Thursday, June 25, 2020

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड



       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मानसूनचा पाऊस जुन महिन्याच्या सुरवातीला पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी चांगला झाला. त्यामुळे शॆतक-यांनी जून महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून पेरणी करण्यास सुरवात केली. जसं पेरण्याचा काळ सुरू झाला तसं शेतक-यांनी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात गर्दी केली. त्यावेळी काही शेतक-यांना महाबीज बियाणे मिळाली नाहीत म्हणून पर्यायी कंपनीचे बियाणे विकत घॆतली. त्यातही लॉकडाऊनच्या नावाखाली साठेबाजी करून बियाणे चढ्या दराने विकण्यात आली.
     शेतक-यांनी जास्त पैसे मोजून बियाणे खरेदी करून पेरणी केली पण पेरलेली बियाणे उगवलीच नाहीत. यात विशेषकरून सोयाबीन उगवलच नाही. सोयाबीनच्या बियाणाची एका पिशवीची किंमत २४०० रूपये पासून सुरू आहे. त्यात काही कंपन्यांच्या २५००, २६०० तर काहीच्या ३००० रुपये पर्यंत विकल्या जातात. साधारणत: एक एकर क्षेत्रासाठी एक पिशवी व पन्नास किलो खत वापरलं जात. एक एकर क्षेत्राचा पेरणीचा खर्च बियाणे २४०० रूपये अधिक खत १३०० रुपये अधिक पेरणी भाडे १५०० रुपये मिळून एकूण ५२०० रुपये असा ढोबळमानाणे खर्च येतो. याशिवाय शॆतातील मशागत व बाजारातून बी-बीयाणे आणणे यासह हा खर्च १०,००० रुपये पर्यंत जातो. जर दुबार पेरणी केली तर पिक येऊ शकतं पण पेरणीचा अनावश्यक आर्थिक भार शेतकऱ्यावर वाढतो.  
        शेतकरी हा पिक येईल व त्यातून कुटुंबाची उपजीविका भागविता येईल म्हणून तिकडे डोळे लावून बसलेला असतो. पण जर त्याच्या जमिनीत पेरलेल बियाणच उगवलं नाही तर तो काय खाईल आणि कसा जगेल? ज्या कंपन्यानी अशाप्रकारचे बियाणे विकले आहेत त्यांनी एकतर झालेला खर्च द्यावा किंवा पेरणी साठी दुसरी दर्जेदार बियाणे उपलब्ध करूण द्यावेत, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. या संदर्भात तालुका प्रशासनाशी संपर्क केला पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

लॉकडाऊन मुळे गावाकडे आलेल्या लोकांची पाण्यासाठी वणवण



        गेल्या १०-१५ वर्षापासून शहरात रोजगारासाठी स्थलांतरित झालेले असंख्य मजूर व कामगार आहेत. शहरात कुठेही राहून म्हणजे मिळेल त्या जागेवर झोपडी करून, हाताला मिळेल ते काम करणारा एक मोठा वर्ग आहे. तो शहरात हळू हळू स्थिर स्थावर होत आहे. पण अचानाक आलेल्या कोव्हीड-१९ च्या साथीमुळे उच्चभ्रू, मध्यम वर्गीय यांच्या सोबत कष्टकरी व गरीब लोकांचे आयुष्यही ढवळून निघाले.
       जांच्याकडे काही बचत करून ठेवलेली रक्कम होती त्यांच आयुष्य सुरूळीत आहे. पण हातावरच्या कामाने पोट भरणा-या जनतेच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांची शहरातील जगण्याची साधन बंद झाली. सर्व काम ठप्प झाली म्हणून ते गावाकडे आले.
     यातील कित्येक लोक चालत, सायकल, व मोटार सायकल किंवा ट्रक मध्ये आले होते. गावाकडे आल्यानंतर एकतर सुरवातीला गावात घेत नव्हते. शासनाच्या आदेशानुसार गावात घेऊन शाळेत किंवा घरात क्वारंटाईन करायला सांगितले. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यावर ते त्यांच्या घरात राहण्यासाठी गेले. त्यांची गावात शेती नसल्यामुळे व घर ही जुनाट पडलेलं असल्यामुळे गावात राहण्याची अडचण निर्माण झाली. पण तरीही त्यांनी काहीतरी करून राहण्याची सोय केली. तसही गावाकडे कितीही आर्थिक अडचण असली तरी माणूस उपाशी मरत नाही. पण करोना हा साथीचा आजार असल्यामुळे गावातील माणसं एकमेकांना भेटण व जवळ जाण टाळू लागली. पाण्यासाठी सामूहिक नळावर बंदी घातली. मग बाहेरून आलेल्या लोकांनी विहीरी, नद्या व बारवाहून पाणी आणण्यासाठी वणवण करावी लागते आहे.

Monday, June 8, 2020

महाराष्ट्र साहित्य पत्रिकेत -यसन कादंबरीचे परिक्षण- प्रेमसागर राऊत



#महाराष्ट्र #साहित्य #परिषदेच्या #त्रैमासिक मुखपत्राच्या "#महाराष्ट्र #साहित्य #पत्रिकेत" जानेवारी -मार्च २०२० च्या अंकात #यसन कादंबरीचे प्रा. #प्रेमसागर #राऊत यांनी लिहलेले अभ्यासपूर्ण परिक्षण...
संपादक डॉ. #पुरूषोत्तम #काळे यांचे खूप खूप धन्यवाद...






Saturday, June 6, 2020

“ती” नाही म्हणली म्हणून…..



     सुगंधाच्या लग्नाला जुलैला एक वर्ष पूर्ण होणार होतं. तीचा संसार सुखात सुरू आहे असंच चित्र सर्वांना दिसत होतं. सुगंधा लग्नानंतरच गावात राहाण्यासाठी आली होती. औरंगाबाद सारख्या शहरात जन्मापासून पदवीचं शिक्षण होईपर्यंत राहिलेली होती. पदवीचं शेवटचं वर्ष संपल आणि नात्यातील अविनाश पाटील सोबत वडिलांनी लग्न लावून दिलं. शहरात राहिल्यामुळे शहरी मध्यमवर्गीय विचार होता. महाविद्यालयीन शिक्षणामुळे पारंपारीक पध्दती तेवढ्या अंगवळनी पडल्या नव्हत्या. गावाकडे आई-वडिलांचे नातेवाईक होते पण त्यांच्याकडे नेहमी जाण नव्हतं. केंव्हातरीच दिवाळी किंवा उन्हाळी सुट्टीला तीला जाण्याचा योग यायचा. पण सात-आठ दिवसात जेवढं गाव कळला तेवढाचं तीच्या सोबत होता.

    सुगंधाच्या आईनेही कधी तीला जबरदस्ती केली नाही की तू हेच कर आणि अशीच राहा, तशीच रहा. जरी आई पारंपारिक चाली-रीती पाळत होती तरी.. पण वडिल नेहमी सांगायचे, “मुलीच्या जातीने नेहमी घरातील काम शिकलं पाहिजे. घरातील चाली- रीती शिकून घेतल्या पाहिजे म्हणजे लग्नानंतर त्याचा त्रास होत नाही. नाहीतर सासु-सासरे आणि नवरा यांच्याकडून सतत ऎकावं लागत की हे कर आणि ते करं. तुझ्या आई-वडिलांनी हेच शिकवलं का? तुला काही परंपराच माहित नाही. त्याच्यापेक्षा सर्व गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे. सासरच्या कोणाला नाही म्हणायचं नाही. त्यावर सुगंधा म्हणायची, “मी लग्न करून कधीच गावाकडे जाणार नाही.  शहरातीलच नवरा करणार आहे. एवढी पदवी झाली की मलाही नौकरी लागेल. मग मी कशाला गावाकडे जाऊ आणि गावातील परंपरा शिकू?” त्यावर वडिल म्हणायचे, “बाळा, तू गावात राहा नाहीतर शहरात? तुला या हिंदू संस्कृतीतील रितीरिवाज पाळावेच लागतात. तू आता शिक्षण घेतलस म्हणून असं बोलतेस.. पण माझ्याकडे बघ. मी ही सुरवातील असाचं म्हणून गाव सोडलं. आता शहरात स्थिर होण्याचा प्रयत्न करतोय. पण अजून तर काहीच हाती लागलं नाही. कंपनीत काम करून एकट्याच्या पगारावर तुम्हां दोन मुलांची शिक्षणं व हा वनबीएचके फ़्लॅट घेतला आहे. या व्यतिरिक्त मी काहीच कमवू शकलो नाही.”


