Friday, June 5, 2020

आई-वडिल वारल्यानंतर पाच मुलांच काय होतं?



     अर्धांग वायूचा झटका आलेल्या आईला छोटकी बागी या वॉर्ड मधील पाच मुलं रांचीच्या मोठ्या दवाखान्यात घॆऊन जात होते. आईनं नवरा वारल्यापासून मुलांना जंगालातील लाकडं गोळा करून सांभाळलं होतं. पाच वर्षापूर्वी या मुलांच वडिलांच छत्र हरवलं होत. पण आईने हिम्मत धरून मुलांना आधार दिला होता. ज्या आईच्या मायेखाली ही पाच मुलं वाढत होती, पण अचानक आईचं आजारी पडल्यामुळे ही पाचही मुलं घाबरून गेली. छोटे मोठे प्रयत्न करून शॆजारी-पाजा-यांच्या मदतीने आईला वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. पण कोडरमा शहरात इलाज होत नसल्यामुळे आईला रांचीला घेऊन निघाले. १५ वर्षाची मुलगी काजल कुमारी धीर देत होती. ९ वर्षाचा मुलगा सारखा रडत होता. बाकीच्या दोनही मुली पडेल ते काम करून आपल्या आईला वाचवण्यासाठी धडपडत होत्या. सुनिता कुमारी १३ वर्ष व अनिता कुमारी ११ वर्ष. त्यांच शिक्षण घरच्या परिस्थितीमुळे असंतसंच होत होतं. त्यांचा थोरला भाऊ १८ वर्षाचा आहे. पण तो वेडसर असल्यामुळे त्या बहिणींना त्यालाही सांभाळाव लागत आहे. दवाखान्यासाठी लागणारे पैसेही नाहीत पण सरकारी दवाखान्यात इलाज होईल या आशेने ते निघालेले.



    आईच्या वेदना वाढतच होत्या. निम्मा रस्ता संपला. त्यावेळी आईला जास्तच त्रास होऊ लागला. गाडीत काही औषधौपचार मिळाला नाही. १५ वर्षाची काजलं आईच्या डोळ्यात बघून आईला धीर देत होती. आई तीच्याकडे बघायची आणि डोळ्यानेचं खुणवायची की माझ काही खरं नाही. माझ्यानंतर या मुलांना तुला सांभाळायंच आहे. असं सांगत आई काजलचा हात हातात घेत होती. तीन तीनदा घट्ट आवळून धरायची. मधूनच तीच्या डोक्यावरून हात फ़िरवायची. असं करतानाचं अचानक तीचे डोळे झाकले जातात. त्यावेळी काजल घाबरून आईला उठवण्याचा प्रयत्न करते. आईला गलबलून हलवते पण आई काही जाग्यावरची उठत नाही की काजल कडे बघत नाही. नातेवाईक जवळ येतो आणि म्हणतो, “काजल मागे हो, आई नाही राहीली या जगात.. आता कोणाला उठवतेस..” हे वाक्य ऎकताच काजलचा हुंदका बाहेर पडतो. काजल रडलेलं पाहून बारक्या बहिणी व भाऊ जवळ येतात.. तेही काजलच्या गळ्यात पडून रडायला लागतात. आता काय करायचं.. आयुष्यात संपूर्ण अंधार दिसू लागतो. आईला गावी परत आणलं जात. अंत्यविधी होतो.



    आई- वडिल गेल्यामुळे काजल आणि हे चार भावांडे अनाथ झाली.. नातेवाईक व शेजारी पाजरी थोडीफ़ार मदत करू लागले. पण या मुलांच शिक्षणचं वय. या वयात यांनी काम करण्यापेक्षा शिकलं तर भविष्य सुधारू शकतं. पण जगण्यासाठी काम तर करावाचं लागणार… अशा स्थितीत असताना ही बातमी कोडरमा जिल्ह्याचे उपायुक्त रमेश घोलप यांच्या कानावर गेली. आणि या पाचही मुलांच्या आयुष्यात आशॆचा किरण निर्माण झाला. स्वत: जाऊन रमेश घोलप यांनी त्यांची नावे शाळेत दाखलं केली. आज त्यातील चार मुलांची कस्तुरबा निवासी विद्यालयात राहण्याची व जेवण्याची सोय केली आहे. पुढील शिक्षणसाठी त्यांना शासनाच्या योजनेअंतर्गत महिना दोनहजार शिष्यवृत्ती मिळण्याची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यातील अधिका-यांच्या मदतीने तातडीची दहा हजाराची मदत केली आहे. करोना रोगापासून काळजी घॆण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रेशन व लागणारे औषध दिली आहेत. ही मदत प्रसंग समजल्यापासून २४ तासात केली आहे.





    या बद्द्ल घोलप म्हणतात, “मला या दुःखद घटनेबद्दल कळले. त्यावेळी मला खूप वाईट वाटलं. या मुलांसोबत माझे सांत्वन आणि आशीर्वाद आहेत. अम्ही  वेगवेगळ्या योजनांद्वारे मुलांना मदत केली आहे. मी स्वत: देखील अशा कठीण परिस्थितीतून गेलो आहे. अशा परिस्थितींना प्रेरणा समजून या मुलांनी त्यांच्या  पालकांची स्वप्ने पूर्ण करावं.”

            खरं तर अशा प्रकारच्या मदती शासनाच्या पातळीवरून एवढ्या तकडाफ़डकी होतात यावर विश्वासच बसत नाही. पण जर संवेदनशील माणसं असतील तर हे निश्चितच होतं. त्यामुळेच त्या मुलांना आज डोक्यावर छत व पाठीवर मायेची थाप मिळाली.

                                              

No comments:

Post a Comment

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts