Thursday, April 9, 2020

तरूणाईच्या तन-मनाचा तळ तपासणारी “तणस”


       “ती म्हणायची, तुझा काही अंदाजच येत नाही. कायम तू असतोस स्वत:त गुंतलेला. अगदी मिठीत असलास तरी तुझी नजर कळायची नाही. मग तुला कळून घेण्यासाठी मी स्वत:हून पुढाकार घेत आले. प्रसंगी तुला आवडत नसूनही, मी तुझ्यावर ओणव होऊन तुझ्या डोळ्यांत उतरण्याचा प्रयत्न करीत गेले. शरीरातूनही तुझ्याशी बोलायचा प्रयत्न केला. तात्पुरता तू बोलायचास, मस्त खुलायचास देखील. पण जेवढ्यास तेवढंच. समेवर आलास की डोळे गच्च झाकायचास. मला मात्र तुझ्या डोळ्यांत उतरून तुझ्यापर्यंत पोहचावं वाटायचं. पण तू कधीच डोळे उघडले नाहीस.” या संवादातूनच गोष्ट सुरू होते ती म्हणजे तणस या कादंबरीची. “तणस” ही कादंबरी प्राचार्य महेंद्र कदम लिखीत व लोकवाड:मय गृह प्रकाशित २०१९ मध्ये प्रकाशीत झाली आहे.
      आजच्या तरुणाई समोर अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरे त्यांना शोधता शोधता नाकीनऊ आले आहेत. ते प्रश्न त्यांच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंतच्या प्रवासाशी संबधित आहेत. तसं पाहिलं तर असे प्रश्न हे अगोदरच्या पिढीसमोर देखील होते. पण अगोदरच्या पिढीसमोर पर्याय खुले होते. आताच्या पिढी समोर म्हणजे जे १९९० च्या आसपास जन्माला आले त्यांच्या समोरचे जगण्याचे प्रश्न जास्त किल्ष्ठ होत आहेत. त्याला अनेक कारण आहेत. त्यातील एक म्हणजे खाजगीकरण, उदारिकरण व जागतिकरण होय. पण वर वर पहाता असं वाटतं की या खाऊजा मुळे सुधारणा तरी होत आहेत. पण हेच लेखकाने ओळखलं आणि तणस मध्ये दिनकर देसाईच्या कथानकातून वाचकांसमोर मांडलं आहे. कारण भैतिक प्रगती झाल्यासारखी दिसते आहे. पण आतून म्हणजेच मानसिक दृष्ट्या सध्याची पिढी तग धरू शकत नाही. जे भांबावलेपण व मध्यमवर्गीयातील मानसिक भिती या पिढीच्या मागे लागली आहे. ती का आणि कशी लागली त्यासाठी दिनकर देसाईचं जगण आपल्याला समजावून घ्याव लागेल. बी.कॉम. बी.एड झालेल्या दिनूच नेमक जगण का उलट सुरू होत. किंबहुना अशा अनेक आजच्या मुलांच जगण हे उलट सुरु आहे असं वाटत राहत.
      कादंबरीत दिनकर देसाई चा मित्र मनोज जावळे जो बी. ई सिव्हील आहे.  अमरसिंह शेंडगे -पाटील, बाजीराव काळे, निलेश कुलकर्णी, आणि इतरही काही पात्र समकालीन पिढीतील येऊन जातात. जे स्वता:च्या जगण्यासाठी व अस्तित्वासाठी धडपडत आहेत. याच्यात अजून एक महत्वाच पात्र म्हणजे उर्मिला कुलकर्णी जी दिनकर देसाई सोबत लग्न करते. यांच्या लग्नाची तर गोष्ट मनाला भावते. लग्नाचा निर्णय थेट उर्मिला घेते. पण दोघांच एकमेकांवर प्रेम असत का तर होय ही आणि नाहीही अशा संभ्रमात वाचक अडकतो. पण लग्नानंतर त्या दोघांचा जगण्याचा संघर्ष सुरूच राहतो. जो आजच्या २५ ते ३५ वयोगटातील तरूणांचा आहे. मनाला पाहिजे तसा सेक्स करूनही आनंद मिळत नाही कि आर्थिक ताणामुळे फक्त शरिर एकत्र येतात ते मात्र सतत सतावत राहत. याच्यात एकमेकाच्या नात्यातील संवाद हरवलेले दिसतात.