    अशा मध्यमवर्गीय घरात राहिल्यामुळे व औरंगाबाद सारख्या शहरात वाढल्यामुळे सुगंधा जरा अधुनिकतेचे पाढे गिरवत होती. पदवीला असताना तर अनेक मित्र-मैत्रिणी तीला जोडल्या गेल्या होत्या. त्यात अंधश्रध्दा निर्मूलनाच काम करणारे संकेत, राजेश, आशा, स्वाती यांच्या सोबत तर अनेक गोष्टी तीला माहित झाल्या होत्या. ती म्हणायची की माणसाने श्रध्दा ठेवावी पण अंधश्रध्दा बाळगू नये. असं सार आनंदात सुरू असताना सुगंधाला गावाकडंच पाटलांच्या मुलाचं म्हणजेच अविनाशचं स्थळ येतं. वडिलांच्या नात्यातील असल्यामुळे आईही काही बोलू शकली नाही. अविनाशचा इंजिनिअरिंगला मॅनेजमेन्ट कोट्यातून प्रवेश घेतला होता. पण दुस-या वर्षातूनच ईअर डाऊन झाला होता. चार वर्ष तो परिक्षा देत होता पण पास काही झाला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याच लग्न करायचं ठरवलं. आणि नात्यातील म्हणजे सुगंधाच स्थळ निवडलं होतं. लग्नातील देवाण-घेवाण, मानपान थोडक्यात बसला होता म्हणून सुगंधाच्या वडिलानी हो म्हणून कळवलं होतं आणि धुमधडाक्यात लग्नाचा बार उडवून दिला होता.


     या लग्नाच्या वेळी सुगंधा नको म्हणत होती पण शेवटी वडिलांच्या इच्छेनुसार तीला लग्न कराव लागलं. लग्न होऊन ती सासरी आली. म्हणजेच एका खेडे गावात. जिथं आजही नावाला राहिलेले पाटील स्वताला गावचे वतनदार समजतात. गावातील जत्रा व उत्सवाच्या वेळी यांनाच मान द्यावा लागतो. अगदी असचं काल झालेल्या वट सावित्रीच्या सनात सुध्दा.  म्हणजे वडाला पुजण्यासाठी गावतील पाटलाच्या स्त्रीयांचा मान पहिला आहे. त्यांनी वडाला पूजलं की मग बाकिच्या स्त्रीयांनी पूजायचं अशी या गावची प्रथा आहे. आतापर्यंत पाटलाच्या सर्व सुना ही परंपरा पाळत आल्या आहेत. पण नेमक या वर्षी सुगंधाला वडाच्या झाडाला पूजण्यासाठी जायला सांगितलं तर सुगंधा म्हणाली, “मी असले पारंपारिक रितीरिवाज पाळत नाही.” त्यावर सासू म्हणाली, “हे बघ सुगंधा आजपर्यंत पाटलाच्यां लेकी-सुनानी ही प्रथा पाळली आहे. त्यामुळे तुला जावचं लागेल.”  हे ऎकून सुगंधाने जाण्यास नकार दिला. मग सासूने सास-याल सांगितले. त्यांची चर्चा सुरू असतानाच सुगंधाचा नवरा म्हणजेच अविनाश आला. आणि तो म्हणाला, “हे बघ, आई सांगेल तसं कर. आपल्या वाढ्याची प्रथा आहे. गावात आपला मान असतो. सावित्री ही तीच्या नव-यासाठी पूजा करते. त्यामुळे तू ही आपल्या नव-यासाठी जा. ऎक माझं.”  हे बोलत असताना अविनाशचा आवाज वाढला होता. आजपर्यंत सुगंधाने अनेक गोष्टी सासू- सास-याच्या ऎकल्या होत्या. पण आज ही पहिलीच वेळं होती की ती नाही म्हणत होती. त्यावर ती म्हणाली, “अशा पौराणीक कथांवर माझा विश्वास नाही ज्याच्यात विज्ञानाचे पुरावे सापडत नाहीत. त्यामुळे    ही प्रथा मी पाळणार नाही.”  अविनाशने हे ऎकताच..तीला मारायला सुरवात केली. “तू नव-याच ऎकत नाही. नव-यासाठी उपास करत नाही. तू कसली बायको आहेस. तू माझी वैरिण आहेस.”  असं म्हणत त्याने जोरात डोक्यात बुक्की मारली. तशी सुगंधा खाली पडली. आणि जमिनीवर आपटली. डोक्यातून रक्त येऊ लागलं. तीची शुध्द हरपली. सासरे घाबरले. लगेच गावातील डॉक्टर कडे नेहलं. तिथं मलम पट्टी केली पण शुध्दीवर आली नाही. मग डॉक्टरांनी मोठ्या दवाखान्यात जाण्यास सांगितले. तिथं गेल्यावर तपासणी केली. पण सुगंधा काहीच प्रतिसाद देत नव्हती. सलाईन लावले, औषधं दिली पण सुगंधा काही बरी झाली नाही. आता ती कोम्यात आहे. माहित नाही. ती बरी होईल की नाही.




लॉकडाऊनच्या नावाखाली शासनाच्या कृषी सेवा केंद्रात खते व बी-बीयाणे विक्रीवरुन मनमानी




       शासनाच्या कृषी खात्याकडून शेतक-यांना बी-बीयाणे व खते बांधावर पोहचवणार असे जाहिर केले होते. पण सध्याची परिस्थिती पहाता शेतक-यांना कृषी सेवा केंद्राकडूनच बी-बीयाणे व खते उपलब्ध होत नाहीत. शॆतकरी कृषी सेवा केंद्रात ये-जा करत आहेत पण कृषी सेवा केंद्राकडून सांगण्यात येत आहे की, “अजून खते आली नाहीत. बीयाणे आलेली संपली आहेत.” असं सांगून अडलेल्या शेतक-यांना परत पाठवलं जात. स्टॉक शिल्लक ठेवून, माल नाही असं जाहिर करून, ऎनवेळी माल बाहेर काढायचा त्यामुळे तरसलेले शेतकरी गर्दी करतात कारण पेरणीचे दिवस संपत आलेले असतात त्यांच्यापुढे बी-बीयाणे व खते मिळेल त्या किमतीत घेण्याशीवाय पर्याय राहत नाही. आणि जे जास्त पैसे देवू शकतील किंवा बीयाणा सोबत खतही घेतील त्यांनाच बी-बीयाणे व खते विकली जातात. खतं व बीयाणे वाढीव किंमतीत घेण्याची जबरदस्ती कृषीसेवा केंद्राकडून करण्यात येत आहे. याच्यात अल्पभूधारक शॆतक-यांची लूट होत आहे. त्यांच आर्थिक शोषण केलं जात आहे. एक तर या वर्षी करोनाच्या साथीत गरिब अल्पभूधारक शॆतकरी मेटाकुटीला आला आहे. काही शॆतक-यांची पीक अवकाळी पावसामुळे वाया गेली. काहींना भाव मिळाला नाही. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतक-यांना शासनाच्या कृषी सेवा केंद्राकडूनच अडचणीत पकडल जात आहे.

     मान्सूनचा पाऊस येण्या अगोदरच अवकाळी पाऊस मुसळधार झाला. त्यामुळे सोलापूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यातील काही तालुक्यात पेरण्या करण्यासाठी शॆतक-यांनी तिफ़णी उचललेल्या आहेत. पण बी-बीयाणे व खते मिळवण्यासाठी कृषी सेवा केंद्राकडे फ़े-या माराव्या लागत आहेत. त्या फ़े-या मारण्यातच शेतक-यांची ऊर्जा खर्ची होत आहे.

    कृषी विज्ञान केंद्राच्या अधिका-यांकडून सांगण्यात आलं आहे की,“नियमानुसार कोणतही बी विकताना लिंकेज करता येत नाही. कृषी सेवा केंद्राकडे किती स्टॉक आहे व त्याच्या किंमती काय आहेत. याची माहिती बाहेर बोर्डावर प्रदर्शित करण बंधनकारक आहे. प्रत्येक शेतक-यांना शासनाच्या दरपत्रकानुसार बी-बीयाणे मिळाली पाहिजेत.”

     शासनाची नियमावली कृषी विज्ञान केंद्र चालवणा-यांनी धाब्यावर बसवली आहे. हे असंच जर सुरू राहिलं तर कित्येक अल्पभूधारक शॆतकरी पेरणी वाचून वंचित राहतील. या वर्षी करोना महामारीत आर्थिक विवंचनेत सापडलेल्या गरिब, कष्टकरी, अल्पभूधारक शॆतक-यांना खरं तर मदतीची गरज आहे. जर त्यांची पेरणी वेळेत झाली नाही तर या शॆतक-यांच पीक येणार नाही. परिणामी ते अजून जास्तच हालाखीच्या परिस्थितीत ढकलेले जातील. याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल.  आत्ताच सावध पवित्रा घेऊन, प्रत्येक शॆतक-यांना बी-बीयाणे मिळतील याची दक्षता घॆण गरजेच आहे.  


टिप: बार्शी, कळंब व केज तालुक्यातील शेतक-यांनी सांगितलेल्या माहितीवरून.     

Friday, June 5, 2020

आई-वडिल वारल्यानंतर पाच मुलांच काय होतं?



     अर्धांग वायूचा झटका आलेल्या आईला छोटकी बागी या वॉर्ड मधील पाच मुलं रांचीच्या मोठ्या दवाखान्यात घॆऊन जात होते. आईनं नवरा वारल्यापासून मुलांना जंगालातील लाकडं गोळा करून सांभाळलं होतं. पाच वर्षापूर्वी या मुलांच वडिलांच छत्र हरवलं होत. पण आईने हिम्मत धरून मुलांना आधार दिला होता. ज्या आईच्या मायेखाली ही पाच मुलं वाढत होती, पण अचानक आईचं आजारी पडल्यामुळे ही पाचही मुलं घाबरून गेली. छोटे मोठे प्रयत्न करून शॆजारी-पाजा-यांच्या मदतीने आईला वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. पण कोडरमा शहरात इलाज होत नसल्यामुळे आईला रांचीला घेऊन निघाले. १५ वर्षाची मुलगी काजल कुमारी धीर देत होती. ९ वर्षाचा मुलगा सारखा रडत होता. बाकीच्या दोनही मुली पडेल ते काम करून आपल्या आईला वाचवण्यासाठी धडपडत होत्या. सुनिता कुमारी १३ वर्ष व अनिता कुमारी ११ वर्ष. त्यांच शिक्षण घरच्या परिस्थितीमुळे असंतसंच होत होतं. त्यांचा थोरला भाऊ १८ वर्षाचा आहे. पण तो वेडसर असल्यामुळे त्या बहिणींना त्यालाही सांभाळाव लागत आहे. दवाखान्यासाठी लागणारे पैसेही नाहीत पण सरकारी दवाखान्यात इलाज होईल या आशेने ते निघालेले.



    आईच्या वेदना वाढतच होत्या. निम्मा रस्ता संपला. त्यावेळी आईला जास्तच त्रास होऊ लागला. गाडीत काही औषधौपचार मिळाला नाही. १५ वर्षाची काजलं आईच्या डोळ्यात बघून आईला धीर देत होती. आई तीच्याकडे बघायची आणि डोळ्यानेचं खुणवायची की माझ काही खरं नाही. माझ्यानंतर या मुलांना तुला सांभाळायंच आहे. असं सांगत आई काजलचा हात हातात घेत होती. तीन तीनदा घट्ट आवळून धरायची. मधूनच तीच्या डोक्यावरून हात फ़िरवायची. असं करतानाचं अचानक तीचे डोळे झाकले जातात. त्यावेळी काजल घाबरून आईला उठवण्याचा प्रयत्न करते. आईला गलबलून हलवते पण आई काही जाग्यावरची उठत नाही की काजल कडे बघत नाही. नातेवाईक जवळ येतो आणि म्हणतो, “काजल मागे हो, आई नाही राहीली या जगात.. आता कोणाला उठवतेस..” हे वाक्य ऎकताच काजलचा हुंदका बाहेर पडतो. काजल रडलेलं पाहून बारक्या बहिणी व भाऊ जवळ येतात.. तेही काजलच्या गळ्यात पडून रडायला लागतात. आता काय करायचं.. आयुष्यात संपूर्ण अंधार दिसू लागतो. आईला गावी परत आणलं जात. अंत्यविधी होतो.



    आई- वडिल गेल्यामुळे काजल आणि हे चार भावांडे अनाथ झाली.. नातेवाईक व शेजारी पाजरी थोडीफ़ार मदत करू लागले. पण या मुलांच शिक्षणचं वय. या वयात यांनी काम करण्यापेक्षा शिकलं तर भविष्य सुधारू शकतं. पण जगण्यासाठी काम तर करावाचं लागणार… अशा स्थितीत असताना ही बातमी कोडरमा जिल्ह्याचे उपायुक्त रमेश घोलप यांच्या कानावर गेली. आणि या पाचही मुलांच्या आयुष्यात आशॆचा किरण निर्माण झाला. स्वत: जाऊन रमेश घोलप यांनी त्यांची नावे शाळेत दाखलं केली. आज त्यातील चार मुलांची कस्तुरबा निवासी विद्यालयात राहण्याची व जेवण्याची सोय केली आहे. पुढील शिक्षणसाठी त्यांना शासनाच्या योजनेअंतर्गत महिना दोनहजार शिष्यवृत्ती मिळण्याची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यातील अधिका-यांच्या मदतीने तातडीची दहा हजाराची मदत केली आहे. करोना रोगापासून काळजी घॆण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून रेशन व लागणारे औषध दिली आहेत. ही मदत प्रसंग समजल्यापासून २४ तासात केली आहे.





    या बद्द्ल घोलप म्हणतात, “मला या दुःखद घटनेबद्दल कळले. त्यावेळी मला खूप वाईट वाटलं. या मुलांसोबत माझे सांत्वन आणि आशीर्वाद आहेत. अम्ही  वेगवेगळ्या योजनांद्वारे मुलांना मदत केली आहे. मी स्वत: देखील अशा कठीण परिस्थितीतून गेलो आहे. अशा परिस्थितींना प्रेरणा समजून या मुलांनी त्यांच्या  पालकांची स्वप्ने पूर्ण करावं.”

            खरं तर अशा प्रकारच्या मदती शासनाच्या पातळीवरून एवढ्या तकडाफ़डकी होतात यावर विश्वासच बसत नाही. पण जर संवेदनशील माणसं असतील तर हे निश्चितच होतं. त्यामुळेच त्या मुलांना आज डोक्यावर छत व पाठीवर मायेची थाप मिळाली.

                                              

Wednesday, June 3, 2020

माणसं सामावून घेणारा गाव उधवस्त!!



घटना-१
      साखार कारखाना बंद झाल्यावर हरीनाना दरवर्षी गावाकडे जातो. पण या वर्षी त्याला सहजासहजी गावी जाता आलं नाही. कारखाना ५ एप्रिलला बंद झाला. त्या दिवसापासून हरिनाना बीड जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी जाण्यासाठी प्रयत्न करत होता. पण लॉकडाऊन असल्यामुळे जाण्यासाठी परवानगी मिळाली नाही. मग काम बंद झाल्यावरही हरीनाना कारखान्यावरच थांबला. लॉकडाऊन मध्ये अडकल्यामुळे थोडीफ़ार मदत मिळाली. त्याचं आणि बायको लेकरांच पोटापाण्याचं भागत होत. पण बैलांना वैरण मिळवण्यासाठी खूप धावपळ करावी लागली. त्यात एकदा मध्येच अवकाळी पाऊस आला. त्यात कोपीत पाणी शिरलं. होतं नव्हतं ते सामान भिजलं. त्यामुळे अजून अडचणीत वाढ झाली. मग तर कारखान्याकडे हात पसरून दोन वेळंच जेवण मिळवलं आणि कसे तरी दिवस काढत होते. तेवढ्यात शासनाकडून जाहिर करण्यात आलं की जे कारखाने बंद झाले आहेत त्या मजुरांना गावी जाण्याची परवानगी देण्यात येईल. मग हरीनानाचा गावाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला. कारखान्याने एक ट्रक मध्ये पाच गाडीवानाचा पसारा भरला. आणि ते बीड कडे निघाले. रात्रभर प्रवास करून ते गावाच्या जवळ आले. तर गावातील काही माणसांनी त्यांची ट्रक आडवली. आणि म्हणाले की तुम्हांला गावात प्रवेश नाही. हरीनाना आणि इतर लोकांना हात जोडले. पाया पडले तरी काही गावात प्रवेश दिला नाही. त्यांच्यातील एकाने ट्रकवर दगडं फ़ेकायला सुरू केलं. त्यामुळे शेवटी हरीनाना आणि ते गाडीवान गावापासून २ किमी अंतरावर माळावर गेले. तिथेचं सामान खाली करून घेतलं. ट्रक परत गेला. हरीनाना पसारा काडून कोप करू लागला. त्या सर्व गाडीवानानी तिथेच कोपी केल्या. तिथे पाण्याची व्यवस्था नव्हती की दुसरी काहीच सोय नव्हती. एक किमीवरून २५ ते ३० फ़ुट उपसा नसणा-या खॊल विहीरीतून पाणी काडून वापरू लागली. पण एके दिवशी पाणी काढताना हरिनानाच्या बायकोचा तोल जातो आणि ती विहीरीत पडून जखमी होते. आता ती दोन्ही पायाने आधू झाली आहे.


घटना-२
     अजिनाथ हा गेल्या वर्षापासून मुंबईला एका मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी काम करत होता. लहान दोन मुलं होती. बायको लेकरा सह काम करून कसं तरी जगत होता. अचानक करोनाच वारं सुरू झालं. आणि लॉकडाऊन झालं. त्यामुळे हातचं काम गेलं. २४ मार्च पासून हाताला काम नाही. त्यामुळे गावाकडे जावं तर लॉकडाऊन झालेलं. मग त्यांने १४ एप्रिल पर्यंत वाट बघितली पण लॉकडाऊन काही संपल नाही. जवळचे सर्व पैसे संपले. आता करणार काय? काही दिवस रांगेत उभा राहून जेवण घेऊ लागला. पण त्याच्यातून त्यांची भूक भागू शकली नाही. उपाशी मरू लागले. मग त्यांने त्याच्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घॆतला. जायचं कसं? पैसे नाहीत. वाहन सुरू नाहीत. मग तो बायकोसह दोन लहान मुलांना घॆऊन चालत निघाला.  १८ एप्रिलला निघालेला अजिनाथ ३ मे ला त्याच्या गावी पोहचतो. पायी चालत, कधी उपाशी तर कधी फ़क्त पाणी पेवून तो गावाच्या वेशीवर येतो. तिथं त्याला गावातील लोकांकडून आडवलं जात. त्याला गावाच्या बाहेर काढंल जात. त्यावेळी त्याची लेकरं, बायको रडत आहेत. त्याच्याही डोळ्यातून पाणी येत आहे. तो म्हणायचा, “सरपंच, आहो, म्या ह्याच गावचा, मला गावात घ्या.. दोन दिसापासून उपाशी हाय.. मला वाटायचं काय बी झालं तरी माझं गाव मला उपाशी मरू देणार नाय. म्हणून आलोय..आम्हांला त्या पडक्या घरात राहू द्या. म्या काय बी काम करीन आन पोट भरीन.. मला तो रोग झालेला नाय.” अजिनाथ विनवण्या करत होता. पण कुणाच्याच काळजाला पाझर फ़ुटत नव्हता. त्याचे आई-वडिल ही विनंती करत होते. पण त्यांच ही ऎकलं नाही. त्यांनाही सांगितलं की तुम्हांलाही गावाच्या बाहेर काढू. शॆवटी गावकरी त्याला गावाच्या बाहेर हाकलून लावतात.  गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक ही त्याला गावात राहण्यासाठी आधार देत नाहीत. गावातून बाहेर जाताना तो रडत रडत म्हणत होता.. “आम्हांला पाणी तर द्या.. लय आशेनं आलोय.. खूप तहान लागलीय..” पण कोणी पाणीही दिलं नाही. तो गावाच्या बाहेर जातो. जाताना मागे वळून वळू बघत होता.. आणि डोळ्याचे आश्रू शर्टच्या भाईने पुसत होता. तो गावाच्या बाहेर जाऊन बायको मुलांना फ़ाशी देवून तोही फ़ाशी घेतो.



     हरीनाना आणि अजिनाथ यांना कोणी उधवस्त केलं? हा प्रश्न आज प्रत्येकाने स्वत:ला विचारला पाहिजे. करोना हा एक साथीचा रोग आहे. तो आज ना उद्या बरा होईल. पण वर्षेन वर्षी गावात जिंवत असणारी माणूसकी लयाली गेली याच जास्त दु:ख होत आहे. हरीनाना व अजिनाथ यांना कोरोना झाला होता का? त्यांच्या तपासण्या केल्या होत्या का? ते कोणत्या अडचणीतून येत आहेत? अगोदरचं त्यांच खच्चीकरण झालं आहे. त्यामुळे त्यांना त्या त्या गावातील स्वता:ला प्रतिष्ठीत समजणा-या व गावाचा कारभार हाकणा-यांनी आधार देण गरजेचं होतं. पण आज घडीला गावा-गावात अनेक गैरसमज पसरले आहेत. त्यातून गावातील पूर्वीच्या काळी असणारी माणूसकी नेस्तानाबूत झाली आहे. गावाच गावपण केंव्हाच संपल आहे. शिल्लक राहिले आहेत ते जिवंत मानवी सांगाडे जे फ़क्त पैसा व माणूसकीहीन जिवन जगत आहेत. काही मोजकेच जाणकार लोक समजावून घेवून अशा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांच्याकडे सत्ता नाही. त्यामुळे त्यांच कोणी जमू देत नाहीत. आज त्यांची अवस्था म्हणजे नखे काढलेल्या वाघासारखी झाली आहे. याला जबाबदार कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधण्य गरजेच आहे. आज जे भ्रमात आहेत की गाव एक संस्कृती आहे. गावात सर्व काही आजही शिल्लक आहे. हा पोकळ भ्रम सोडून वास्तव स्वीकारून गावाची पूर्नरचना होणं गरजेच आहे. नाहीतर व्यवस्थेतील सोकावलेले लांडगे हरीनाना, अजिनाथ सारखे असंख्य बळी घेतील. आज हे दिसून आलं ते करोनाच्या निमित्ताने.. पण हे रूजू लागलं.. याच्यावर वेळीच घाव घालण आवश्यक आहे नाहीतर करोना पेक्षाही महाभयंकर हा रोग आहे.  


सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts