Wednesday, April 1, 2020

यांच्या वृत्तीत बद्दल कधी होणार?


      सध्याच्या वातावरणात गरजेच्या व अत्यावश्यक वस्तू चढ्या भावाने विकणा-या दुकानादाराचा तिरस्कार वाटू लागला आहे. त्यातही म्हणजे  भाजीपाला व किरणा माल विकणा-यांचा. त्याच झालं असं भाजीपाला घेण्यासाठी मंडईत गेलो होतो. गेल्या गेल्या भावाची चौकशी केली तर भाव  ऐकून हादरलोच कारण बटाटे, कांदे ,काकडी, टोमाटे, कोबी, भेंडी, कारले, मेथी, गवार, हिरव्या मिरच्या आणि अजून काही भाज्या घेण्यासाठी भाव विचारले तर भाजीवाला म्हणाला, “काहीही घ्या ८० रुपये किलो, हिरवी मिरची आणि गवार २०० रुपये किलो.”
हे ऐकूण हादरलोच. त्यांना म्हणालो, “ दादा , भाव लयच वाढवलं.” 
तर तो म्हणतो, “आव मालक, एवढे दिवस स्वस्तच होत आता महाग मिळणार. आता तरी खावूद्या शेतक-याला. ”
माझ्या मनात आलं कि शेतक-याच्या नावाखाली आता भाजीवाले बी भाव वाढवाया लागले. मला हे भाव जरा जास्तच वाटले म्हणून दुस-या भाजीवाल्याकडे गेलो. त्याला विचारल “भाजीवाले , कांदे कसे किलो ?”
त्यान माझ्याकडे न बघताच “८० रुपये किलो पण ७० रुपये लावतो. बोला किती देवू.”
मला हा हि भाव जास्तच वाटला. मग त्याला वांगी, गवार, बटाटे याचे भाव विचारले तर त्याचे आणि पहिल्या भाजीवाल्याचे भाव सारखेच होते .
ते ऐकून त्यांना म्हणालो, “पावनं , भाजी पाल्यांच्या किमती खूपच वाढवल्या ?” तर तो म्हणतो कसा , “करोनोना मुळं माल कमी झालाय त्यामुळं तुटवडा पडलाय. आन हाय त्या मालाला गी-हाईक वाढलय. त्याच्या मुळ भाव वाढल्यात.”
मी त्याच्याकडे बघत , “ पावनं , करोनामूळ लोक घाबाराल्यात आणि हे लॉकडाऊन मुळ लोक एकदम माल घेऊन ठेवाया लागलेत. त्याच्यामुळ तुम्ही किमती वाढवल्यात. तुम्ही असल्या परीस्थित गरीबांचा गैरफायदा  घेताय.”
माझं बोलन  ऐकून चिडून म्हणाला, “ ओ , मालक तुम्हांला घ्यायचं असेल तर घ्या नाय तर नका घेऊ . मला गी-हाईक लय हायती.”
त्यांच ते चिडून बोलण मला खूपच खटकल. म्हणून मग पुढच्या भाजीवाल्याकडे गेलो. 
     तिथ भाजी विकायला ५० ते ५५ वयाच्या बाई  होत्या. त्यांच्या समोर कोणीच गी-हाईक नव्हते हे पाहून त्यांना म्हणालो , “ मावशी  तुमच्याकड च्या भाजीचे भाव कसं आहेत.”
 त्यांनी वांग्याच्या पाटीवरील तराजू काटा सारत, “ बाबा , काय घेयच तुला?”
मग त्यांच्याकडून वांगी , बटाटे , कांदे व इतर भाजीपाला घेतला. मावशीनी ५० रुपये किलोने दिला. दुस-या भाजीवाल्या पेक्षा जरा स्वस्त दिल होत. त्यामुळे मी घेतलं . नाही घेऊन करणार काय ?
त्या मावशी ला सर्व भाजीपाल्याचे पैसे देत , “ मावशी , तुमच्याकड जरा स्वस्त दिला म्हणून घेतला बरका.”
मावशी म्हणाल्या , “ ऐ बाबा , हिथ कुणाला म्हणू नकू मला उठवून लावत्याल.”
मी सुट्टे पैसे खिशात ठेवत , “ का हो , काय अडचण आहे का?”
त्यावर त्या मावशी म्हणाल्या, “ हितल्या सा-या भाजीवाल्याच ठरलाय कि माल स्वस्थात विकायचा नाय. आताच कमवायचे दिवस हायती. जर कोणी स्वस्थात माल विकला तर त्याला बसू द्याच नाय.”
मग मला वाटलं त्यामुळंच सर्वाचे भाव एकसारखेच आहेत. त्या मावशीना  माझ्याबद्दल विश्वास वाटला.
त्या पुढं म्हणाल्या, “ आर  बाबू , मला हे सारं कळतंय असल्या काळात भाव वाढवू नाय . पण माझं कोण ऐकतय, हातावरच पोट हाय. नाय काम कराव तर खावं काय. म्हणून जसं सारी विकत्याल तसं विकावा लागतय.  हिथं लय दमदाटी चालती. आमच्याकडून बी पैस गोळा करून घेऊन जात्यात.  सारा चोर बाजरा झालाय.”  
त्यांच्या  बोलण्याला मानेनेच होकार देवून मी निघालो. पण त्या मावशीचे तेच शब्द कानावर पडत होते.                 
      मला खूप आश्चर्य वाटलं होतं. कारण ग्राहकाकडून जास्त घेतलेला  एकही पैसा त्या शेतका-याला जात नाही. कारण सध्या गावाकडील शेतक-याचा माल अगदी स्वस्तात घेतला जातोय. काही शेतकरी तर भाव मिळत नाही म्हणून माल फेकून देत आहेत. हे मला माहित असण्याच  कारण म्हणजे  गावाकडे दररोज फोन करून माहिती घेतोय. शेतक-याला सांगितलं जातंय सध्या वाहतूक नसल्यामुळे भाव नाही. म्हणून शेतक-याकडून अत्यंत कमी किंतातीत माल घेतला जातोय  आणि पुण्यात तो स्वस्तातील माल चढ्या भावाने विकला जातोय. शासनाने तर अत्यावश्यक माल व वस्तू साठी वाहतूक सुरुळीत  ठेवली आहे मग तरीही किंमती कशा वाढत आहेत?
       म्हणजे कठीण प्रसंगाच्या काळात  माणसाला आधार देण किंवा आहे त्या परीस्थित स्थिर राहाण्यासाठी मदत करण आवश्यक असतं पण इथ मात्र आपलीच माणस अशा परीस्थित लुटत आहेत.
       हे लुटणारे स्वार्थी, अप्पलपोटी लोक आहेत. संपूर्ण देश कोरोनाच्या साथीने त्रस्त आहे आणि हे महाभाग अशावेळी मढयाच्या टाळू वरील लोणी खाण्यात व्यस्त आहेत. ज्यांच्या कडे पैसे आहेत  त्यांना ते परवडेल पण हातावरच काम करून खाना-या माणसाला हे माहागायची परावाडायच कसं ? गरिबांना परवडायचं कसं ? हा विचार किमंती वाढवून विकणा-याच्या डोक्यात का येत नाही. अडचणीच्या काळात लुटणा-या माणसांच्या वृत्तीत बद्दल कधी होणार?

ज्ञानेश्वर जाधवर (९६५७९८५९३५)        

No comments:

Post a Comment

सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts