Thursday, May 16, 2019

ऊसाच्या फडात य़सन कादंबरीचं प्रकाशन

#ऊसाच्या फडात #यसन #कादंबरीचं प्रकाशन हे “#इथं #थांबणे #नाही” या पुस्तकाचे लेखक व #IAS मा. #रमेश #घोलप यांच्या हस्ते दि. २० मे २०१९ रोजी स.११ वाजता होणार आहे. या प्रसंगी ऊसतोड कामगारांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी आपण सर्वानी यावं आणि या ऎतिहासीक प्रसंगाचे साक्षीदार व्हाव. ही नम्र विनंती.


Saturday, May 11, 2019

पोटभरण्यासाठी गर्भाशयाचा बळी..



     


     


    “आयव, मला यंदाच वरीस शिकू दी की साळा, आबाला सांग की तू” विमल काकुलतीला येवून म्हणत व्हती. पण आई काय ऎकायला तयार नव्हती. आई म्हणायची, “ इमलाबाई बास झालं शिकश्यान, शिकून काय मास्तरीन व्हनार हायस काय?” विमल आईकडे रागां रागांने बघत म्हणायची, “व्ह्य, म्या शिकून मास्तरीनच व्हणार हाय.” तेवढ्यात तिचा बाप बाहेरुन आला, “इमे, बंद कर ही तुझी थेरं, आता साळा बंद म्हंजी बंद.” आबा घरात आलं की बायामाणस बोलनं बदं करायची. आबाचा दरारा घरातच तेवढा. करारी स्वभाव पण सारं आयुष्य ऊसतोड करत आणि आलेल्या पैस्यात दारू पिवून, कसा तरी बायकोच्य जिवावर संसार करत आलेले हे आबा. त्यांच नाव तसं उत्तमराव पण घरात त्यानंला आबा म्हणायची.  विमल ही यंदा दहावीत बसणार व्हती. पण तिच्या आय-बापानं साळा बंद करून लग्न करण्याचा निर्णय घेतला.  हा निर्णय आई विमलला सांगायला लागते, “इमाबाई, आग आपून बाईची जात, शिकश्यान आपल्या नशिबी नसतंय, आन तू मोठ्या बापाच्या पोटी जन्माली असतीस तर तुझ लाड झालं असतं. आपल्या गरिबीला हे नाय परवडायचं.”  विमाल मान खाली घालून मुळूमुळू रडते, “ आयं, यंदाचचं सालं शिकू दी, म्या पुढं स्वत:च्या पायावर काय तरी करते”.
       विमलंच ना तिच्या आईन ऎकलं, ना बापान. रितीरिवाजाप्रमाण लग्न ठरवलं आणि वयाच्या १८ व्या वर्षी विमलचं त्यांच्या नातेवाईकातल्या २२ वर्ष वयाच्या पोरासंग लग्न लावून दिलं. आई-वडिल मुलीचं लग्न करून दिलं की रिकामे होतात. त्यांच्या डोक्यावरचं ओझं उतरल्या सारख होतं. खरंच मुलगी ही ऒझ असते का? आजही ग्रामीण भागात मुलीचं लग्न करायचं म्हणलं की ऒझं वाटत, हल्ली मुलाचंही वाटाया लागलं आहे. बरं असो, विमल त्याच वर्षी नव-या संग कारखान्याला ऊस तोडायला गेली. १८ वर्षाची पोरं कधी तरी आई-बापासंग ऊसाच्या फडात गेल्याली. पण एवढं ऒझ्याचं काम केलं नव्हतं. आता मात्र सारी जबाबदारी तिच्यावर पडली. नव-यानं पुढं ऊस तोडायचा आणि विमलं पाठी मागं मोळ्या बांधायची. बांधून झाल्या की गाडीत भरू लागायचं. ऊसाची मोळी उचलत नसायची, पण बळचं सवय करून घ्यायची. नाही काम केलं तर नवरा शिव्या द्यायचा. जीव नरडीला यायचा पण विमल तसंच रेटून न्यायची. असं काम करत करत दोन वर्षं झाली. त्यात विमलला एक मुलगी झाली. मुलगी झाली त्यावेळी तर नव-यान वलीबाळांतीण असताना मारलं. विमलं खूप रडली आणि मुलीसह माहेरी गेली. सहा महिनं नवरा आलाचं नाही. ज्यावेळी कारखाण्याववर गाडी लावायची त्याच्या आधी गेला आन बायकोला घिऊन आला. त्या लाहन बाळासह विमल कारखान्यावर गेली. ऊसाच्या फडातचं बाळ संभाळायचं आन कामही करायचं. असं करत करत विमल वर्षं पुढं ढकलंत व्हती. पुढं तिला आजून दोन मुलं झाली. आता वाटलं संसार बरं चालंल. कष्ट करून खात व्हती.
पण आचानक तिच्या पोटात दुखायचं, तसं ज्यावेळी ती गरोदर असायची त्यावेळी ही दुखायचं पण बाळ पोटात असल्यामुळं सहन करायची. आता तर पोटासह मानपाठ, कंबर, ओटीपोटात सारखं दुखायचं. त्यामुळं काम कमी व्हयाचं. नव-याला असं काही सांगीतलं की तो म्हणायचा “इमले, तू मुद्दाम करतीस बघ, एवढी सालं झालं दुखलं नाय, आताचं बरं दुखाला लागलयं?” विमल, कण्हत म्हणायची, “ आवं तवाबी दुखायचं , पन आंगात आवसन व्हतं म्हण सहन व्हयाचं. आता सहन व्हत नाय. आन भ्या बी वाटतय त्या आनुसाया मावशी सारखं झालं तर?” हे ऎकून नवरा मात्र चिडून दोनचार शिव्या हासाडायचा. “तुह्या मायचं तुह्या, तुला मरूच वाटाया लागलय.” असं बोलल्यावर विमलं खाली मान घालून रडायची. तिच्या मावशीच्या असचं ओटीपोटात दुखायचं. मावशीनबी लय वरीस कारखाना केलता. वयाच्या चाळीसाव्या वर्षी गर्भाशयाची पिशवी काढताना तिचा मृत्यू झालता. त्यामुळं विमलला बी असंच वाटायचं. पुढं विमलचं सारखं दुखनं वाढल्यमुळं तिला दवाखान्यात नेहलं. डॉक्टरनं सांगीतलं की, “सारखं मोळ्य़ांच ओझं उचल्यामुळं त्रास होतोय, ओटीपोटात दुखण, कंबर दुखण.” नव-यानं विचारलं, “मग काय करायला पाहिजे?” “डॉक्टर त्यांच्याकड बघत, “गर्भाची पिशवी काढली तर हा त्रास काही दिवसं कमी होईल आणि कामही करता येईल”.  हे ऎकून विमलच्या नव-यानं पिशवी काढण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना त्यांन विमलला देखिल विचारलं नाही. तुझ्या पोटात दुखतय असं सांगून तो तिला दवाखान्यात घेऊन आला. ज्यावेळी विमलला कळंल की पिशवी काढण्यासाठी आणलंय त्यावेळी ती म्हणते, “आवं, पिशवीचा नाय तरास व्हत, पिशवी नाय काढायची. ह्याच्यातून तीन लेकरास्नी जन्म दिलाय. पिशवी काढली तर म्या जगायची नाय, मह्या मावशीचही असंच झालंत...तुमच्या पाया पडते.” हे ऎकून नवरा मात्र कावरा बावरा होतो. तसंच तिला दम देवून, शिव्या देत, “तुह्या मायचं तुह्या, गेली वरिस झालं तुला काम व्हत नाय. लेकरं उपाशी मराया लागल्यात, आन त्या पिशवीचं काम झालय ना आता, मग कह्याला पाहिजे तुला?” असं म्हणल्यावर विमलंला तिची तीन लेकरं डोळ्यासमोर यायची. त्यांची बी लय तारांबळ उडायची. आपून काम नाय केलं तरं लेकरास्नी काय खावू घालायचं? कारखान्यावर ऊस तोडायला तर जायालाच पाहिजे. पैसं येणार कुठून? पोटाची खळगी भरण्यासाठी गर्भाचं पिशवी काढली तर काय हुईल? जर मेले तर मेले, आन जगले तर कामं करून सा-यास्नी आधार देईल. असां विचार करून विमल पिशवी काढण्यासाठी तयार झाली. पिशवी काढताना तिच्या मनात धाकधुक व्हती. पण यशस्वी रित्या पिशवी काढली. आज विमलंच वय आहे फक्त ३२, ती पिशवीशिवाय पोट भरण्यासाठी आयुष्य जगतेय... आन ऊसाच्या मोळ्या उचलतेय.....     

