Monday, July 22, 2019

प्रत्येकाला आपलं करून आधार देणा-या ताईंच्या आत्म्यास शांती मिळॊ!!!




प्रत्येकाला आपलं करून आधार देणा-या ताईंच्या आत्म्यास शांती मिळॊ!!!
माणसं आपली माणसं शोधतात पण प्रत्येकालाच आपलं मानून जगण्यासाठी शिक्षण देवून आधार देणा-या निर्मलाताईनंच्या माणुसपणाला सलाम! त्यांच्या आत्म्यास शांती मिळॊ!
कोणच पोहचत नाही त्या स्थळी
तिथे निर्मलाताईनी उभा केली वनस्थळी
निराधार माणसांचा जाऊ नये बळी
म्हणून माणुसकी जोपासणा-या विचारांची उभा केली फळी!
म्हणून जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी आम्हांला दिसतात निर्मलाताई आणि त्यांची वनस्थळी!

     विद्यार्थी साहाय्यक समितीच्या परिसरात माणुस घडवण्याची ताकत आहे. गेल्या ६० वर्षापासून तिथली मंडळी न थकता, न हरता, शांत, संयमाने ग्रामिण भागातून आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आधार देतात. त्याची सुरूवात डॉ. आच्युत आपटेनी केली. नंतर अनेक मान्यवर जोडले गेले. त्यात निर्मलाताई पुरंदरे हे आघाडीवर होत्या. ताईनी विद्यार्थी साहाय्यक समितीतील प्रत्येक विद्यार्थी आपला माणून त्याच्यावर माणूसपणाचे संस्कार केले त्यामुळेच आज अनेक विद्यार्थी घडत आहेत. आणि त्यांच्या पायावर उभा राहात आहेत. ज्यावेळी ताई समितीच्या प्रागंणात यायच्या त्यावेळी आम्हांला आईच जाणवायची त्यांच्या व्यक्तीमत्वात. प्रेमाने, मायाचेच्या भाषेत समजावयाच्या अनेक गोष्टी. आजही मला तो प्रसंग आठवतो की आम्ही, “ इंडिया इज माय कंट्री” ही एकांकीका बसवली होती. तो प्रयोग पाहायला ताई आल्या होत्या.  प्रयोग झाल्यावर आम्ही त्यांना भेटायला गेलो तर ताईंनी प्रश्न केला की “ही एकांकीका का निवडली?” आम्ही बुचकुळ्यात पडलो. नंतर त्या म्हणाल्या “चांगला प्रयत्न आहे, पण जरा सकारात्मक दिशा देणारं साहित्य निवडा. सातत्याने गरिबीची टिंगलं करणारे अनेक कार्यक्रम बघत आसतो या देशात, पण कलात्मक जे विचारांना दिशा देईल असं काहीतरी सादर करा. गरिबीमधीलं माणसांत ही माणुसपणाची श्रीमंती असते ते बघायला शिका म्हणजे अजून चांगली नाटकं बसवता येतील.”  त्यावेळी कॉलेजच्या वयात काही जाणवलं नाही पण आज डायरी काढून बघितली तर ताईंचे विचार वाचून मन सुन्न झालं. एवढी मोठी दूरदृष्टी त्यांच्या विचारात होती म्हणूनच ताईंनी माहाराष्ट्रात ११ हजार पेक्षा जास्त बालवाडी प्रशिक्षीक महिला उभ्या केल्या. आज हजारो बालक या अंगणवाडीतून शिकत आहेत. किंबहुना जिवनातील पहिला पाढा गिरवत आहेत.  त्यामुळे ताईंच्या व्यक्तीमत्वाला अभिवादन!!!

Sunday, July 7, 2019

सिमाभिंतीखाली दडपून जिव गेला, पण आत्मा अजून गुदमरतोय! (समीरचं काय चुकलं?)




     
सारी लाडानं त्याला सम्या म्हणायची. पण त्याचं नाव समीर. सम्याला १० वीला ८८% मार्क मिळाले. आईबाप लय खुश झालेलं. त्या दिवशी वस्तीत पेढं वाटलेलं. वस्ती म्हंजी जिथ बांधकाम सुरू आसलं तिथ २०-२५ कुटूंबाची बाजुला पत्रा ठोकून उभा केलेली घरं. तिथ ना टॉयलेटची सुवीधा, ना बाथरूमची सोय, असं म्हणतात मजुराला कशाला पाहिजे आसल्या सोई? पिण्याचं पाणी बाधंकामाला वापरलं जाईल पण मजुरांना प्यायला दिलं जात नाही. जिथून मिळलं तिथून पाणी आनावं लागत.  बाजूनच वाहाणा-या गटारींची दुर्गंधी पण आसल्या कशाचीही फिकीर न करता हे काबाड कष्ट करणारे भारत देशातील मजुर रांत्रादिवस काम करतात. त्यांच्यापैकीच हे समीरचे आईवाडिल. त्याचे आईवडिल बिगारी काम करायचे. आज ह्या मिस्त्रीच्या हाताखाली तर उद्या त्या मिस्त्रीच्या हाताखाली. कवा कामं मिळायचं तर कवा मिळत नव्हत. पण हार न मानता काबाड कष्ट करीत करीत समीरला आन त्याच्य मोठ्या भावाला शिक्षण दिलं पण मोठा भाऊ काय शिकला नाही. तो आईवडिलांसोबत बिगारी काम कराया लागला. त्याल काम बी जमाया लागलं म्हणून २० व्या वर्षीचं त्याच लगीन १७ वर्षाच्या मुलीसोबत केलं. आन दोघंबी जोडीन कामाला लागली. म्हणून  सा-यांना वाटायचं की सम्यांन तरी शिकाव आन इंजिनिअर नाही तर ठेकेदार व्हाव. सम्याच्या आईबापाला बी लय वाटायच की माझ्या पोरांन सायब व्हाव. दहावीला ८८ टक्के मार्क मिळाल्यामुळं सारीजण त्यांच कौतुक करीत व्हती. त्याला बी वाटायच आपुन चांगल शिकुन इंजिनिअर व्हाव. म्हणून त्यांन चौकशी करून डिप्लोमा सिव्हील इंजिनिअरिंगच्या कोर्सला प्रवेश घ्यायचं ठरवलं. त्याला वाटायाचं की बिल्डींगी बाधंणारा इंजिनीअर व्हाव. कारण तो कवा बवा आईबापासोबत बांधकामावर कामाला जायचा तवा  त्यांनं पाहिला होता ठेकेदाराच आन इंजिनिअर चा रूबाब, म्हणून त्याच्या मनात बसलं व्हतं की आपण मोठा इंजिनिअर व्हयचं.  
     त्याला आसं बी वाटायचं की आपुन सा-या घरांच पांग फेडनार हाय. म्हणून तो चिकाटीन अभ्यास करायचा. प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्यामुळं सारी कागदपत्र जमवण्याची धावपळं सुरू झाली. रहिवासी दाखला आणाया त्याच्या दादाला (भाऊ) मुळं गावी म्हंजी जालन्याला पाठवलं. शाळेतून शाळा सोडल्याचा दाखला आन मार्कलिस्ट मिळालं व्हतं. उत्पन्नाचा दाखाला काढण्यासाठी सेतू कार्यालयात फे-या मारत व्हता. त्या दिवशी झेरॉक्सच्या दुकानात मार्कलिस्टला लॅमिनेशन करून घॆतलं. सारी शिकलेली माणसं सांगायची की “आयुष्याची डिग्री हाय, मार्कलिस्टला जपावं लागतय, पावसात भिजू नाय म्हणून लॅमिनेशन करून ठिवं” म्हणून सम्यान मार्कलिस्टला लॅमिनेशन केलं. पण बघाना देह टिकवण्यासाठी देहाला लॅमिनेशन नाही करता येतं. तिथून तो डिप्लोमाला आडमिशेन घेण्यासाठी कॉलेजला गेला. सिव्हील इंजिनिअरिंग चा आर्ज घेतला. आता तो खूश होता. सरांनी सांगितल्या प्रमाणे राहिलेली कागदपत्र तो पुढच्या आठवड्यात आणून देतो असं म्हणून तो घरी आला. आईन विचारलं, “झालं का रं आडमिशेन?” तो हसत म्हणाला, “ नाही आजुन, सारी कागदपत्र घिऊन बोलवलय दोन दिवसात.” त्याचा दादा गावाकडून रहिवासी प्रमाणपत्र आणाया गेलता. तो आला की सम्याच आडमिशेन होणार व्हतं. आई वडिलानां सारं समजावून सांगितलं.
आता रात्रीच्या आठ वाजल्या होत्या. पावसाची रिपरिप सुरू होती. दोन दिवसापासून पाऊस उघडला नव्हता. आगूदरच पाणी नाही म्हणून तरसलेली लोकं पाऊस आलाय म्हणून आनंदी व्हती. पत्र्याच्या शेडमधी पावसाचं पाणी येऊ नाय म्हणून ताडपत्री लावली व्हती. त्याच्यामुळं आडूका मिळायचा. कुठं बुठं टिपकायचं म्हणून पातेलं, तांब्या, बादली ठिवली व्हती. लाईट नसल्यामुळं आंधारात किती वलं झालय हे काय दिसतं नव्हतं. त्याच्यातचं जेवायला बसली. आईन सा-यांस्नी वाढून घेतलं. थोरल्या सुनानं सैपाक केला व्हता. दिराला मार्क लय पडल्यात म्हणून आज गोड गुळाची खिर केलती. सोबत भजं आन पापड्या कुरवड्या तळल्या व्हत्या. सम्या आईकडं बघत म्हणला, “जेवायला दादा असता तरं बरं झालं असतं. पण आई म्हणली, “तो माघारी आला की पुन्हा एकदा करु की खिरं, त्याच काय, आज तुला आवडती म्हणून केली.”  आसं बोलत बोलत आनंदात जेवणं झाली. वडिल मध्येच म्हणलं, “सम्या, उद्या लय काम हाय, तू चल आमच्या संग, दादा येईपस्तोर, तो दुपार पस्तोर येईल”. लगेच सम्या उदास हुवून,“नाय, मला ते आडमिशेनच बघायचय”. असं म्हणल्यावर आई म्हणली, “बरं बाबा, बग जा, ह्या कामात सारी हाडाची काडं झाली, तू शिकलास तर आमचं पागं फिटलं”.
     आसं बोलता बोलता हातरून टाकलं आन झोपाया लागली. आता पावसाची धार वाढली व्हती. चार दिवसापासून येणारा हा पाऊस जमिनीत चांगलाच मुरला व्हता. लावलेला दिवा तेवत व्हता. समीरंन झोपन्या अगोदर सारी कागदपत्र काढून दिव्याच्या उजेडात बघितली. मार्कलिस्ट आता चांगल दिसत व्हतं. समीर तिनदा तिनदा त्या मार्कांकड बघायचा आन आतल्या आत हसायचा. मध्येच आभाळ गर्जल्याचा आवाज यायचा. विज चमकल्यामुळं वस्ती त्या अंधारात उठावून दिसायची. जणू काय विज सम्याचं कौतुक करतेय.  समीरंन एकदा बाहेर डोकावून बघितलं, आंधार काळाकुट्ट पडला होता. आजूबाजुला जाणा-या वाहनांचा आवाज यायचा. लांबवर कुत्र भुकल्याचा आवाज यायचा. त्यामुळं सम्याला भिती वाटली. आता सारी शांत निपचित झोपली होती. सम्यानही कागदपत्राची पिशवी कोप-याला ठेवली आन हातारलेल्या पोत्यावर झोपला.
      यातल्या कुणालाच वाटलं नाय की ही आजची रात्र आपली शेवटीची रात्र असणार हाय. ही काळ रात्र, झिमझिमनारा हा पाऊस, हा आभाळ गर्जल्याचा आवाज, आन विजांचा प्रकाश आम्हची चित्ता उद्या झाळनार हाय. यातलं कुठलही काहीही मनात न येता ते निश्चीत धरणीमायेच्या कुशीत निजले होते. पण काळाच्या व्यवस्थेन त्यांच्यावर घाला केला आन मध्यरात्रीच्या सुमारास उच्चभ्रूंच्या संरक्षणासाठी बांधलेली सिमाभिंत कोसळली ती दुस-यांना घरात राहात यावं म्हणून घर बांधणा-या कष्टकरी मजुरांच्या घरावर आन त्यात त्यांच्या स्वप्नाबरोबर त्यांची आयुष्य भिंतीच्या ढिगा-याखाली कधी न उठण्यासाठी गाडली गेली. पण त्यांच्यातील सम्याच आत्मा आजून गुदमरतोय, आजूबाजूला फिरतोय, आन त्याचं मार्कलिस्ट त्याच्याकडं बघून त्याला खुणवतय...
       सिमाभिंतीखाली ८८% मार्कस दिसणारं दहावीच्या बोर्डाचं मार्कलिस्ट दिसतयं. आन त्या मार्कलिस्टच्या भोवती सम्याचा (समीर) आत्मा फिरतोय. आन गुदमरतोय, मार्कलिस्ट त्याच्याकडं बघून म्हणतय, “आता काय करशील या मार्काचं? मला बी सोबत घिऊन चल. इथं राहुन माझा तरी काय उपयोग?” सम्या त्याला म्हणतो, “आर मार्कलिस्टा, मला जायची इच्छा नाय रं पण बळचं जावा लागतय. पण तुला कसा नेहू र? तू तिथचं पडून राहा निपचीत. कुणी तर उचलून तुला कच-यात फेकतील. तसं म्हणाव तर आपून आगुदरच कच-यात हाव”. तेवढ्यात समीरच्या आत्म्याला बाजून पाचसहा माणसं आलेली दिसली जी भिंतीखाली दबलेलं सामान आन माणसांना बाहेर काढत व्हती. त्यावेळी त्याचं लक्ष आईकडं गेलं, तर आईला ढिगा-यातून काढत व्हती. समीर म्हणतोय “आयला हळून काढा.. तिला खूप तरास झालाय.. सारं आयुष्य जिजवलय़.. म्या तिच्यामुळंच शिकून इंजिनिअर व्हणार व्हतो पण हे अवचितच निराळं कसं घडलं?” पलिकडच्या बाजुन त्याचा दादा आला. त्याला बघून समिरचा आत्मा टाहोफोडून रडत व्हता. म्हणत व्हता की, “ काल आम्ही गोड खिरं केलती, तुलापण आवडती ना?”  आई म्हणली, “तुझ्यासाठी पुन्हा करू” असं म्हणतो आन दिसणा-या आई-वडिलांकड बघून जोरजोरात रडायला लागतो. त्याच्या डोळ्यातील आश्रु बघून ८८% चं मार्कलिस्ट आतल्या आत धुमसत व्हतं. आन मार्कलिस्टवर पडलेल्या पावसाच्या थेंबामुळं मार्कलिस्टच्या डोळ्यातून आश्रू येताय असचं वाटतय.
   
(टिप: कथा काल्पनिक आहे पण सध्या सिमाभिंत कोसळून मृत्यू झालेल्या घटनेचा संर्दभ आहे.)

“पाठशिवणीचा खेळ”





“ये दामु माग हो, मागो हो ना, पुढं जाऊन दरीत पडशील” आंगावरचा रेनकोट सावरत अतिश दामोदरला म्हणाला. पण दामोदर काही मागे हटला नाही. दोघांच्या मध्ये दहा फूट अतंर होतं. दामुला धराव म्हणून अतिश त्याच्या मागे चालला पण दामोदर दिसेनासा झाला. अतिश हात करून त्याला थांब थांब असा आवाज देतोय पण दामु काय थांबला नाही. तो तसाच चालत राहीला आणि अतिश त्याच्या मागे जाता जाता एकदम झुडपाच्या फांदीला अडकला. म्हणून त्यांन खाली बघितलं तर दामु झुडपात लपून बसलेला. पुन्हा अतिश त्याला धरायला निघाला पण दामु काही केल्या हाताला लागला नाही. आता मातर अंधार पडला होता. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे चिकचिक होती. त्यात अमवश्याची रात्र. जास्तच काळोख पडू लागला. आता तर जवळचा माणूसही दिसेनासा झाला. त्यात अतिश घाबरून मोठ्याने आवाज देतोय “दामु”... अरे मी तुला घ्यायला आलोय, कुठं गेलास! प्लीज.. परत ये..
त्या दोघांचा पाठशिवणीचा खेळ सुरू झाला. अतिशला दामू दिसायचा आणि पकडायला गेल की गायब व्हयचा. आडकेल्या झुडपाला मागे सारत अतिशने स्व:ताला सावरलं. अंगावरच्या रेनकोटाची टोपी डोक्यावर घट्ट आवळली. आणि न घाबरता परत त्या दरिच्या दिशेने चालू लागला. दोन पाऊल पुढं टाकताच आचानक विज चमकली आणि पाठोपाठ ढग गर्जाल्याचा आवाज आला. त्या विजेच्या प्रकाशात समोर खोल दरी दिसली. पाचशे मिटर तरी खोल असावी. ती दरीची खोली बघून अतिश जाग्यावरच थांबला. व इकडे तिकडे बघू लागला. आता मात्र अतिश आतून घाबरला व्हता. त्या पावसातही त्याच्या अंगला दरदरून घाम सुटला होता. त्याला वाटू लागल होतं की आपण उगीच आलोय दामूला शोधायला. पण पुन्हा उसन आवसन आणून अतिश अजून पुढे जायाला लागतो. तरी पाठीमागून आवाज येतो “अतिश, पुढं जाऊ नकोस, मी इकड आहे”.  हा आवाज ऎकून अतिशला थरकाप सुटला. पण पुन्हा स्व:ताला सावरत मागे वळून बघतो. बाजूला बघतो तर शेजारच्या झाडावर घुबड बसलेलं दिसतं. त्याचे डोळे बघून अतिश दुसरीकडे नजर वळवतो. तर तिकडेही वडाच्या झाडाला उलटे लटकलेले वटवाघूळ दिसतात. ते बघून अतिश घाबरून जिव एक करून ऒरडतो “दामू sssssss, दामू sssss “  आता मात्र तोच आवाज परत ऎकायला येतो. तो आवाज ऎकून अतिशची बोलतीच बंद होते. ओरडण्याचा प्रयत्न करतो पण गळा दाबल्यासारखा आवाज येतो. त्याचा श्वास कोंडलाय. गुदमरल्या सारखा करतोय. पाय उचलून टाकताच पाय घसरून खाली पडतो. आणि दरीच्या काठावर अडकतो. तेवढ्यात परत विज चमकते त्या प्रकाशात त्याला खाली  दरी दिसते.  आता मात्र हात पाय हालवतो. त्याचा रेनकोट चिखलाने भरतो. उठण्याचा प्रयत्न करतो पण उठता येत नाही. बराच वेळ निपचित पडून राहतो. भयाण शांतता आहे. आता रात्रीच्या बारा वाजून गेल्या आहेत. पाऊस वाढत चाललाय. फक्त पावसाचा आवज येतोय. मध्येच घुबड नाहीतर वटवाघूळ ओरडल्याचा आवाज येतोय. मध्यरात्रीच्या सुमारास परत अतिश सावध होतो. पण त्याचे हातपाय बांधलेले असतात. तोंडावर मास्क लावलेले असते. तो हुंदका देतोय पण काहीच उपयोग होत नाही. त्या काळरात्री तो सर्व शक्ती एकवटून जिवाच्या आकांताने ओरडतो “दामूSSSS”................ आणि बेडवरून खाली पडतो. त्याच्या आवाजाने त्याची बायको जागी होते. अतिशला शांत करते. पाणी देते आणि म्हणते “अहो, दामू भाऊजी स्वप्नात आलते का? का म्हणून ओरडलात. अतिश बायकोला जवळ घेत “किती वर्ष झालं दामूला भेटलो नाही.. आज भेट होत होती पण मध्येच जाग आली” बायको अंगावर पांघरून टाकत “आता निवांत झोपा मी आहे शेजारी.” अतिश तोंडावर पांघरून घेऊन झोपतो तर त्याला पुन्हा आवाज येतो “अतिश, पुढं जाऊ नकोस, मी इकड आहे”.  

Saturday, July 6, 2019

चकवा



मनोहरराव हे ६५ वर्षांचे झाले होते. पण फिरण्याचा उत्साह मात्र अजून तरूण होता. ते नित्यनियमाने वर्षातून एकदा मूळ गावी कोल्हापूरच्या जवळ आज-याला जायचे. गेल्या दोन वर्षापासून मात्र गुडघ्याच ऑपरेशन झालं होतं म्हणून जाता आलं नव्हतं. त्यामुळे ते सारखं तरमळायचे आणि त्यांच्या सौदामिनीला म्हणायचे की, “गुडघा बरा झाला की अमितला घेऊन एकदा आजरा दाखवून येतो, तो बारा वर्षाचा टोणगा झालाय, तरी त्याला गाव काय असंत ते माहित नाही”. सौदामिनीबाई मात्र चेह-यावरच्या सुरकुत्या झाकत गालातल्या गालात हसत असतं आणि म्हणत, “त्याचा बाप बरा सोडील अमितला”. मग चिडून मनोहरराव म्हणायचे, “अमित नातू आहे माझा, त्याला गाव दाखविला पाहिजे”. यावर नकारात्मक मान हलवत बाई म्हणाल्या, “गोष्टीतून गाव सांगीतला तो पुरे नाही का?” मध्येच ओरडून, “तू गप्प बैस, अमित आला की माझ्याकडे पाठवून दे”. नाही होय करत अमित आजोबाकडे येतो. तसा अमित भित्रा आहे असं घरातील सारीच जण म्हणायची त्यामुळे आजोबा नेहमी त्याला भुताच्या गोष्टी सांगायचे. त्यामुळे अमितची भीती हळूहळू कमी होण्यापेक्षा वाढतच होती. त्या रात्री आजोबांनी गोष्ट सांगितली चकव्याची. पण त्याच्यावर अमितचा विश्वास काय बसला नाही. तो म्हणायचा असं काही होतच नसतं. विज्ञान एवढं पुढं गेलय. त्यावर आजोबा म्हणायचे, “भविष्यात तुला अनुभव येईल तेव्हां कळेल”.  
बघता बघता अमितला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतात. आणि त्याचवेळी गावाकडे मनोहरावाच्या बहिणीच्या नाताचं लग्न असतं. सर्वचजण जायच ठरतं पण अमितच्या वडिला सुट्टी नसल्यामुळे १५ दिवस अगोदर सर्वांना जाता येणार नव्हत. मग मनोहरावांनी अमितला घेऊन जायच ठरवलं. सोबत सौदामिनीबाई ही निघाल्या. आवरा आवरी करून दुपारच्या गाडीने कोल्हापूरला निघाले. कोल्हापूरला पोहचायलाच सहा वाजल्या. तिथून आज-याच्या गाडीत बसले. पण दुदैव असं की गाडी आज-याच्या जवळ पोहचताच बंद पडली. तिथून आजरा ४ कि.मी होता. पण गाडी काही निट होत नव्हती. रात्रीच्या १० वाजले. गाडीतील प्रवासी आपाल्या सोयीनुसार गेले. मनोहराव, सौदामीनीबाई आणि अमित गाडी निट होईल याची वाट बघत थांबले. पण शेवटी गाडी काही निट झाली नाही. ड्रायव्हरने सांगीतले की तुम्ही जावा, रात्र होतेय. आणि रात्रीच्या वेळेला इंकड भुता खेताच भ्या हाय. हे वाक्य ऎकून अमित मनातल्या मनात घाबरला. पुन्हा ड्रायव्हर म्हणला, “ हितून पुढं दोन कि.मी. वर लवन हाय, त्या लवनात दाट झाडी हाय. तिथं चकवा बसतोय, जरा जपून जावा, तुमच्या संग बाईमाणूस हाय”. असं म्हणून ड्रायव्हर आन कंडाक्टर गाडीत झोपायला गेले. आता मात्र अमितनं आजीचा हात घट्ट पकडला आणि आजीसोबत चालाया लागला. मनोहराव पुढं, आजीबाई मागं आणि अमित त्यांच्या सोबत निघाले. जसं जसं चालत पुढं जात होते तसं अमितला आजोबांनी सांगितलेली गोष्ट आठवली. त्याच्या मनातल्या मनात सुरू झाला खेळ प्रतिमांचा. तोपर्यंत ते चालत लवनाच्या जवळ आले होते. आजूबाजूला दाट झाडी. खोल दरीतील रस्ता होता. चितपाखराचा सुध्दा आवाज येत नव्हता. पण मधूनच घुबडाचा नाहीतर वटवाघूळाचा आवज कानी पडायचा. हा आवाज ऎकून आमित दचकून उडायचा आणि आजीला चालत चालत घट्ट मिठी मारायचा. त्याच्या डोक्यात सुरू होती आजोबांनी सांगीतलेली चकव्याची गोष्ट. नेमकं लवनातला खड्ड पार करताना अमितला “ती” दिसली आणि अमित जोरात वरडला, “आजोबा, ती आलीय, ती बघा”. आजोबा विचारतात कोण आलंय? अमित म्हणतो, “कॊण नाही” मग आजी म्हणते, “अमित बाळा तू ऒरडलास, काय झालं?”  अमित आतून घाबरला होता. आजीकडं बघत, “काही नाही आजी” असं म्हणताच आजीच्या पाठीमागे त्याला परत ती दिसते, “आज्जीSSSSS, ती आलीय... मागं हो... तुझ्या बाजूला उभा आहे”. हे बघून आजोबा अमितला जवळ घेतात, हाताला धरून चालायला लागतात. “बाळा अमित काही नाही, तुला त्या गोष्टीतील “ती” आठवतं असेल. “अजोबा, तुम्ही सांगीतलेली तीच आहे, मला दिसतेय. ती बघा समोर आलीय. पांढरी साडी घातलेली. काळे केस मोकळे सोडलेले. हातात सूप घेऊन गहू पाखडतेय”.  आजोबानी अमितला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण अमित आता पार आतून घाबरला होता. त्याच आंग थरथर कापत होतं. तोंडाला कोरड पडली होती. चड्डी केंव्हाच ओली झाली होती. तरीपण आजी आजोबाचा हात धरून चालत होता. जसं पुढ जाताचा त्याला “ती” आज्जीत शिरताना दिसली, “आज्जी, ती आत घुसलीय, तुझ्यात, तू तिथून बाजूला हो”. आजीने मात्र हातातल्या पिशवीचं सुप करून पाखडायला सुरू केलं. हे बघून मनोहराव थोडे बिचकले. आता पर्यंत अजीबाई आश्या कधीच वागल्या नाहीत. आज नेमकं काय झालय. आजीबाई म्हणाल्या, “ दूर व्हा, मला गहू पाखडू द्या, माझं बाळं रडतय, त्याच्यासाठी पोळ्या करायच्या आहेत” हे वाक्य ऎकून अमित दचकला. त्याला वाटू लागलं की हे तर आजोबांनी गोष्टीत सांगीतल होतं मग आजीला कसं काय माहित. पण असो आजीला पण गोष्ट सांगीतलेली असेल. “नाही मी ’ती’ आहे, गेल्या तीनशे वर्षापासून वाट बघतेय की माझ्या बाळाला खाऊ घालायचय. मला दळंण करू दे”. हे सारं मनोहरावांच्या लक्षात येतं. ते जाग्यावरच उभा राहतात. त्याबाईना गहू निट करून, पोळ्या तयार करे पर्यंत थांबतात. बाई त्या पोळ्या अमितला खाऊ घालते आणि अमितला झोप म्हणून सांगते त्याची पाठ थोपाटते. त्या लवनातल्या रस्त्यावरच अमित झोपी जातो. जसा अमित झोपी जातो तशी ती बाई निघून जाते. थोड्यावेळाने आजीबाई शुद्दीवर येतात आणि अमितला उठवतात. मग मात्र मनोहरराव दोघांना घेऊन घरी येतात. त्यावेळी रात्रीच्या दोन वाजले होते. मनोहरावांना आर्श्चय वाटत होत की एका तासाच्या रस्त्याला चार तास कसे गेले? आपण त्या लवनात चकरा मारत होतो का ? त्या चकव्या सारखं.

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts