताना दिसत नाही म्हणूनच संवेदनशील व
अस्वस्थ असणारा माणूस तडफडतोय जगण्यासाठी. हे सारं वास्तव या कवितासंग्राहातून
पुढं आलं आहे.
“बुध्द की युध्द” या कवितेतून तर असं जाणवतय की
खरच आम्ही युध्द करणा-या पिढ्या तयार करत आहोत काय? का बरं आम्ही बुध्द मागणारी
माणसं घडवू शकत नाही? आमची शिक्षण व्यवस्था कामचलावू आहे का? कि फक्त संवेदनाहीन
कारखुन तयार करणारी प्रणाली बनलीय? या शिक्षणाने आम्हाला माणूसपणाची मूल्य
शिकवायची सोडून माणसाला उधवस्त करणारी शस्त्रे हाती घ्यायची शिकवलीत. म्हणून
आम्हांला बुध्द नकोय युध्द हवय़ का?. पण युध्दाने पुन्हा एकदा जग नष्ट होईल याचा
विचारही शस्त्रे हाती घेणा-यांच्या लक्षात येत नाही का? जगभर आज युध्द हवय असं
म्हणा-यांची संख्या वाढताना ही कविता डोळ्यात अंजन घालते.
खरंतर सर्वच कविता विचार करायला भाग पाडतात.
संग्राहाच्या शॆवटी “परंपरेचा कासोटा” ही कविता शेवट करते पण तिथून पुढे विचाराला
सुरवात होते . या शेवटच्या ओळी-
“आजही
परंपरेच्या कासोट्याला
लोंबकळत
समरस होऊन
करताहेत, परिवर्तनाची बात”
-
कवी जयप्रभू (गोवा)

Kup chan
ReplyDeleteधन्यवाद
Deleteशिक्षण घेऊन जीवन जगत असताना जीवनात येणाऱ्या अडचणी काय असतात त्याचा ऊहापोह या लेखात दिसून येतो
ReplyDeleteअगदी खरं आहे.. कारण शिक्षण घेताना आणि घेतल्यावरही अनेक अडचणी तशाच राहतात.. त्या सुटायला पाहिजे. पण सुटत नाहीत हेच आमंच दुर्देव आहे.
Deleteशिक्षण घेऊन जीवन जगत असताना जीवनात येणाऱ्या अडचणी काय असतात त्याचा ऊहापोह या लेखात दिसून येतो
ReplyDelete