वयात आल्या
आल्या बैलाच्या नाकात यसन बांधली जाते ती बैल जिंवत असे पर्यंत नाकात असते पण
ज्यादिवशी सैल केली जाते तो दिवस म्हंणजे बैलांचा सण “बैलपोळा”.
माझं आता
बालवाडीत जाण सुरू व्हतं. खायाला सुकडी मिळायची. कवा कवा भात, आन एक एक अंडी बी
द्यायची. मला लय भारी वाटायंच. बई बी मला पुढ बसवायच्या. लेकरांना गप बसवायला
सांगयच्या. म्या मोठा असल्यामुंळ सारी लेकरं भ्यायची. एकदा तर म्या मला दिल्याली
सुकडी कागदात बांधून सादू बैलाला आणली. त्याच्या म्होर ठिवली. त्यान बी दोन घासातच
संपवली. म्या मग दररोज माझ्यातली थोडी सुकडी आणायचॊ आन सादुला द्यायचॊ. मला लई
वाटायच. म्या जर डाकटर असतो तर ह्याला एका झटक्यात निट केला असता. बप्पा का ह्याला
दवाखान्यात नेत नायती. लय ब-या म्या नानाला अन बप्पा ला म्हण्लं सादूला दवाकान्यात
दाखवा. एकदा दोनदा डाकटर बोलवला पन काय फरक पडला नाय.
बैल पोळ्याचा
सन जवळ आला व्हता. दोन दिसावर व्हता. बैल धुवायची. त्यांना चांगली आंगूळ घालायची. म्या
दुस-या बैलाकड नाय पन सादुचं सार करू लागायचॊ. म्या बैलाला रंगवायचो. त्यांच्या
शिंगाला हेंगुळ लावून त्याच्यावर रंगाच्या पताका लावायच्या. पाठी-पोटावर चित्र
काढायचॊ. त्या दिशी बैलाला खाऊ पिऊ भरपूर घालायच. कोणत्याच कामाला जुपायच नाय. सगळं
झालं की गावातून हलकी वाजवत मिरवणुक काढायची. नेमकं सादुला उठायला बी येत नव्हतं.
बळच उठवलं. जाग्यावरच आंग धुतलं. शिंगाला हेंगुळ लावला. आंगावर झुल टाकली. आन
दोन्ही बैलाची गावातून मिरवणूक काढायची म्हनून बप्पान धरून पुढ आणली.
गावात बैल
मिरवण्याचा पहिला मान हा पाटलाचा. पाटलाची बैल इशीवरून गेली की मग त्याच्या माग
सा-या गावान न्यायची. पन त्या साली गावात एका धनगाराच्या माणसांन नविनच बैल जोडी
घेतली व्हती. त्यांन गावात सगळ्याच्या आधी मिरवणूक काढायला सुरवात केली. ही बातम्या
पाटलाकडं गेली. तशी पाटलाची माणसं भाडंणाला आली. जोरात भांडण लागली. बैलाला
काठ्यान माराया लागली. चार गावातली शाहाणी माणसं पुढं हुवून वाद मिटवाया लागली. धनगाराची
पोरं बी मारामारीला उठली. कसं तर वाद मिटला. त्या धनगाराला माहिती नव्हतं की पहिला
मान हा पाटलाचा असतो. त्यो पहिल्यांदाच बैल घेऊन शेती कराया लागला व्हता.
आमचा सादू काय
चालाना. शेवटी वैतागून म्हादुची आन एका वासराची आमच्या भावकीतल बबनआण्णाच्या
बैलासोबत मिरवणूक काढली. मिरवणुक झाली की एक गाय् जोडीला उबा करून लगीन लावायची
परंपरा हाय. तसं भावकीतील तीन बैल जोड्या एक गाय आन आमची बैल उबा केली. सादू
थोडायेळ उबा राहिला. पुन्हा खाली बसला. लगीन लावण्यासाठी बामनाला बोलवाव लागंत.
गावात एकच बामन असल्यामुळं सगळ्या गावातील लगनं लावायच म्हण्ल की उशीर व्हायचा. आमच्या
बप्पाला बी मंगळअष्टका यायच्या. बामन नाय आला की बप्पा बी बैलाची लगनं लावायचं. मग
बप्पानंच मंगळ अष्टक सुरू केलं. म्या सादूच्या जवळंच बसलो व्हतो. लगनं लाऊन झालं
की एका मोठ्या पाटीत चाड-नळ (पेरणी करण्यासाठी वापरतात) गाडग, पुरण-पोळ्या, अन
गाईच गोमतर ठिवून ती पाटी बैलाच्या मालकाच्या डोक्यावर दिली जाते. मालकांन आंगावर
घोंगडी घ्यावी लागते. हे सगळ घेऊन बैलाच्या बाजून पाच फे-या मारावा लागतात. हे करताना
माग एक दोन लेकरं परात नायतर पाटी वाजवत पळतात. त्या साली म्या परत घेतली अन..
नानाच्या माग पळत व्हतो. ते पुढ म्हनायचे “चौर चौर चांगभल! म्या माग म्हनायच “चांगभल” “चौर चौर चांगभल! म्या “चांगभल” “चौर चौर चांगभल! म्या “चांगभल” म्हसोबाच्या नावान! मागून म्या “चांगभल”
येडाईच्या नावान “ चांगभल” असं करत फे-या माराव्या लागल्या.
मला लय भारी
वाटलं परात वाजवाताना. झाल्यावर म्या सादूच्या जवळ आलो. सा-याची बैल त्यांच्या
त्यांच्या दावणीला बांधली. म्हादू ला बी नेऊन बांधल. पन सादू काय उठाना. रात्रभर
तीथच व्हता. दुस-या दिशी पाच-सहा माणसानी काट्याटाकून उचलून दावणीला आणून ठिवला. पुन्हा
काय जाग्यावरचा उठला नाय. त्याचा शेवटाचा दिसं व्हता. म्या बालवाडीतून आलो. त्या
दिशी आम्हांला सुकडी आन अंड बी दिल्याल. म्या थोडी सुकडी आन आंड घिऊन आलो.
सादुच्या म्होर ठिवलं. त्यान काय खाल नाय. का खात नाय म्हनून म्या त्याला उठवाया
लागलो. पन त्यो काय हालाचना. माशा घोंगावत व्हत्या. माझा आवाज ऎकून बप्पा आलं.
त्यांनी बगीतंल आन तोंड बारीक करून नाना ला आवाज दिला “नाना आर इकड ये, सादु मेला”
असं म्हणल्य म्हणल्या मला रडू आलं. म्या मोठ्यान रडाय लागलो. आय आन काकू बाहिर
आल्या. आयन मला काकाला घेतलं. नानाच बी डोळ पाणावल् व्हतं. बप्पा बी रडाय लागलं. थोड्या
येळानं खाटीक आला. बप्पानी त्याला द्यायचा ठरवलं व्हतं. पन म्या लय रडलो. बैल काय
खटकाला इकु दिला नाय. आमच्या रानात नेहुन पुरला. त्याच्यावर आम्ही एक मोठा दगड
ठिवल्याला हाय. आन काटाडी टाकली. पाच –सहा
वरिस ऊसाला गाडी वडायला हाच सादू बैल व्हता. हिरीचा खड्डा बघून उडी मारणारा हाच
सादू व्हता. रस्त्यांनी सरळ चाळणारा हाच सादु व्हता. गाडित कितीबी बोजा भरला तरी
नेट लावून वडणारा हाच सादू व्हता. ट्राफिक बघून जाग्यावर थांबणारा हाच सादू. तरीबी
बप्पा आज त्याला खाटकाला द्यायला निघाल व्हतं का तर संसार लय फाटल्याला व्ह्ता !
पुन्हा न शिवण्यासाठी!
(यसन कादंबरीतून पान नंबर
३२,३३,३४ वरून साभार- )