      जे अगोदरच्या पिढीत म्हणजेच शेंवताच्या आईच्या कुटूंबात पाहायला मिळतात. पण तिथेही आर्थित अडचणी होत्या. ज्या एकजुटीने कुटूंब सोडवताना दिसत आहे. हे शिवाजीराव काळेच्या कुटूंबातही घडत. तसच उत्तमराव शेंडेंच्या घरातही खूप तडजोड होते. म्हनूच उत्तमराव पतसंस्था सुरु करतात. गजाननपंताचं लक्ष नेहमी स्वता:साठी काही मिळतं का हे शोधण्यात असंत त्यातूनच हे मंदिराची जागा, टेकडी याचं राजकारण सुरू होत. तस वरवर पाहाता ते राजकारण वाटत नाही पण धर्माच्या नावाखाली राजकारण असल्याच जाणवत राहत. यात मग पंताच्या मुलीचं म्हणजेच उर्मिलाच आयुष्य उधवस्त होत. जीने दिनकर देसाई सोबत लग्न केलेलं असत. तिला वाटत असंत की दिनकरच्या व्यक्तीमत्वात काहीतरी एक स्पार्क आहे. पण लग्नानंतर ते स्पार्क तिला जाणवत नाही. त्या स्पार्कला ती शोधत असते पण तो लग्नाअगोदरचा स्पार्क दिसतच नाही. त्यातही दिनकरचे आई-वडिल म्हंणजे दोन वेगवेगळी बेट असल्याचं त्यांच्या संवादातून जाणवत. खरं तर हे सर्व आपल्या आजू बाजूला घडत असत पण आपलं याच्याकड लक्ष जात नाही.
       “तणस” म्हणजे आजच्या तरूणाईच्या तन व मनाच्या गाभा-यात जाऊन घेतलेला शोध आहे. कारण आजची तरूणाई वरून कितीही चकचकीत राहत असली तरी ती मनाने पोखरलेली आहे. कोणत्या ना कोणत्या दबावाखाली सातत्याने वावरत आहे. हा दबाव कुठून कसा सुरू झाला हे या कादंबरीत उत्तर मिळेल असं वाटत राहत. पण तो प्रश्न प्रश्नच राहतो. कारण प्रश्न नौकरीचा असता तर तो सुटल्यासारखा वाटतोय. पण तो सुटत मात्र नाही. जसं दिनकर सुरवातील काहीही काम करतो. कुठ गाडी पुस. किन्नर म्हणून राह. पुढं ड्राव्हर होतो. गाडी घेतो. त्याच्यात अपयश येत. मग तो एका पतसंस्थेत कामाला सुरू करतो. शिपायापासून काम करत तो मॅनेजर होतो. आणि शेवटी अचानक नौकरी सोडतो. ती नौकरी सोडण्यापाठीमागे अनेक कारण आहेत. त्यातील एक कदाचित आजच्या काळात दडलेलं उत्तर आहे. दुसर उर्मिलाचही तेच होत. एवढ शिकून वडिलांच्याच शाळेत तिला पैसे भरावे लागतात. जे माहित आहे की पैसे भरून नौकरी करण चूकीच आहे पण पर्याय समोर नसल्यामुळे सासूचे आणि तीचे दागिने विकून पैसे भरते. आणि शिक्षक होते. तसं अमर च्या बाबतीत वेगळंच आहे. स्पर्धापरिक्षा ची तयारी करत असतो पण पास होत नाही शेवटी बापाने सुरू केलेल्या पतसंस्थेचा कारभार सांभाळतो. त्याचा माज हा त्याच्या व्यत्कीमत्वातून दिसतोच.
        हे तसं वरवर जगण्याचे प्रश्न वाटतात. लेखक याच्या पलीकडे जाऊन सांगू इच्छितो की केवळ कुणाच्या पोटी जन्म घेणं हे आपल्या हातात नाही. पण आपण जन्माल्या नंतर अनेक प्रश्न आपण आपल्याला विचारत असतो. मी का जन्माला आलो आहे? यांच्याच पोटी कसा? माझं पूर्व जन्माच काही नात आहे का? माझ्या व्यत्कीमत्वात माझ्या पुर्वजांच काही आलं आहे का? त्यांचा सामाजिक स्थर आहे तसाच मझ्यात रेखाटला आहे का? आणि मी अत्ता का म्हणून जगत आहे?
       असे अनेक तात्विक विचार या कादंबरित जाणवत राहतात. पान ९२ वर हे अत्यंत महत्वाचं विधान आहे. “ हे मन म्हणजे भारी विचित्र गोष्ट आहे. सालं वर्तमानात तुम्हांला ते जगूच देत नाही. कायम ते भूतकाळात ढकलत नेतं, नाही तर भविष्याकडं पहायला लावतं.”  यातून आजच्या तरूणाईच्या विचार करण्याच्या पध्दती आणि आज जे जगतोय तेच सर्व आहे हे कसं बळावत चाललं ते या कथानकातून स्पष्ट पुढं आलं आहे.   
      पान. १०५ वर दिनू व मनोजच्या च्या संवादातून जे वास्तव समोर आलं आहे ते असं, “खरं ते खरं. मुळांत आपण त्या ख-यालाच जास्त भितो. आपणच आपल्या ख-या रुपापुढं उभं रहायला घाबरतो. त्याचा परिणाम काय होतो? तर असं आपलं उलटं फिरण सुरू होतं.” हे आताच्या पिढीला लागू आहे असं वाटत राहत कारण वरून चकचकित दिसणारी पिढी आरशा समोर खरं घेऊन येतच नाही पण ज्यावेळी जखमा होतात त्यावेळी मात्र संपूर्ण हादरून गेलेली असते.
     पान. ११० वर एक संदर्भ येतो तो म्हणजे बायकांच्या जगण्याचा कारण त्या कोणत्याही आव्हानाला सामोर जातात. म्हणजे असं की महाराष्ट्रात लाखो शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. पण त्यांच्या बायकांनी आत्महत्या केल्या नाहीत. उलट त्या बायकांनी नव-याचं कर्ज डोक्यावर घेऊन त्यातून मार्ग काढल्याची कित्येक उदाहरण आहेत. खंर तर या उदाहरणातून स्त्रीयांची चिकाटी व त्यांची कष्ट करण्याची तयारी हे दिसून येत. हे आजच्या पिढीत देखिल आहे. पुरूष लवकर विस्कटतो पण स्त्री मात्र सावरून घेत असते. शिवाजीराव काळेची सून म्हणजेच बाजीराव ची पत्नी सासरा गेल्यानंतर सर्व कारभार संभाळते आणि संसार करते कारण बाजीराव हा व्यसनी व उडाणटप्पू असतो. तसंच शेवंताची आई देखिल सर्व संसार उभा करते. ही कादंबरीतल प्रातिनिधीक उदाहरण आहेत. अशी अनेक उदाहरण वास्तव जिवनात आपल्याला दिसतात हे जाणवत राहत.
      “पान. ११३ वर आलेला संवाद विचार करायला भाग पाडतो, “अलीकडं माणसं वस्तूंवर किती प्रेम करायला लागलेत. ती वस्तूंच्या जितकं प्रेमात पडतात, तितकं माणसांच्या प्रेमात पडत नाहीत. प्रत्येक माणूस मग वस्तूच बनून जाणार. आता तुमचंच बघा, किती पळताय, तुम्हांला कोण पळ म्हणतय का? नाही. तरी तुम्ही पळताय. या व्यवस्थेन तुम्हांला पळायला भाग पाडलंय. वस्तूवस्तूंची शर्यत लावली. एकदा गती वाढली की, थांबवण आपल्या हाती राह्त नाही. हाच तर आजच्या युगाचा धर्म आहे.” यातून आजच्या माणसाची पळण्याची गती आहे पण तो का पळतो हे मात्र निरूउत्तरच आहे.
      “आज जगात सगळ्या मिसफिट जोड्याच अनुभवायाला मिळतात किंवा दिसतात म्हणा फारतर. या सगळ्या मिसफिटीतून फिट फिट होत पुढं जात राहतो अवकाश. थांबत नाही कुणासाठी. काश अगर अवकाश रोकनेका कोई कालतंत्र होता.!” हे उदगार मनात घर करतात. या कादंबरीत काळ, वेळ, स्थळ आणि माणूस यांचा एकमेकांना ओलांडून जाण्याचा प्रयत्न आहे. कारण माणूस जागेसाठी धडपडत आहे. म्हणजेच स्थळासाठी. स्थळाशिवाय त्याचं अस्तित्वच नाही असा त्याला सारखा भास होत आहे. पण दुस-या बाजूला काळ माणसाला हवी तशी वेळ येऊ देत नाही असं जाणवत राहत. पण लेखक यांच्या शोधात न पडता तो आजच्या पिढीची वास्तव वादी उत्तर देत राहतो. म्हणजे राहण्यासाठी जागा घेण, जगण्यासाठी नौकरी करण आणि स्वता:कडे बघण म्हणजे वेळ जगण. जो वर्तमान आहे. 
      या दिनकर देसाईच्या गोष्टी सोबत काळ, वेळ, आणि स्थळ जे अंधारात आहे त्याचा शोध तो घेत असतो. खरं तर आजच्या तरूणाईचं देखील असच आहे. जे अंधार जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे जगण्याच वास्तव आहे. यात काही पणत्याही येतात ज्या उजेड करू पाहत आहेत. पण त्या मर्यादीत आहेत. सामाजिक, राजकिय, सांस्कृतिक जगण्याबरोबर स्वता:च्या आत डोकावून मानसिक व आत्मिक व्यत्कीमत्वाचा शोध घेऊ पाहणारी एक निंतात सुंदर कलाकृती म्हणजे “तणस” होय.   

कादंबरी: तणस
लेखक: महेंद्र कदम
मुखपृष्ठ: सतीश भावसार
प्रकाशन: लोकवाड:मय गृह, मुंबई
पृष्ठे: २२७, किमंत: ३००/-  

टिपण: ज्ञानेश्वर जाधवर (९६५७९८५९३५)

No comments:

Post a Comment

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts