Saturday, June 6, 2020

“ती” नाही म्हणली म्हणून…..



     सुगंधाच्या लग्नाला जुलैला एक वर्ष पूर्ण होणार होतं. तीचा संसार सुखात सुरू आहे असंच चित्र सर्वांना दिसत होतं. सुगंधा लग्नानंतरच गावात राहाण्यासाठी आली होती. औरंगाबाद सारख्या शहरात जन्मापासून पदवीचं शिक्षण होईपर्यंत राहिलेली होती. पदवीचं शेवटचं वर्ष संपल आणि नात्यातील अविनाश पाटील सोबत वडिलांनी लग्न लावून दिलं. शहरात राहिल्यामुळे शहरी मध्यमवर्गीय विचार होता. महाविद्यालयीन शिक्षणामुळे पारंपारीक पध्दती तेवढ्या अंगवळनी पडल्या नव्हत्या. गावाकडे आई-वडिलांचे नातेवाईक होते पण त्यांच्याकडे नेहमी जाण नव्हतं. केंव्हातरीच दिवाळी किंवा उन्हाळी सुट्टीला तीला जाण्याचा योग यायचा. पण सात-आठ दिवसात जेवढं गाव कळला तेवढाचं तीच्या सोबत होता.

    सुगंधाच्या आईनेही कधी तीला जबरदस्ती केली नाही की तू हेच कर आणि अशीच राहा, तशीच रहा. जरी आई पारंपारिक चाली-रीती पाळत होती तरी.. पण वडिल नेहमी सांगायचे, “मुलीच्या जातीने नेहमी घरातील काम शिकलं पाहिजे. घरातील चाली- रीती शिकून घेतल्या पाहिजे म्हणजे लग्नानंतर त्याचा त्रास होत नाही. नाहीतर सासु-सासरे आणि नवरा यांच्याकडून सतत ऎकावं लागत की हे कर आणि ते करं. तुझ्या आई-वडिलांनी हेच शिकवलं का? तुला काही परंपराच माहित नाही. त्याच्यापेक्षा सर्व गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. सासरच्या कोणाला नाही म्हणायचं नाही. त्यावर सुगंधा म्हणायची, “मी लग्न करून कधीच गावाकडे जाणार नाही.  शहरातीलच नवरा करणार आहे. एवढी पदवी झाली की मलाही नौकरी लागेल. मग मी कशाला गावाकडे जाऊ आणि गावातील परंपरा शिकू?” त्यावर वडिल म्हणायचे, “बाळा, तू गावात राहा नाहीतर शहरात? तुला या हिंदू संस्कृतीतील रितीरिवाज पाळावेच लागतात. तू आता शिक्षण घेतलस म्हणून असं बोलतेस.. पण माझ्याकडे बघ. मी ही सुरवातील असाचं म्हणून गाव सोडलं. आता शहरात स्थिर होण्याचा प्रयत्न करतोय. पण अजून तर काहीच हाती लागलं नाही. कंपनीत काम करून एकट्याच्या पगारावर तुम्हां दोन मुलांची शिक्षणं व हा वनबीएचके फ़्लॅट घेतला आहे. या व्यतिरिक्त मी काहीच कमवू शकलो नाही.”


    अशा मध्यमवर्गीय घरात राहिल्यामुळे व औरंगाबाद सारख्या शहरात वाढल्यामुळे सुगंधा जरा अधुनिकतेचे पाढे गिरवत होती. पदवीला असताना तर अनेक मित्र-मैत्रिणी तीला जोडल्या गेल्या होत्या. त्यात अंधश्रध्दा निर्मूलनाच काम करणारे संकेत, राजेश, आशा, स्वाती यांच्या सोबत तर अनेक गोष्टी तीला माहित झाल्या होत्या. ती म्हणायची की माणसाने श्रध्दा ठेवावी पण अंधश्रध्दा बाळगू नये. असं सार आनंदात सुरू असताना सुगंधाला गावाकडंच पाटलांच्या मुलाचं म्हणजेच अविनाशचं स्थळ येतं. वडिलांच्या नात्यातील असल्यामुळे आईही काही बोलू शकली नाही. अविनाशचा इंजिनिअरिंगला मॅनेजमेन्ट कोट्यातून प्रवेश घेतला होता. पण दुस-या वर्षातूनच ईअर डाऊन झाला होता. चार वर्ष तो परिक्षा देत होता पण पास काही झाला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याच लग्न करायचं ठरवलं. आणि नात्यातील म्हणजे सुगंधाच स्थळ निवडलं होतं. लग्नातील देवाण-घेवाण, मानपान थोडक्यात बसला होता म्हणून सुगंधाच्या वडिलानी हो म्हणून कळवलं होतं आणि धुमधडाक्यात लग्नाचा बार उडवून दिला होता.


     या लग्नाच्या वेळी सुगंधा नको म्हणत होती पण शेवटी वडिलांच्या इच्छेनुसार तीला लग्न कराव लागलं. लग्न होऊन ती सासरी आली. म्हणजेच एका खेडे गावात. जिथं आजही नावाला राहिलेले पाटील स्वताला गावचे वतनदार समजतात. गावातील जत्रा व उत्सवाच्या वेळी यांनाच मान द्यावा लागतो. अगदी असचं काल झालेल्या वट सावित्रीच्या सनात सुध्दा.  म्हणजे वडाला पुजण्यासाठी गावतील पाटलाच्या स्त्रीयांचा मान पहिला आहे. त्यांनी वडाला पूजलं की मग बाकिच्या स्त्रीयांनी पूजायचं अशी या गावची प्रथा आहे. आतापर्यंत पाटलाच्या सर्व सुना ही परंपरा पाळत आल्या आहेत. पण नेमक या वर्षी सुगंधाला वडाच्या झाडाला पूजण्यासाठी जायला सांगितलं तर सुगंधा म्हणाली, “मी असले पारंपारिक रितीरिवाज पाळत नाही.” त्यावर सासू म्हणाली, “हे बघ सुगंधा आजपर्यंत पाटलाच्यां लेकी-सुनानी ही प्रथा पाळली आहे. त्यामुळे तुला जावचं लागेल.”  हे ऎकून सुगंधाने जाण्यास नकार दिला. मग सासूने सास-याल सांगितले. त्यांची चर्चा सुरू असतानाच सुगंधाचा नवरा म्हणजेच अविनाश आला. आणि तो म्हणाला, “हे बघ, आई सांगेल तसं कर. आपल्या वाढ्याची प्रथा आहे. गावात आपला मान असतो. सावित्री ही तीच्या नव-यासाठी पूजा करते. त्यामुळे तू ही आपल्या नव-यासाठी जा. ऎक माझं.”  हे बोलत असताना अविनाशचा आवाज वाढला होता. आजपर्यंत सुगंधाने अनेक गोष्टी सासू- सास-याच्या ऎकल्या होत्या. पण आज ही पहिलीच वेळं होती की ती नाही म्हणत होती. त्यावर ती म्हणाली, “अशा पौराणीक कथांवर माझा विश्वास नाही ज्याच्यात विज्ञानाचे पुरावे सापडत नाहीत. त्यामुळे    ही प्रथा मी पाळणार नाही.”  अविनाशने हे ऎकताच..तीला मारायला सुरवात केली. “तू नव-याच ऎकत नाही. नव-यासाठी उपास करत नाही. तू कसली बायको आहेस. तू माझी वैरिण आहेस.”  असं म्हणत त्याने जोरात डोक्यात बुक्की मारली. तशी सुगंधा खाली पडली. आणि जमिनीवर आपटली. डोक्यातून रक्त येऊ लागलं. तीची शुध्द हरपली. सासरे घाबरले. लगेच गावातील डॉक्टर कडे नेहलं. तिथं मलम पट्टी केली पण शुध्दीवर आली नाही. मग डॉक्टरांनी मोठ्या दवाखान्यात जाण्यास सांगितले. तिथं गेल्यावर तपासणी केली. पण सुगंधा काहीच प्रतिसाद देत नव्हती. सलाईन लावले, औषधं दिली पण सुगंधा काही बरी झाली नाही. आता ती कोम्यात आहे. माहित नाही. ती बरी होईल की नाही.




No comments:

Post a Comment

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts