दिवस मावळतीला चालला होता. दिवसभर रानात चरलेली गुरे गोट्याकडे धाव घेत होते. रानात राब राब राबून माणसं विसाव्यासाठी घराकडे निघाले. त्याच वेळी हरिचंद्रबाबा चा हनम्या म्हशी वळवतं नदीतून पळत होता. वावभर चालून गेल्यावर माहानंदिच्या आळ्यात त्याला काय तरी दिसलं. तशी म्हैस उदळत पुढ निघाली. हनम्यान आवाज दिला “आगे ये, गुलाटे, वळ की माग... थ्रू थ्रू..........आग ये झाफरबादे....” असं म्हणत माहानंदीच्या आळ्याकडे कानाडोळा करत म्हशी माग दगूड घेऊन पळाला. तशीच म्हैस उदळत घराकडे गेली. मग हनम्यान बाकीच्या म्हशी व रेडकं हाणत घरांकडे आणली. दावनीला बांधायला सुरवात केली तेवढ्यात आजोबान हाक मारली. “हनमा, आरं ये हनमा” आजोबाकंड दुर्लक्ष करत हनमा म्हशी बांधत होता. पण आजोबा काही केल्या ओरडायच थांबानात हे बघून हनमा चिडून म्हणाला “काय झालं बोंबलायला?” आजोबांनी हातातली काठी आदळत “आरं आज लय ऊशीर केलास जनवार बांधायला”? हनमा दावनीतला शेण सारत म्हणाला “नदीच्या पांदीत म्हसर उदळली होती.” असं म्हणताच त्याच्या काहीतरी ध्यानात आलं म्हणून हातातलं काम सोडतं तसाच नदीकडं निघाला. पण आता आधंर गडूप पडला व्हता. माणूस ऒळखायला येत नव्हतं. तसल्या आंधारात हनम्याने हातात काठी घेऊन नदीच्या पांदीत पळायला सुरू केलं. पांदीत पोहचल्यावर आजूबाजूला बघितलं पण कायच दिसाना. जवळच गावचा मसनवाटा होता. चारदिवस आधीच गावातील तात्या देशमुख मेला होता आणि त्याला पांदितल्या मसनवाट्यात जाळलं होत. हनम्यान इकडं तिकडं बघितलं तर त्याला तात्या देशमुखाची समाधी दिसली. त्याच्यावर हार, तुरे, समोर नारळ, निवद आणि खारिक- खोबर होतं. त्या सडलेल्या निवदाचा कसनुसा वास येत होता. म्हणून हनम्याने नाकाला हात लावला व तो त्या समाधीकडे वळला. जवळ जाऊन बघितोच तेवढ्यात माहानंदिच्या आळ्यात खडबड असा आवाज आला. तसं हनमा जाग्यावरच थांबला. श्वास रोखून धरला आणि त्या आळ्याकडं निजर फिरवायला लागला. पण लगेच तो आवाज शांत झाला. मग हनमान परत समाधी पुढच खोबर उचलायला हात लावला तर तिकडं खडबड, खडबड असा दोन वेळा आवाज आला. झटकन त्यान समाधीवरचा हात काढत आळ्याकडं मान वळवली. तसा पुन्हा आवाज बंद झाला. आता मात्र हनमा थोडा घाबरला. हातातील काठी वर करत. हळूहळू त्या माहानंदिच्या आळ्याकडं चालत राहिला. आळ्याच्या जवळ आला. आता त्याच हात पाय थर थर कापत होतं. आंधारात त्याला काय दिसतही नव्हत तरी तो तसाच खाली वाकून बघण्याचा प्रयत्न करत होता. त्या निरव शांततेत आधून मधून कुत्र इवळल्याचा आवाज यायचा. आणि एखादा दुस-या रानपक्षी ओरडायचा. कुत्र्याचा आवाज ऎकून हनमा माग वळाला. पण त्याला वाटायच की आजपर्य़ंत कवाच काही दिसंल नाही. आज नेमकी ही काय भानगड आहे. मग त्याच्या मनात विचार यायला सुरू झालं. भूत असत्यात का? आसली तर ते कशी असत्यात? माणसाच भूत लय इपितर असतय का जनावराच? आपूण समाधी म्होरचा निवद खातोय मग आपल्याला भुत धरणार का? ह्या आळ्यात तात्या देशमुखाच भुत असल का? असा विचार करत तो परत त्या आळ्याच्या जवळ गेला. खाली बसला आणि हातातल्या काठीने आळा हलवायला सुरं केलं. तस आतून “खडबड, खडबड” असा आवाज आला. आणि पांढर कायतरी पुढं सरकल्या सारख दिसलं. हे बघून हनमाची चड्डी जाग्यावरच वली झाली आणि जोरात ओरडला “भूतSSSSSSSSSS” असं दोन चार वेळा आरोळ्या ठोकत गावाकडे पळायला लागला. मोठ्या दगडाला ठेचकाळून पुन्हा खाली पडला पुन्हा उठला व किंचाळत गावाच्या दिशेन पळायला लागला. “आयव... आयव...लय मोठ्य भुत हाय.... पाढंर हाय..” असं म्हणत तो गावात आला. त्यांच्या घारम्हॊर येऊन इवळाया लागला, “ आयव... आयव.. पांदीत भूत हाय... मला धरलय... आळ्यात बसलय”. हे ऎकून गावातली दहापाच माणसं जमा झाली. त्याला धरून बसवीलं. त्याच्या अंगावर पाणी मारलं. त्याला शांत केलं. गावातल्या जाणत्या जनाप्पानं म्होरं येऊन धोतराचा खोसा धरत हनमाला विचारलं “हनमा, आरं नेमक काय बघितलं?” हनमा घाबरत घाबरत जनाप्पाच्या तोंडाकड बघत “पांढर भूत बघितलय”. जनाप्पा दरडावून “आर भूत नसलं, दुसरं काहीतरी असलं”. हनमा सा-या माणसांकडं बघत “आवं म्या डोळ्यानं बघितलय... विश्वास नसला तर चला माझ्यासंग म्या दावतो तुम्हांला”. आतामात्र सारीच माणसं टरकली पण जनाप्पा धाडसांन म्हणाला “चला आपूण जाऊनच बघू”. असं म्हणून दहा-बारा माणस नदिच्या पांदीकडं निघाली. हनमा हातात काठी घेऊन सा-यांच्या मध्ये चालतं होता.
पांदीत भूत आहे ही बातमी सा-या गावात पसरली होती. सा-या गावाला वाटाया लागलं की नेमक हे कुणाच भूत आहे? तात्या देशमुखाच तर नसल ना? पण कोणच बोलाया तयार नव्हतं. काही माणस आळ्याकडं निघाली तर काही गावाच्याकडंला येऊन ऊभा राहिली. दहा- बाराजण मसनवाट्यात आली. जनाप्पा पुढं होता. आळ्याच्या दहा फूट लांबूनच हनमा म्हणला “आपून नाही येत तुम्ही व्हा म्होरं”. हनमा थांबताच घाबरट दोनचार माणसं जाग्यावरच थांबली. जनाप्पांन हातात घेतलेला धोतराचा खोसा सोडत, “ आरं, भडवीच्यानू पुढं व्हा, माग काय आंडी घोळताव काय?” मग मात्र हनमा धाडसान हातातील काठी घेऊन पुढं आला. लांबूनच सर्वांना डोळ्यानं आणि हातान खुनवत “गप्प बसा, पायाचा आवाज करू नका. त्या आळ्याकडं लक्ष द्या, मी काठी टाकलीय तिकडं बघा. जनाप्पा बॅटरी तिकडं लावा.” जनाप्पाने आळ्याकडे बॅटरी लावली. हनमा काठी आळ्यात टाकून हलवाया लागला. पण आळ्यात काहीच दिसना. मग जनाप्पाला धिर आला. आणि सारीजण पुढं सरकत सरकत आळ्याच्या जवळ आली. काहीजण खाली बसली. पण आळ्यात काहीच नव्हत. सारीजण हनम्या ला वेड्यात काढाया लागली. जनाप्पा चिडून “ हनम्या, फसवील की सगळ्याला” . हनमा गळ्याला हात लावत “आप्पा आईच्यान सांगतो म्या ह्याच आळ्य़ात पांढर भुत बघितलय”. काही दिसलं नाही म्हणून सारी जण आळ्याच्या पुढच्या बाजून रस्त्याकडं निघाली तर जनाप्पाला बॅटरीच्या उजेडात पांडर काय तरी घसरल्याल दिसलं. तसा जनाप्पा एकदम ओरडला “ थांबा हाय काय तरी..” असं म्हणून बॅटरी त्या पुढच्या आळ्यावर लावली तर पांढर प्लॅस्टीकच कॅन हळू हळू पुढं सरकत होतं. आता मात्र सा-यांच धाब दणाणलं. सारीजणच माग वळली. कोण वरडत गावाकडं पळाया लागलं. तर कोण जाग्यावरच बसलं. कोण चड्डीत मुतलं तर कोण हागलं. पण जनाप्पा धिटाईन त्या कॅनाच्या माग बॅटरी लावून निघाला. तोपर्यंत सा-या गावात बोंबाबोंब उटली की पांदीत कॅनात भुत आहे. गावातल्या बायामाणसाची पांदीकड रांग सुरू झाली. रात्रीच्या बारा वाजल्या असाव्यात. गावातला पुजारी ही आला. पुजाच सामान घिऊन आली. कोप-याला जागा बघून पुजा सुरू झाली. तिकंड हनमा, जनाप्पा आणि दोन चार माणसं त्या भुताच्या माग निघाली. जनाप्पा एकदम जवळ गेलं. कॅन सरकायच बंद झालं होत. तस जनाप्पा थांबला. हातातल्या काठीन कॅनावर जोरात ठोका मारला. तसं कॅन जाग्यावरच आदळलं. एका जाग्यावरून दुस-या जाग्यावर उड्या माराया लागलं. माणसांनी भूताला घेरलं. आणि त्या कॅनातील भूताला बदडाया लागली.. दोनचार ठोक्यात कॅनातून मुंगूस बाहेर पडलं. तसं जनाप्पा आणि हनमा एकमेकाकडं बघत मोठ्यान हसली... आणि म्हणाली “भूत पळालं.... चला माघरी”.

No comments:
Post a Comment