Friday, May 10, 2019

आत्मिक प्रेम







नरेश हा १२ वर्षाचा मुलगा इयत्ता सहावीत महानगरपालिकेच्या शाळेत शिकत आहे. तो शाळेत आठवड्यातून दोन ते तीन वेळा उशीरा जायचा. उशीरा गेला की मॅडम त्याला वर्गात उभा करायच्या. त्यामुळे तो ज्या दिवशी उशीर जायचा त्या दिवशी बाहरे मोकळ्या मैदानात झाडाखाली बसायचा. आणि साफसफाई करना-या मावश्या कसं काम करत्यात ते बघत बसायचा. बेलं झाली की दुस-या तासाला जाऊन बसायचा.  त्याला विचारलं तर तो म्हणायचा, “आईला कामात मदत करावी लागते. आठवड्यातून तीन दिवस मी मदत करतो तर तीन दिवस ताई करते. ज्या दिवशी ताई आईला मदत करते त्या दिवशी मी वेळेत येतो.” त्याला पुढं विचारलं की तुझी आई काय काम करते? तो म्हणायचा, “बाबा वारल्यापासून दुस-याच्या घरातील भांडी धुणं, आंगण स्वच्छ करणं, बागकाम करणं असली कामं करते”. आई आमच्या शॆजारच्या कॉलनीतील तीन घरी काम करते. घरातलं काम करून त्यांच्या घरी लवकर जावं लागतय. आईला खूप काम असतयं म्हणून मी व ताई मदत करतो.”  
     त्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर नरेशनं आईच्या हाताला फडक बांधलेल बघितलं. त्यांन आईला विचारलं, “आय हाताला का बांधलय?” आई त्याच्याकडं बघत, “काय नाय रं, कचार उचलताना हातात काच घुसला, म्हण हे फडक बांधलय. तुझं कशालारं तिकडं ध्यान, गपगुमान अभ्यास कर की”. असं म्हणून आई तिच्या कामला लागली. पण त्या दिवसापासून नरेशच्या मनात घोंघावत व्हत की आई साठी काय तरी कराया पाहिजे. एकतर भरपूर आभ्यास करून चांगली नौकरी मिळवण आणि आईला या कामातून मुक्त करणं.
     दुस-या दिवशी नरेश आईला कामात मदत करून नेमकं शाळेत उशीरा पोहचला. आणि नेहमी सारखा मैदानात बसला. त्या दिवशी त्याचं लक्ष त्या साफसफाई करणा-या मावशीकडे गेलं. त्यांच्या हातातील पांढरा ग्लोज घातलेला पाहून तो पळत त्या मावशीकडं गेला आणि विचारलं, “मावशी, ते हातातलं काय हाय?” मावशीनं त्याच्यकडं बघत, “काय म्हणतोस रं पोरा?” नरेश आजून जवळ जात, “आवं ते हातात घातल्याल?” हात वर करून मावशी दाखवाया लागली, “ हे व्हय, ह्याला गोलकोज म्हणतात.” नरनेश उत्सुकतेने विचारतो, “ कुठ मिळत्यात?” मावशी तीच काम करतं, “ तुला काय करायचयं रं पोरा, साळांत जाऊन बसकी, उगचं का हुंदडत फिरतोय?” नरेश मावशीला विनवण्या करीत , “ह्यो गोलकोज घातला की हाताला काय लागत नाय ना? आन मावशी, सांगा ना कुठं मिळतयं?” मावशी ह्याचा प्रश्न ऎकून चिडून जाते, “ आरंय पोरा, मास्तरनीलाच सांगलं बघ, जा वर्गात बस”. नरशे थोडसं लांब जात, “ मावशी तुमच्या पाया पडतो, सांगा की कुठ मिळतयं ते?” मावशी हात करून त्याला म्होरलं दुकान दाखवते. तो तसाच दुकानात जातो. दुकानदाराला जाऊन विचारतो. दुकानदार सांगतो ५० रुपायाला दोन ग्लोज मिळतात. हे ऎकून तो तसाच घरी जातो आणि त्याच्या गल्यात किती पैसं हायती हे बघतो त्यात तीस रूपये असतात. मग तो घरीहून आईनं खायाला ५ रूपये दिलं की तसचं ठेवतो. पुढच्या पाच दिवसात तो वीस रूपये जमा करतो. आणि ठरवतो की उद्या ग्लोज आणायचे. नेमंक त्या दिवशी ठेवलेल्या गल्यातील पैसे बघतो तर तीसचं रुपये असतात. तो विचार करतो की पन्नास रूपये झाले होते मग गेलं कुठं? तो रागारागात ताईला विचारतो, “ताई, तू गल्यातलं पैस घेतलस का?” ताई त्याच्याकडे येत, “मला काय माहित तुझा गल्ला, कुठाय तो?” नरेश रडत रडत, “ताई सांग ना, आग आय ला गोलकोज आणायच म्हणून ठेवल्यालं.. तू घेतल्सं का ? खरं सांग ना?  हे ऎकल्यावर ताई कबूल करते की वीस रुपये घेतलं व्हतं पावडारचा डबा आणायला.  मग दोघही मिळून चार दिवसात परत राहिलेलं पैसं जमवतात. आणि दुकानात जाऊन ग्लोज घेऊन येतात. संध्याकाळी आई घरी आली की नरेश म्हणतो,
“ आय, तुझ्या हाताला लागलेलं बरं झालं का?”
आई त्याच्याकडं हसत, “कारं, त्वा काय डाकटर कडं नेहचील काय मला”.
“ व्ह्य. पण बरं झालं असलं तर नाय.”
“मग कशाला इचारतोस”
नरेश बॅग मधील ग्लोज काढतं, “आय्य आग पुढच्या वेळंस तुझ्या हाताला काय बी लागणार नाय, तू डोळं बंद कर.”
      आई मात्र नग नग म्हणत डोळं बंद करते आणि नरेश हॅन्ड ग्लोज आईच्या हातावर ठेवतो. आणि नरेश मोठ्यान म्हणतो, “आय डोळं उघड”. आई डोळं उघडते आणि बघते तर हातात ग्लोज असतात. नरेश सांगतो, “आय त्वा हातात घालून काम करायचं. म्हंजी हाताला काय बी लागणार नाय”. हे सांगताना आई नरेशकडं भारावून बघते आणि त्याचं बोलनं ऎकून तिच्या काळजाला पाझर फुटतो. ती त्याला जवळ ओढते आणि छातीशी धरत म्हणते, “माझ्या सोन्याला कुठून एवढं शाहणपण आलयं, माझ्या राज्याचा माझ्यवर किती जीव हायरं” आणि पटापटा मुकं घेतं रडायला लागते. ताई म्हणते, “आय म्या नाय काग तुला कामात मदत करतं?” आई  भावनिक होऊन तिलाही मिठीत ओढेते “व्ह्य ग माय त्वा बी लय करतेस, सोन्या सारखी लेकरं माझी.” असं म्हणून वर भिंतीकडं बघून डोळं पुसतं तिघही एकमेकांच्या कुशीत विसवतात. नरेश आईच्या पदराला बिलगून राहतो.    

Thursday, May 9, 2019

मला मोठ व्हयंचय……… पण मी गरिब हाय!!!



       ज्यावेळी कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभर फिरत असतो त्यावेळी अनेक तरूण- तरूणी बरोबर गप्पा मारण्याचा योग येतो. एकदा असंच कार्यक्रमासाठी पुणे जिल्हयातील अवसारी(खुर्द) इथ शोध ता-यांचाया कार्यक्रमा निमित्त गेलो होतो. कार्यक्रम संपला एक साधारण २२ वर्षाचा युवक  भेटायला आला आणि सांगू लागला….. सर मला माझ्या आयुष्यात खूप मोठ व्हायचय…. पण मी गरिब हाय काय करू? माझ्या मनात पहिला प्रश्न आला तो म्हणजे आर्थिक दृष्ट्या मी ही गरिबच आहे. पण नविन काही तरी करण्याचा ध्यास आहे म्हणून मला मी श्रीमंत वाटतो.  मला आता पर्यत असे अनेक मित्र भेटले कि जे गरिब असल्यामुळे शिक्षण नाही घेऊ शकले पण त्यांच्या क्षमतेनुसार त्यांनी काहीतरी काम सुरू केलं आहे. मला अनेक जणांनी विचारंल होत की आम्ही गरिब आहोत उच्च शिक्षण घेण्याची आमची आर्थिक परिस्थिती नाही. आई-वडिल मदत करू शकत नाहीत. त्यामुळे पुढील सर्व दार बंद झाली आहेत. मला MPSC/ UPSC करायचय पण पैसे नाहीत . मला वकिल व्हायचय पण पैसे नाहीत, मला अभिनेता, गायक, चित्रकार, खेळाडू किंवा अजून काही व्हायंच आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून ते मी नाही करू शकत.
      मला असं वाटत की सर्वप्रथम आपल्या डोक्यामधून हे काढून टाकु की आपण गरिब आहोत. कारण ज्याच्या जवळ बुध्दी आणि हाथपाय सकट देह आहे ते गरिब असूच शकत नाहीत. म्हणजेच ज्याच्याजवळ आतला आवाज ऎकण्याची, स्वता: मधील तारा शोधण्याची धमक आहे तो कधीच गरिब नाही होऊ शकत. कारण आजवरचा इतिहास हेच सांगत आहे. जर आपण आजूबाजूला बघितलं तर असंख्य लोक मेहनतीच काम करत आपल्या जिवनाच्या दिशाने वाटचाल करत आहेत. कदाचित त्यांच्या उत्पन्नाच साधन हे तुटपुंज असेल पण ते त्याच्यातून कष्ट करूनच खातात व आपाला घर प्रपंच चालवतात.
          जर १८ वर्षा पेक्षा जास्त वय असेल, उच्च शिक्षण घेत असाल किंवा पूर्ण केलेले असेल आणि आर्थिक विंवचनेत सापडलेल असाल तर पहिला मार्ग म्हणजे अगोदर स्वता:च्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करणं. कोणी जर तुम्हांला मदत करू पाहत असेल तर मदत आवश्य घ्या पण घेतलेल्या मदतीची परतफॆड कोणत्याही मार्गाने कधीतरी कुणाच्यातरी रुपाने करणं. फुकटच्या मदतीची अपेक्षा ठेवू नये. जिवनात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही. ती गोष्ट साध्य करण्यासाठी तीची जेवढी क्षमता आहे तेवढा मोबद्द्ला कशाच्यातरी रुपाने द्यावाच लागतो( वेळ, पैसा, ज्ञान, वस्तू, शारिरिक कष्ट) त्यामुळे आपलं करिअर ध्येय पक्कं ठरवून जगण्यासाठी लागणा-या मूलभूत गरजा पूर्ण करण आणि त्याच्या बरोबर आयुष्याचं ध्येय गाठण्यासाठी दररोज कंबर कसून उभा राहण!!! स्वत:ला गरिब कधीही म्हणू नये. कारण आपलं अवचेतन मन (Sub conscious Mind) त्याच प्रकारच्या सूचना देतं आणि आयुष्यभर आपण तसचं राहतो. अस काही विचारवंत म्हणतात जसं आपण विचार करतो तसंच आपण बनतो. म्हणून जसं आपण आहात ते आपल्या विचारामुळेच.!!!!
       त्यामुळे मी गरिब आहे असं म्हणण सोडून देवूया. त्याच्या ऎवजी मी माझ्या आयुष्यात यशस्वी होत आहे. माझी आर्थिक परिस्थिती उंचावत आहे. असचं म्हणत कृती करत राहण हे पुढच्या सहा महिन्यात आपल्या स्थिती मध्ये बद्द्ल घडवून आणेल. असं करत करत आपण हळूहळू यशस्वी झालेला असाल. जर आपण स्वत:ला गरिब समजून दुस-याची सहानुभूती घेतलीत तर काही दिवस टिकेल. पण नंतर कोणीही मदतीला येणार नाही. त्याच्या ऎवजी काम करायला तयार झालोतर सर्व लोक सहकार्यासाठी धावून येतील. असाच समाजाचा इतिहास आहे.
पेपर टाकणारा मुलगा एक वैज्ञानिक व राष्ट्रपती पदावर पोहचतो, चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होतो, पेट्रोलपंपावर काम करणार उद्योगपती होतो. तर आम्ही का नाही बदलू शकत स्वत:ला…. नक्की बदलू शकू.. सर्व सोपं आहे असा विचारा तरी करु…. सर्व काही हळूहळू बदलत जाईल. 

Tuesday, May 7, 2019

मास्तरीनबाईवर बलात्कार होतो तेंव्हा!






शांताराम गंगावणे बी.ए. बीएड असून ऊस तोडत व्हतं. त्यान्ला सारी पावनं म्हणायची.  १९९८ साली पावण्याला लोणावळ्या जवळच्या एका माध्यमिक विनाअनुदानीत शाळेवर शिकवायला घेतलं. पगार मिळत नव्हता म्हनून त्यांनी लोणवळ्यात सकाळ संध्याकाळ वडापावाची गाडी लावली. सकाळ संध्याकाळ वडापावाची गाडी चालवायची आन दिसंभर शाळेत शिकवायच. बायको बी होतकरू व्हती. तिच डि.एड झाल्याल. तीबी शिलाई मशिन शिकल्याली. कापडं शिवायची. आन संसाराला हात भार लावायची. गावाकडं पावन्याच म्हातारं आय बाप व्हतं. दोन वरीस आसं करता करता ह्यांच चांगल रूटीन लागलं. त्याच शाळेवर आजून एक जागा व्हती म्हनून पावन्यानी बायकोला संस्थापकाच्या हातापाया पडून घ्यायाला लावलं. वीस टक्के अनुदान मिळाल्यामुळं आज ना उद्या फुल पगार मिळलं ह्या आशेवर संसाराचा गाडा हाकत व्हती. ऊस तोडण्यापरीस बर हाय. चार पैस कमी का असाना पन उन्हातान्हाचा तरास नाय.
शाळेत दोघालाबी दहा हजार पगार मिळाया लागल्यावर वडापावाचा गाडा बंद केला. लोणावळ्यातून येऊन जाऊन करायची. जाण्या-येण्यासाठी जुनी मोटारसायकल घेतली. गावाकडी बी चार पैसं द्यायचा. बघता बघता दहा वर्ष झाली आन संस्थेला शंभर टक्के आनुदान मिळालं. शिक्षकांना बी फुल पगार मिळाया लागला. बारा वरीस वाट पाहिल्याच फळं आता मिळालं व्हतं. त्यांचा आनंद गगणात मावाना. गावाकडं आय-बापासाठी सिमेटच्या दोन खोल्या बांधून दिल्या.  ह्यांची लेकर इंग्लिश मिडीयम स्कूल मधी लोणावळ्यात घातली व्हती. सारं कस आता मनासारख झालंत. पन एके दिशी संस्थापकान बोलावलं आन पावन्याच्या पायाखालची जमीन सरकली. पावना कावराबावरा झाला. संस्थापकान सांगितल की रोस्टर बनवलय त्यात ती जागा दुस-या जातीला जातेय. त्याच्यामुळं दोघांपैकी एकाला नौकरी सोडावी लागलं. नाय व्हय करता करता या तिरगा मिरगीत महिना गेला. पावना गांगारून गेल्या सारख कराया लागलं. शेवटी संस्थापकान पावन्याला शाळेतून काढून टाकलं. आन त्यांच्या बायकूला निम्या पगारीवर ठिवलं. त्यांच्या जाग्यावर संस्थापकाच्या नातेवाईकातील नवीन शिक्षक घेताला. पावना मनान खचला व्हता. पन दोन सोन्यासारखी लेकरं हायती. त्यांच्याकड बघून स्वत:ला सावरत व्हता. म्हणायचा, “हाताच गेलं काय म्हनून कपाळावरचं नेहील काय कोण?” अस म्हनून त्यांनी परत बंद केलेला वडापावाचा गाडा सुरू केला. आता मातर दिसंभर वडापाव इकायच. दुस-या कुठल्या तरी साळातल्या जागा निघल्यात असं त्यांच्या मित्रान सांगितलं तर त्यांन मित्राला श्या दिवून घराच्या बाहेर लावलं. “आयुष्यात पुन्हा मातर शिक्षक व्हणार नाय. निम्म आयुष्य गेलंय. ऊस तोडलं, भंग्याचा डब्बा उचलल पन फुकटचा मास्तर व्हनार नाय. संस्थापक गांडू हायती. आमच्या रक्तावर जगत्यात. आमच शोषण करत्यात. आमच्या कष्टाचा पैसा खात्याती... मादरचोद साले...” आस म्हणायचा आन राग राग दिसलं ते भांडी फेकून द्यायचा.
कसंतरी सावरत वडापावाची गाडी चालवत स्वत:ला धीर देत बायकोच्या येणा-या पगारीवर घर चालत व्हतं. ह्याच्यात वरीस गेलं. पन त्यांची बायको आतून खचत चालली व्हती. सारखं गेल्या दोन महिन्यापासून एकटक बघायची. शाळेतून आली की तिला काय काम करतेय तेच कळायच नाय. पावनं इचारायच, “काय झालय तुला? तू आशी का वागतेयस?” पन त्या काय बोलत नव्हत्या. तीन चार महिन ओलांडलं. त्यात मातर त्या पार गळून गेल्या. कुनाला सांगावा हेच कळत नव्हतं. परमुलखातून जगायला इकडं आलाव आन काय पदरात वाडुन ठेवलय. कुनाला बोलाया जावा तर नौकरी जाईल मग काय करायच? नव-याला सांगाव तर दुसरच काय तरी हुईल. ह्याच्यात त्या बाई पार आतून पिळवटून गेल्या. शाळेत त्यांच शिकवण्यावर लक्ष लागाना. कवा कवा तर साळा  सुट्ल्याली बी कळायच नाय. आश्यात त्यांनी एक दिशी स्वता:ला संपवलं. शाळेत विज्ञानाच्या प्रयोग शाळेत विष पेऊन आत्महत्या केली.
पावन्याना तर जगूच नाय अस वाटाया लागलं. सा-या शाळेत चर्चा व्हती की संस्थापकाने जबरदस्तीने बाईंनवर अत्याचार केला व्हता. अगोदरच नव-याची नौकरी गेल्याली म्ह्णून त्या कुणालाच बोलल्या नायत. एकदा झालं दोनदा झालं त्यांनी गपचूप सहन केलं. पन पुन्हा पुन्हा हे सहन व्हतं नव्हतं. चारित्र्य हे सर्वस्व माननारी बाई तेच गेल्यावर काय म्हनून जगायच. कोणत्या तोंडान समाज्यासमोर उभा राहायच? पावन्यारावळ्यात कसं जायच? नव-याला काय सांगायच?. लेकराना कस तोंड दाखवायच? आन त्याच्या पेक्षाही कहर म्हंजी विद्यार्थ्यान समोर आत्मविश्वासनं कंस शिकवायच? या इचाराने त्या बाई गळून गेल्या आन स्वता: जिवन संपवण्याचा मार्ग जवळचा केला.
संस्थापकाने हे प्रकरण खूप शितापीने मिटवलं. त्या बाईच्या जाग्यावर दुसरी मॅडम घेतली. आन साळा सुरू राहिली.  पन आमच्या पावन्याच घर उधवस्त झालय. आयुष्य लयाला लागलंय. एवढ हुवून ही बिचारे पावने दोन निरागस लेकराकड बघत. वडापावाची गाडी लावून शाळेसमोर वडापाव इकतात आन तुटलेला संसार चालवतात. कारन संस्थापकाच्या हातात यसन व्हती आन पावन्याच्या नाकात यसन हाय.


(यसन -कादंबरी)

Sunday, May 5, 2019

जेट एअरवेज बंद, ४५ वर्षाचे गृहस्थ नैराश्यग्रहस्त...





संध्याकाळची पाचची वेळ होती. ऑफिस मधून सुटायला मनिषला अजून एक तास बाकी होता. पण मनिषच्या बायकोच्या त्याला सारखे फोन येत होते. आलेला फोन तो कधी उचलायचा तर कधी मेसेज करायचा की थोड्यावेळात फोन करतो. नेमकं त्यावेळीच त्याला काम लागलं. मनिष बॅक ऑफिस मध्ये व्यवस्थापक म्हणून काम करायचा त्यामुळे त्याला अनेक गोष्टींकडं लक्ष द्याव लागायचं. म्हणून तो बायकोचा फोन टाळायचा. ऑफिस सुटण्याची वेळ झाली त्यावेळी बायकोला फोन केला.
“हॅलो, हं बोल किती मिस्ड कॉल्स दिलेस?”
ती म्हणते, “मिस्ड कॉल्स नाही, आठ वेळा फोन केलता, तू उचलला नाहीस.”
 तो म्हणतो, “ अग राणी कामात होतो, म्हणलं फ्री झालं की तुला कॉल करावा”.
ती, डू यू रिमेम्बर?, आज माझा वाढदिवस आहे ते?”
तो हाताला फोन मानेने धरत आणि टेबलावरची फाईल ड्रावर मध्ये ठेवत,“यस राणी, अग तुला ना सरप्राईज द्यायच होतं, तू ना मध्येच गोंधळ केलास”.
ती हसत हसत म्हणते, “सांग, कितीवेळ मी माझ्या राजाची वाट बघू?”
तो, “अग, सितार असेल ना तिथे”
ती, नाहीरे... उगीच लाजतोस मुलांना..” तो, “बरं ऎक ना, तू गेटवेला पोहच, मी तिकडे येतोच ऑफिस मधून”
ती, “वाट पाहायाल लावू नकोस, अं.. आय विल रिच देअर इन हाफ आवर, ओके.. बाय..डिअर.. लव्ह यू” तो, “यस.. लव्ह यू टू.. चल.. बाय..”.
मनिष फोन ठेवतो, टेबलावरची आवरा आवरी करतो आणि निघण्याची तयारी करतो तेवढ्यात त्याच्या समोर पाच साहा ऑफिसमधील कर्मचारी येतात. त्यातील एकजण म्हणतो, “सर आपल्याला दुसरीकडे नौकरी शोधावी लागेल”, मनिष त्यांच्याकडे बघत, “ तुम्ही माझी चेष्टा करताय का? मला जायचय, उशीर होतोय, ती वाट बघत असेल तिकडे” . त्यातील दुसरा म्हणतो, “ सर घोटाळा झालाय, आपली कंपनी बंद पडतेय, आपण दिवाळ खोरीत निघालोत”. मनिष, “ तुम्ही वेडे आहात का सारे जण.. गेल्या २३ वर्षापासून मी इथ नौकरी करतोय, आसं कधीच घडलं नाही, आणि जेट सोबत तर कधीच घडणार नाही, तुम्ही मला जाऊ द्या.. नाहीतर बायको मला सोडणार नाही.” त्यांच्यापैकी एकजण मोठ्याने ओरडून, “ सर आहो, आपण जॉबलेस झालोत, खरं बोलतायत सारे, तिकडे बघा, इनहाऊस मध्ये गर्दि जमलेय.. बाहेर ही सार जमलेत.. चला तिकडे जाऊन बघू”. हे ऎकून मनिष साहेबांचा विश्वास बसाया लागला. हातातील बॅग खांद्यावर अडकवत बाहेर येतात तर समोर दोनशे लोक जमलेली दिसली. प्रत्येकाचा चेहरा पडलेला होता. प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य “हे असं कसं घडलं?” आता पुढ करायच काय? हे बघून तर मनिष साहेब जाग्यावरच बसले. बायकोचे फोनवर फोन येत होते. तिकडे बायको नटून थटून आली होती, पार्टीला जाण्याच्या तयारीने आली होती. पण मनिष काय फोन उचलत नव्हता. मनिषचं आवसन गळून पडलं होतं. त्याला दिसत होते घेतलेल्या घराचे हप्ते, मुलांची शिक्षणाची फी, म्हाता-या आई-वडिलांच आजारपण. हे सारं डोळ्यासमोर तरळत होतं. महिन्याच्या महिन्याला येणा-या पगारावर सारं चालायच पण जर कंपनीच बंद पडली तर काय होईल? आता या वयात दुसरीकडे साठ हजार पगारावर नौकरी मिळेल का?  हा विचार करत मनिष पोर्च मध्येच बसला. सुन्न होऊन जमलेल्या गर्दीकडे बघत होता. त्याला कळतंही नव्हत की फोन वाजतोय. दोन तास त्या जाग्यावरच बसून होता. बायको चिडून काय झालय, पती येणार होता पण का आला नाही.. म्हणून तिच ऑफिस कडे येते तर समोर हजारो कर्मचारी जमलेले दिसतात. ती त्या गर्दी मध्ये मनिषला शोधते. शोधत शोधत पोर्च मध्ये येते तिथे मनिष आडवा झोपलेला दिसला. ती पळत जाते त्याला उठवते, तो काहिच बोलत नाही. ती त्याला धिर देते. बाकीचेही कर्मचारी त्याला बोलण्याचा प्रयत्न करतात पण मनिष काहीच बोलत नाही.  असे मनिष सारखे सोहळा हजार कर्मचारी बेरोजगार झालेत. त्यांची घरं रस्त्यावर आली आहेत. का घडलं हे सार? कोणामुळं घडल हे असं? याच्यात कर्मचा-यांचा काय दोष? त्यातील काहीजण नैराश्यग्रस्त झालेत. कसं सावरणार हे सारं?  

पांढर भूत

        दिवस मावळतीला चालला होता. दिवसभर रानात चरलेली गुरे गोट्याकडे धाव घेत होते. रानात राब राब राबून माणसं विसाव्यासाठी घराकडे निघाले. त्याच वेळी हरिचंद्रबाबा चा हनम्या म्हशी वळवतं नदीतून पळत होता. वावभर चालून गेल्यावर माहानंदिच्या आळ्यात त्याला काय तरी दिसलं. तशी म्हैस उदळत पुढ निघाली. हनम्यान आवाज दिला “आगे ये, गुलाटे, वळ की माग... थ्रू थ्रू..........आग ये झाफरबादे....” असं म्हणत माहानंदीच्या आळ्याकडे कानाडोळा करत म्हशी माग दगूड घेऊन पळाला. तशीच म्हैस उदळत घराकडे गेली. मग हनम्यान बाकीच्या म्हशी व रेडकं हाणत घरांकडे आणली. दावनीला बांधायला सुरवात केली तेवढ्यात आजोबान हाक मारली. “हनमा, आरं ये हनमा”  आजोबाकंड दुर्लक्ष करत हनमा म्हशी बांधत होता. पण आजोबा काही केल्या ओरडायच थांबानात हे बघून हनमा चिडून म्हणाला “काय झालं बोंबलायला?” आजोबांनी हातातली काठी आदळत “आरं आज लय ऊशीर केलास जनवार बांधायला”?  हनमा दावनीतला शेण सारत म्हणाला “नदीच्या पांदीत म्हसर उदळली होती.” असं म्हणताच त्याच्या काहीतरी ध्यानात आलं म्हणून हातातलं काम सोडतं तसाच नदीकडं निघाला. पण आता  आधंर गडूप पडला व्हता. माणूस ऒळखायला येत नव्हतं. तसल्या आंधारात हनम्याने हातात काठी घेऊन नदीच्या पांदीत पळायला सुरू केलं. पांदीत पोहचल्यावर आजूबाजूला बघितलं पण कायच दिसाना. जवळच गावचा मसनवाटा होता. चारदिवस आधीच गावातील तात्या देशमुख मेला होता आणि त्याला पांदितल्या मसनवाट्यात जाळलं होत. हनम्यान इकडं तिकडं बघितलं तर त्याला तात्या देशमुखाची समाधी दिसली. त्याच्यावर हार, तुरे, समोर नारळ, निवद आणि खारिक- खोबर होतं. त्या सडलेल्या निवदाचा कसनुसा वास येत होता. म्हणून हनम्याने नाकाला हात लावला व तो त्या समाधीकडे वळला. जवळ जाऊन बघितोच तेवढ्यात माहानंदिच्या आळ्यात खडबड असा आवाज आला. तसं हनमा जाग्यावरच थांबला. श्वास रोखून धरला आणि त्या आळ्याकडं निजर फिरवायला लागला. पण लगेच तो आवाज शांत झाला. मग हनमान परत समाधी पुढच खोबर उचलायला हात लावला तर तिकडं खडबड, खडबड असा दोन वेळा आवाज आला. झटकन त्यान समाधीवरचा हात काढत आळ्याकडं मान वळवली. तसा पुन्हा आवाज बंद झाला. आता मात्र हनमा थोडा घाबरला. हातातील काठी वर करत. हळूहळू त्या माहानंदिच्या आळ्याकडं चालत राहिला. आळ्याच्या जवळ आला. आता त्याच हात पाय थर थर कापत होतं. आंधारात त्याला काय दिसतही नव्हत तरी तो तसाच खाली वाकून बघण्याचा प्रयत्न करत होता. त्या निरव शांततेत आधून मधून कुत्र इवळल्याचा आवाज यायचा. आणि एखादा दुस-या रानपक्षी ओरडायचा. कुत्र्याचा आवाज ऎकून हनमा माग वळाला. पण त्याला वाटायच की आजपर्य़ंत कवाच काही दिसंल नाही. आज नेमकी ही काय भानगड आहे. मग त्याच्या मनात विचार यायला सुरू झालं. भूत असत्यात का? आसली तर ते कशी असत्यात? माणसाच भूत लय इपितर असतय का जनावराच? आपूण समाधी म्होरचा निवद खातोय मग आपल्याला भुत धरणार का? ह्या आळ्यात तात्या देशमुखाच भुत असल का? असा विचार करत तो परत त्या आळ्याच्या जवळ गेला. खाली बसला आणि हातातल्या काठीने आळा हलवायला सुरं केलं. तस आतून “खडबड, खडबड” असा आवाज आला. आणि पांढर कायतरी पुढं सरकल्या सारख दिसलं. हे बघून हनमाची चड्डी जाग्यावरच वली झाली आणि जोरात ओरडला “भूतSSSSSSSSSS”  असं दोन चार वेळा आरोळ्या ठोकत गावाकडे पळायला लागला. मोठ्या दगडाला ठेचकाळून पुन्हा खाली पडला पुन्हा उठला व किंचाळत गावाच्या दिशेन पळायला लागला. “आयव... आयव...लय मोठ्य भुत हाय.... पाढंर हाय..” असं म्हणत तो गावात आला. त्यांच्या घारम्हॊर येऊन इवळाया लागला, “ आयव... आयव.. पांदीत भूत हाय... मला धरलय... आळ्यात बसलय”. हे ऎकून गावातली दहापाच माणसं जमा झाली. त्याला धरून बसवीलं. त्याच्या अंगावर पाणी मारलं. त्याला शांत केलं. गावातल्या जाणत्या जनाप्पानं म्होरं येऊन धोतराचा खोसा धरत हनमाला विचारलं “हनमा, आरं  नेमक काय बघितलं?”  हनमा घाबरत घाबरत जनाप्पाच्या तोंडाकड बघत “पांढर भूत बघितलय”. जनाप्पा दरडावून “आर भूत नसलं, दुसरं काहीतरी असलं”. हनमा सा-या माणसांकडं बघत “आवं म्या डोळ्यानं बघितलय... विश्वास नसला तर चला माझ्यासंग म्या दावतो तुम्हांला”. आतामात्र सारीच माणसं टरकली पण जनाप्पा धाडसांन म्हणाला “चला आपूण जाऊनच बघू”. असं म्हणून दहा-बारा माणस नदिच्या पांदीकडं निघाली. हनमा हातात काठी घेऊन सा-यांच्या मध्ये चालतं होता.
        पांदीत भूत आहे ही बातमी सा-या गावात पसरली होती. सा-या गावाला वाटाया लागलं की नेमक हे कुणाच भूत आहे? तात्या देशमुखाच तर नसल ना? पण कोणच बोलाया तयार नव्हतं. काही माणस आळ्याकडं निघाली तर काही गावाच्याकडंला येऊन ऊभा राहिली. दहा- बाराजण मसनवाट्यात आली.    जनाप्पा पुढं होता. आळ्याच्या दहा फूट लांबूनच हनमा म्हणला “आपून नाही येत तुम्ही व्हा म्होरं”. हनमा थांबताच घाबरट दोनचार माणसं जाग्यावरच थांबली. जनाप्पांन हातात घेतलेला धोतराचा खोसा सोडत, “ आरं, भडवीच्यानू पुढं व्हा, माग काय आंडी घोळताव काय?” मग मात्र हनमा धाडसान हातातील काठी घेऊन पुढं आला. लांबूनच सर्वांना डोळ्यानं आणि हातान खुनवत “गप्प बसा, पायाचा आवाज करू नका. त्या आळ्याकडं लक्ष द्या, मी काठी टाकलीय तिकडं बघा. जनाप्पा बॅटरी तिकडं लावा.” जनाप्पाने आळ्याकडे बॅटरी लावली. हनमा काठी आळ्यात टाकून हलवाया लागला. पण आळ्यात काहीच दिसना. मग जनाप्पाला धिर आला. आणि सारीजण पुढं सरकत सरकत आळ्याच्या जवळ आली. काहीजण खाली बसली. पण आळ्यात काहीच नव्हत. सारीजण हनम्या ला वेड्यात काढाया लागली. जनाप्पा चिडून “ हनम्या, फसवील की सगळ्याला” .  हनमा गळ्याला हात लावत “आप्पा आईच्यान सांगतो म्या ह्याच आळ्य़ात पांढर भुत बघितलय”. काही दिसलं नाही म्हणून सारी जण आळ्याच्या पुढच्या बाजून रस्त्याकडं निघाली तर जनाप्पाला बॅटरीच्या उजेडात पांडर काय तरी घसरल्याल दिसलं. तसा जनाप्पा एकदम ओरडला “ थांबा हाय काय तरी..” असं म्हणून बॅटरी त्या पुढच्या आळ्यावर लावली तर पांढर प्लॅस्टीकच कॅन हळू हळू पुढं सरकत होतं. आता मात्र सा-यांच धाब दणाणलं. सारीजणच माग वळली. कोण वरडत गावाकडं पळाया लागलं. तर कोण जाग्यावरच बसलं. कोण चड्डीत मुतलं तर कोण हागलं. पण जनाप्पा धिटाईन त्या कॅनाच्या माग बॅटरी लावून निघाला. तोपर्यंत सा-या गावात बोंबाबोंब उटली की पांदीत कॅनात भुत आहे. गावातल्या बायामाणसाची पांदीकड रांग सुरू झाली. रात्रीच्या बारा वाजल्या असाव्यात. गावातला पुजारी ही आला. पुजाच सामान घिऊन आली. कोप-याला जागा बघून पुजा सुरू झाली. तिकंड हनमा, जनाप्पा आणि दोन चार माणसं त्या भुताच्या माग निघाली. जनाप्पा एकदम जवळ गेलं. कॅन सरकायच बंद झालं होत. तस जनाप्पा थांबला. हातातल्या काठीन कॅनावर जोरात ठोका मारला. तसं कॅन जाग्यावरच आदळलं. एका जाग्यावरून दुस-या जाग्यावर उड्या माराया लागलं. माणसांनी भूताला घेरलं. आणि त्या कॅनातील भूताला बदडाया लागली.. दोनचार ठोक्यात कॅनातून मुंगूस बाहेर पडलं. तसं जनाप्पा आणि हनमा एकमेकाकडं बघत मोठ्यान हसली... आणि म्हणाली “भूत पळालं.... चला माघरी”.

"यसन"


स्वार्थी राजकारणी लोंकानी बुद्धीच्या जोरावर यसनाचं दावं घेतलं हाती !
धर्म व जात व्यवस्थेनं बनवली कालबाह्य नाती !
अन तळागाळातील हजारो लोकांची केली माती !
विसाव्या शतकात शिक्षण बनलं साथी
अन तळागाळातील लाखो लोकांची सुरु झाली प्रगती !

चंगळवाडीतील सायबा मूळ म्हशीला रेडकू!!


आव राम राम मंडळी ,
आज काल चंगळवाडीत काय घडलं याचा नेम नाही हो , त्याच झालं असं म्या आपला माझं काम करत होतो तर आमच्या वरच्या गल्लीच्या मावशी आल्या . अन आल्या आल्या छातीवर हात ठिवून वरडुन वरडुन सांगाया लागली की " यंदा ऊस लय पिकाला तो आमच्या सायबामुळंच , आमच्या गल्लीत संडास बांधलं ते सायबानी , म्हातारी माणसं संडासात बसायलागली सायबामुळं , परवा दवाखान्यात औषध दिली ते आमच्या सायबामुळं , आन हे तर कायच नाय , आमच्या म्हशीला रेडकू झालं ते बी सायबामुळंच ... " हे एकूण माझं काळीजच उडया लागलं , बाकी सार ठीक हाय पण " सायबामुळं म्हशीला रेडुकु " आव माणसं कशाचं मोठेपण घ्यात्याल अन देत्यात हे त्यांची त्यांनाच ठाव ...
चांग्या ( चंगळवाडी )

भावनेच्या भरात शहाणपण हरवलाय !!!


ह्याच झालं असं आमची वाडीतील मावशी मधल्या आळीत फिरत गेली अन नेमकं तिला सभा ऐकायला मिळाली . तीन पक्क ठरवलं व्हतं कि मतदान हे विकासाला करायचं . आन तिला विकास भावनेच्या पदराआड लपलेला दिसला . थोरल्या सायबानी जोरजोरात वरडुन सांगितलं व्हतं कि आपला विकास हा आपल्या वाडीचा विकास . त्यात सर्वानी राजधर्म पाळला पाहिजे . आपल्या राष्ट्र विषयी प्रेम असलं पाहिजे ते आपण विकासाला मत देऊन दाखवलं पाहिजे.
हे सारं आमच्या मावशीला खरं वाटलं अन तीन पुन्हा एकदा विकासाला मतदान केलाय ... मला तर विकास दिसतच नाही पण भोळ्या भाबड्या चंगळवाडीतील मतदारांना भावनेच्या भरात शहाणपण सुचलंय का ? कळलं लवकरच !
चांग्या
चंगळवाडी

चिमुकली छकुली हरवलीय..


          कोपीवरची जाणती माणसं पहाटचं ऊस तोडायला फडात गेलती. चिमुकली छकुली वय वर्ष आठ, तिच्या लहान बहिणीला कोपीवर खेळवत होती. आज लवकर माघारी यायचय म्हणून छकुलीच्या आईन छकुलीला आज लहान बहिणीसोबत कोपीवरचं ठिवलय. माघारी येईपर्यंत शॆण काडून, झाडून लोटून करेन म्हणून आई कवबवा छ्कुलीला कोपीवरच ठिवायची. आन त्या दिशी तर मकरसंक्रात व्हती. तसं ऊसतोडणा-या बायांना कुठून आली मकरसंक्रांत आन बाकीच सन? ऊठायच व दररोज फडात जायच. तसं आज ही गेल्याली. 
       आई गेल्यावर छकुलीने पाणी भरलं. पुरणपोळ्यांचा स्वंयपाक करण्याची तयारी केली. आणि आमटीला कडीपत्ता आणण्यासाठी शेजारच्या रानात गेली. लहान बहिणीला सोबत घॆऊन रानात कडीपत्ता शोधू लागते. घाबरत घाबरत हिकडं तिकडं बघत बहिणिला काकाला घेऊन कडीपत्त्याच्या झाडाजवळ जाते. आजूबाजूला माळव्याच शेत असंत. जवळच बागायतदाराचा गोटा असतो. अधून मधून टिवटिवीचा आवाज येतो. छकुली इकडे तिकडे बघून बहिणीला खाली उतरवते आणि कडीपत्ता तोडायला सुरू करते. दोन फांद्या तोडताच तिला आनंद होतो. ती घेऊन माघारी वळणार तेवढ्यात आचानक बागायतदार समोर येतो आन ऒरडतो, “येSSS कारटे कुणाची हाईस?” हा आवाज ऎकून ती पळून जाण्याचा प्रयत्न करते. पण सोबत लहान बहिण असल्यामुळे थांबते. बागायतदार म्हणतो, “किती मळवं चोरलं? आन तिच्या कोवळ्या दंडाला धरून शेताच्या कडाला असणा-या गोट्यात घेऊन जातो. छकुलीला घिऊन जाताना तिची लहान बहिण रडते आन रडत रडत म्हणते “ सोला माझ्या अक्काला, ह्यो घ्या तुमचा कलीपत्ता”. बागायतदार त्या मुलीच काहीही न ऎकता त्या आठ वर्षाच्या छकुलीला जनावरांच्या गोट्यात कोंडतो. लहान बहिण रडत रडत कोपीवर जाते. तो पर्यंत फडातून आई-बाप आले होते. 
         लहान मुलगी रडतेय आणि सांगतेय. “अक्काला कोंडलय”. आईबाप धावत पळत त्या गोट्याकड जातात. तो बागायतदार म्हणतो, “ हाय तुमची पोरगी माझ्याकडं, फुकटच माळवं तोडायला लावताव आन तुम्ही बसताव मजा मारत”. हे ऎकन छकुलीची आई म्हणते, “बागायतदार, तुमच्या पाया पडते, पोरीला सोडा”. बागायतदार म्हणतो, “चार वाढ्यांच भेळं आणा तवा सोडतो”. छकुलीचा बाप पळत कोपीवर जातो चार भेळं घॆऊन येतो. बागायतदाराच्या समोर टाकतो. आन छकुलीला घॆऊन कोपीवर जातात. तेंव्हापासून छकुली पुरूष दिसला कि घाबरते आन गप्प खाली मान घालून बसते. उमलत्या वयातच तिच आयुष्य हिरमूसलय. का?

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts