“आयव,
मला यंदाच वरीस शिकू दी की साळा, आबाला सांग की तू” विमल काकुलतीला येवून म्हणत
व्हती. पण आई काय ऎकायला तयार नव्हती. आई म्हणायची, “ इमलाबाई बास झालं शिकश्यान,
शिकून काय मास्तरीन व्हनार हायस काय?” विमल आईकडे रागां रागांने बघत म्हणायची, “व्ह्य,
म्या शिकून मास्तरीनच व्हणार हाय.” तेवढ्यात तिचा बाप बाहेरुन आला, “इमे, बंद कर
ही तुझी थेरं, आता साळा बंद म्हंजी बंद.” आबा घरात आलं की बायामाणस बोलनं बदं
करायची. आबाचा दरारा घरातच तेवढा. करारी स्वभाव पण सारं आयुष्य ऊसतोड करत आणि
आलेल्या पैस्यात दारू पिवून, कसा तरी बायकोच्य जिवावर संसार करत आलेले हे आबा.
त्यांच नाव तसं उत्तमराव पण घरात त्यानंला आबा म्हणायची. विमल ही यंदा दहावीत बसणार व्हती. पण तिच्या
आय-बापानं साळा बंद करून लग्न करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आई विमलला सांगायला लागते, “इमाबाई,
आग आपून बाईची जात, शिकश्यान आपल्या नशिबी नसतंय, आन तू मोठ्या बापाच्या पोटी
जन्माली असतीस तर तुझ लाड झालं असतं. आपल्या गरिबीला हे नाय परवडायचं.” विमाल मान खाली घालून मुळूमुळू रडते, “ आयं,
यंदाचचं सालं शिकू दी, म्या पुढं स्वत:च्या पायावर काय तरी करते”.
विमलंच ना तिच्या आईन ऎकलं, ना बापान.
रितीरिवाजाप्रमाण लग्न ठरवलं आणि वयाच्या १८ व्या वर्षी विमलचं त्यांच्या
नातेवाईकातल्या २२ वर्ष वयाच्या पोरासंग लग्न लावून दिलं. आई-वडिल मुलीचं लग्न
करून दिलं की रिकामे होतात. त्यांच्या डोक्यावरचं ओझं उतरल्या सारख होतं. खरंच
मुलगी ही ऒझ असते का? आजही ग्रामीण भागात मुलीचं लग्न करायचं म्हणलं की ऒझं वाटत,
हल्ली मुलाचंही वाटाया लागलं आहे. बरं असो, विमल त्याच वर्षी नव-या संग
कारखान्याला ऊस तोडायला गेली. १८ वर्षाची पोरं कधी तरी आई-बापासंग ऊसाच्या फडात
गेल्याली. पण एवढं ऒझ्याचं काम केलं नव्हतं. आता मात्र सारी जबाबदारी तिच्यावर
पडली. नव-यानं पुढं ऊस तोडायचा आणि विमलं पाठी मागं मोळ्या बांधायची. बांधून
झाल्या की गाडीत भरू लागायचं. ऊसाची मोळी उचलत नसायची, पण बळचं सवय करून घ्यायची.
नाही काम केलं तर नवरा शिव्या द्यायचा. जीव नरडीला यायचा पण विमल तसंच रेटून
न्यायची. असं काम करत करत दोन वर्षं झाली. त्यात विमलला एक मुलगी झाली. मुलगी झाली
त्यावेळी तर नव-यान वलीबाळांतीण असताना मारलं. विमलं खूप रडली आणि मुलीसह माहेरी
गेली. सहा महिनं नवरा आलाचं नाही. ज्यावेळी कारखाण्याववर गाडी लावायची त्याच्या
आधी गेला आन बायकोला घिऊन आला. त्या लाहन बाळासह विमल कारखान्यावर गेली. ऊसाच्या
फडातचं बाळ संभाळायचं आन कामही करायचं. असं करत करत विमल वर्षं पुढं ढकलंत व्हती. पुढं
तिला आजून दोन मुलं झाली. आता वाटलं संसार बरं चालंल. कष्ट करून खात व्हती.
पण आचानक तिच्या
पोटात दुखायचं, तसं ज्यावेळी ती गरोदर असायची त्यावेळी ही दुखायचं पण बाळ पोटात
असल्यामुळं सहन करायची. आता तर पोटासह मानपाठ, कंबर, ओटीपोटात सारखं दुखायचं. त्यामुळं
काम कमी व्हयाचं. नव-याला असं काही सांगीतलं की तो म्हणायचा “इमले, तू मुद्दाम
करतीस बघ, एवढी सालं झालं दुखलं नाय, आताचं बरं दुखाला लागलयं?” विमल, कण्हत
म्हणायची, “ आवं तवाबी दुखायचं , पन आंगात आवसन व्हतं म्हण सहन व्हयाचं. आता सहन
व्हत नाय. आन भ्या बी वाटतय त्या आनुसाया मावशी सारखं झालं तर?” हे ऎकून नवरा
मात्र चिडून दोनचार शिव्या हासाडायचा. “तुह्या मायचं तुह्या, तुला मरूच वाटाया
लागलय.” असं बोलल्यावर विमलं खाली मान घालून रडायची. तिच्या मावशीच्या असचं
ओटीपोटात दुखायचं. मावशीनबी लय वरीस कारखाना केलता. वयाच्या चाळीसाव्या वर्षी
गर्भाशयाची पिशवी काढताना तिचा मृत्यू झालता. त्यामुळं विमलला बी असंच वाटायचं.
पुढं विमलचं सारखं दुखनं वाढल्यमुळं तिला दवाखान्यात नेहलं. डॉक्टरनं सांगीतलं की,
“सारखं मोळ्य़ांच ओझं उचल्यामुळं त्रास होतोय, ओटीपोटात दुखण, कंबर दुखण.” नव-यानं
विचारलं, “मग काय करायला पाहिजे?” “डॉक्टर त्यांच्याकड बघत, “गर्भाची पिशवी काढली
तर हा त्रास काही दिवसं कमी होईल आणि कामही करता येईल”. हे ऎकून विमलच्या नव-यानं पिशवी काढण्याचा
निर्णय घेतला. हा निर्णय घेताना त्यांन विमलला देखिल विचारलं नाही. तुझ्या पोटात
दुखतय असं सांगून तो तिला दवाखान्यात घेऊन आला. ज्यावेळी विमलला कळंल की पिशवी
काढण्यासाठी आणलंय त्यावेळी ती म्हणते, “आवं, पिशवीचा नाय तरास व्हत, पिशवी नाय
काढायची. ह्याच्यातून तीन लेकरास्नी जन्म दिलाय. पिशवी काढली तर म्या जगायची नाय,
मह्या मावशीचही असंच झालंत...तुमच्या पाया पडते.” हे ऎकून नवरा मात्र कावरा बावरा
होतो. तसंच तिला दम देवून, शिव्या देत, “तुह्या मायचं तुह्या, गेली वरिस झालं तुला
काम व्हत नाय. लेकरं उपाशी मराया लागल्यात, आन त्या पिशवीचं काम झालय ना आता, मग
कह्याला पाहिजे तुला?” असं म्हणल्यावर विमलंला तिची तीन लेकरं डोळ्यासमोर यायची.
त्यांची बी लय तारांबळ उडायची. आपून काम नाय केलं तरं लेकरास्नी काय खावू घालायचं?
कारखान्यावर ऊस तोडायला तर जायालाच पाहिजे. पैसं येणार कुठून? पोटाची खळगी
भरण्यासाठी गर्भाचं पिशवी काढली तर काय हुईल? जर मेले तर मेले, आन जगले तर कामं
करून सा-यास्नी आधार देईल. असां विचार करून विमल पिशवी काढण्यासाठी तयार झाली. पिशवी
काढताना तिच्या मनात धाकधुक व्हती. पण यशस्वी रित्या पिशवी काढली. आज विमलंच वय
आहे फक्त ३२, ती पिशवीशिवाय पोट भरण्यासाठी आयुष्य जगतेय... आन ऊसाच्या मोळ्या
उचलतेय.....

विदारक सत्य आहे आजही.
ReplyDeleteyes, it true sir ,
Delete