Tuesday, December 10, 2019

“शेवटची रक्ताळलेली जिलबी”





त्या वक्ताला लय वंगाळ घडलं. आमच्या गवचा धनाप्पा लय भला माणूस पण परिस्थितीन गांजला. लेकाला आन सुनाला घिऊन कारखाना करत व्हता. धनाप्पान जल्मभर कारखाना केल्याला. त्यातूनच त्यान तीन पोरीची लग्न करून दिल्याली. शेवटचा पोरगा व्हता. त्याच बी लगीन झाल्याल. त्याला तीन वरसाच एक पोरग हाय. त्याच नाव प्रविण ठिवल्याल पन लाडान त्याला प-या म्हणायची.  लेकाच लगीन झाल्यापासून ऊस तोडायच बंद केलं व्हत. पण धनाप्पाच्या बायूकच्या पोटाच आपरेशन झालं. त्याला लय खर्च आला. दवाखान्यासाठी कर्ज घेतलं. ते फॆडण्यासाठी उतारत्या वयात लेकाला आन सुनाला संग घिऊन ऊस तोडायला गाडी लावली.
दररोजच्या प्रमान त्या दिसीबी लवकर उठून फडात गेली. धनाप्पाला वयामुळं काम व्हत नव्हतं पण बळचं आंगात ऊसन आवसान आनून काम करत व्हतं. त्या दिशी बायकून लेकाला आन सुनाला आवडतय म्हनून वांग्याच भरीत करून चिरगुटात भाकरी बांदून दिल्या. नातासाठी दूध गरम करून बाटलीत भरून दिल्यालं. फडात आल्या आल्या धनाप्पान चांगली पात धरून ऊस तोडायला सुरू केलं. लेक बी तोडू लागत व्हता. दोघानी भराभरा गाडीभर ऊस तोडला. पाठीमागून सुन मोळ्या बांधत व्हती. आन ऊसाच वाड्याच भेळ बाजूला काडून ठिवीत व्हती. ऊस तोडून झाला की सारीजन राहिल्याल्या मोळ्या बांधायची. मोळ्या बांधून झाल्यावर सुनबाई तान्या प-याला घिऊन आडूसा बघून पाजू लागली. सासून दिलेल दूध बी प-याला पाजलं. तवर बाप लेकांनी ऊसाची गाडी भरली. दिस आता टक-यावर आला व्हता. जेवायला गाडीतच घिऊ असं म्हणून गाडी हाणायला सुरू केलं. धनप्पाचा लेक म्होरल्या तोडांला बसून ऊसान भरल्याली गाडी हाकाया लागला. फडातून गाडी रस्त्याला लागली की सुनबाईन चिरगुटातील भाक-या सोडल्या. आज सासून वांग्याच भरीत दिलं व्हतं. लय आप्रूप वाटाया लागलं म्हणून म्हनाली,
“ आव आज बघा तुमच्या मायन तुम्हांला आवडतय म्हणून वांग्याच भरीत दिलय”
“ तुला नाय काय आवडत? औ,,,,”
“मला आवडतय पन तुमच्या एवढ नाय, पन जाऊ द्या मायचा लयच जिव हाय बघा तुमच्यावर”
“ आग किती केलं तरी माय हाय ती माझी”
       असं बोलत बोलत तिन सा-यांस्नी भाकरी आन त्याच्या वर वांग्याच भरित दिलं. धनाप्पा गाडीच्या मागच्या बाजूला बसून हातावर भाकर घिऊन येना-या जाना-या वाहानाकडं बघून घास तोंडात कोंबत व्हता. लेकांन बी खायाला सुरू केलं. जर गाडी पळाया लागली तर मध्येच बैलाला दापायचा आन यसन वडायचा. असं करता करता गाडी आता गावाच्या कडाला आली. कोप-यावरच हाटेल बगून लगेच बारक्या प-यान आई कडं बघत,
“आयंव मला दिलबी (जिलेबी) खायचीय”
“ कुथं दिसतीय माझ्या सोन्याला”
हात त्या हाटेलाकडं करत “तोक त्या कोपल्यावल”
जस गाडी कोपरा वलांडून पुढ चालली तसं प-या मोठ्यान वरडाया लागला. आई त्याला गप बसवित व्हती पण तो काय गप बसत नव्हता. आता मातर तो पाय खोडून खोडून रडायाला लागला.
“आयव.......... SSSSSSS..आयवSSSSS, मला दिलबी खायचीय”
“आपून पुन्हा घिऊ, आज ऊशील झालाय”
“नाय मला आजच, घ्यायचीय”
हा आवाज ऎकून प-याच्या बापान झपकन एक रटा मारला तसा प-या जोरात रडाया लागला. हे बघून धनाप्पाला काय राहवलं नाय.
“आर लेकराला मारत असत्यात व्ह्य? त्या मोहरल्या कोप-यावर गाडी थांबव”
“आव सारख लेकराच लाड पुरवून वौताग आलाय नुसता? नाय खाल्ली जिलबी एकांद्यादिसी म्हंजी काय मरतय काय ?”
“आर बट्या तसं नसतय, लेकराचा नाद असतोय, थांबव गाडी म्या घिऊन येतो, माझ्याकड हायती इसीक रुपये”
मग हाटेला म्होरं गाडी थांबवली. धनाप्पा खाली उतरलं आन पावशेर जिलबी घिऊन आलं. गाडीवर चडताच नातवाच्या हातात पुढा दिला. लगेच प-यान पुढा सोडला आन जिलबीचा एक येडा घिऊन,
“आय... तू खा.. धल.. ह्यो चांगला हाय. धल.. धल की”
“बाबा तुला धल.. ह्यो मोता येला हाय, घे”
“आन हे अप्पाला... आप्पा धल्ला तुम्हाला”
प-यानं सा-यास्नी एक एक येडा दिला अन त्यान एक हातात घेतला. खात खात आई कड बघत..
“अप्पाच चांगल हायती”
“आम्ही बी चांगल हाव कीर.. तू बी हाय, पन बाबा थोलाच चांगला हाय”
“ आजून खा”
“ नाय, लाहूदी सांच्याला खायाला, आता बास मला”
नातान दिलेला येडा तोडांत घातला आन धनाप्पा आतल्या आत हसतबी आन रडतबी व्हता. आता गाडी कारखान्याच्या जवळ आली व्हती. पुल वलांडला की कारखानाच व्हता. पण पुलाच्या आगुदर मोठ वळण व्हतं. त्याला उतार बी व्हता. नेमक त्या वळणावर गाडी आली आन मागून ऊसान भरलेला टरक आला. पुढच्या बाजून काही वाहन व्हती. चार पाच ऊसाच्या गाड्या म्होर चालत व्हत्या. मागून आल्याला टरक वेगात व्हता. पुढून आल्याल्या वाहानाला धडक बसलं म्हनून टरकवाल्यान टरक डाव्या बाजूला वळवली तशी धनाप्पाच्य़ा गाडीला धडक बसली. गाडी जाग्यावर पलटी झाली. पुढच्या दोन तीन गाड्या बी आदाळल्या. पण धनाप्पाच्या गाडी मातर दहा मिटर तरी घसरत गेली. बैलांनी मातर मोठ्य़ान डरकाळी फोड्ली. टाहोफोडून माणसं रडतात तसं दोन्ही बैलं मार लागल्या लागल्या वरडली. बैलाला बी लय मार लागला. लेक आन सुन टरकाच्या मागच्या चाकाखाली सापडली. आन चेद्यामेंध्या झाली. धनाप्पाच्या पायावरून ऊसाची गाडी गेली. दोन्ही पायच तुकड पडलं. नातू मातर लांब जाऊन पडला व्हता. त्याच्या हाता जिलेबीचा येडा तसाच व्हता. त्याच्या लेकाच्या तोंडात जिलेबी व्हती. सुनाचा हात खरकटाच व्हता. उरलेली भाकर आन जिलेबीच तुकडं रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेलं व्हतं. अपघात झाल्या झाल्या कुनालाच काय सुधराना. बाकीच्या ऊसतोड गाडीवानानी गाड्या बाजूला घेतल्या. धनाप्पाला बाहेर काढायाला धावून आली. तवर पोलीस आले. टरक ड्रायव्हरला पकडलं पण त्याच बी पायं मोडलं व्हतं. धनाप्पाला आन त्याच्या लेका सुनाला नातासोबत दवाखान्यात नेहलं. दोन चार दिसांन धनाप्पा सुद्धीवर आल्यावर कळंल की लेक आन सुन जाग्यावरच मेली. नातू जिवंत हाय. पण मुका मार लागला व्हता. धनाप्पाच पाय तर मोडला व्हताच शिवाय मनक्याला मार लागला व्हता. मनक्यातली नस तुटल्यामुळं तो कवाच जोडला जावू शकनार नव्हता. कोन सांगायच पुण्याच्या नायतर मुंबईच्या दवाखान्यात जोडला जातोय पण तो  पाच सहा लाख रूपयेचा खर्च कोन करणार? कुठून आननार एवढा पैसा.? पहिलचं बायकूच्या दवाखान्याच कर्ज फॆडता फॆडता नाकी नव आलं व्हतं.  आन आता हे वाढून ठेवल्यालं. नातू मातर शुद्दीवर आला व्हता. हातपायानी धडधाकट व्हता. धनाप्पाला त्याचच कौतुक वाटायचं. एवढ्या मोठ्या आपघातातून लेकरू वाचलय. म्हणतात ना देव तारी त्याला कोन मारी. तवा पासून धनाप्पा गावातच पांगूळ गाड्यावरून दोन शेरडं हातात धरून ५५ वर्षाच्या बायकूच्या आधारावर नातवासाठी जिव मुठित धरून जगतोय.  स्वता:च्या जिवापरिस नाताला जपतोय. नातानं कवा जिलबी मागितली तर धन्नाप्पा आतल्या आत रडतोय. पण जिलबी खायचं नाव घेत नाय.



हा प्रसंग यसन या कादंबरीतील आहे.

Thursday, November 21, 2019

“बुध्द की युध्द ” असं मांडणारा कवी “जयप्रभू”






“बुध्द की युध्द ” असं मांडणारा कवी “जयप्रभू”

     गोव्यात गेल्यावर जयप्रभू नावाच्या एक प्रमाणिक शिक्षकाची ओळख झाली. ओळख झाल्यावर त्यांनी मला त्यांचे दोन कविता संग्रह दिले ते म्हणजे “लॉग आऊट” व “ठळक नोंदी आणि इतर कविता”. घरी परत आल्यावर रिकाम्या वेळेत सहज त्यांचा ठळक नोंदी आणि इतर कविता हा संग्रह चाळला आणि आवकच झालो. कारण ज्या माणसाने अत्यंत शांतपणे आमचा पाहुणचार केला. बोलताना साधेपणा व कमीत कमी शब्दात मत व्यक्त करणारे जयप्रभू हे कवितेतून सभोवतालच्या एकंदरित परिस्थिती बद्द्ल त्यांचा अस्वस्थपणा अत्यंत मार्मिकपणे टिपतात.  
     या कविता संग्रहात ३९ कविता आहेत. संग्राहाची सुरवात ही “विठ्याची सैर आणि रूक्मिणीचा एकांतवास” या कवितेने होते. विठ्ठल पसार होतो आणि रूक्मिणी शोधायला जाते. पण लवकर काही विठ्ठल सापडत नाही. मग शेवटी वैतागून रुक्मिणी परत येते तर विठठल तिच्या अगोदर गाभा-यात असतो. हे प्रतिकात्म माणसाच जगण आणि जगाच्या शोध घेणं या कवितेतून मनापर्यंत जात. यातील काही कविता थेट काळजाला भिडतात. ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार भिडणा-या कविता आहेत. ज्यांनी विनाअनुदानित, खाजगी कॉलेज, व अनुदानितवर तासिकेवर काम केलं आहे किंवा करत आहेत. त्यांना नक्कीच अस्वस्थ करणारी कविता म्हणजे –
“कवच”
पगार कधी होणार? तिचा जिवघेणा प्रश्न
आणि हॅंग झालेल्या कंप्युटरसारखा असतो तिच्या समोर उभा.
मागणी तसा पुरवठा हे तत्व लागू होत नाही तिच्या आयुष्यात.
तिने केलेल्या कोणत्याही मागणीचा पुरवठा
पुरा करू शकत नाही
माझ्या जगण्यातील पंचेचाळीस मिनिटाचा काटा
तिने सांगितलेल्या वेळेत.
म्हणूनच तिने दिलेली वस्तूंची यादी
छेदत जाते माझे नेटसेटचे कवच आणि
उघडा पडत जातो मी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी
तिच्या पगाराच्या प्रश्नाने.
या कविता वाचल्यानंतर जयप्रभू यांच्या विचारांतील प्राणिकपणा जाणवला. खरं तर हल्ली प्रामाणिक माणसाना जगण खूप अवघड झालय. त्यावेळी कथा, कविता, नाटक, चित्र, संगीत या सारख्या कलाच आधार देतात. असचं जयप्रभूंच्या कविता संग्रह वाचल्यावर भासलं. सर्व काही समजतय पण करता काहीच येत नाही. कारण हाताशी काहीच नाही. अशावेळी मनातल्या मनात कलाकृतीच्या माध्यमातून मनाचीच समजूत घालत आयुष्य जगणारे असंख्य कलाकार आहेत. खरंतर साहित्यीक आणि कलाकारांच्या विचारांचा फायदा हा समाजव्यवस्था उत्तम व्हावी आणि टिकून राहावी याच्यासाठी अपेक्षीत आहे. पण हल्ली तसं होताना दिसत नाही म्हणूनच संवेदनशील व अस्वस्थ असणारा माणूस तडफडतोय जगण्यासाठी. हे सारं वास्तव या कवितासंग्राहातून पुढं आलं आहे.
 “बुध्द की युध्द” या कवितेतून तर असं जाणवतय की खरच आम्ही युध्द करणा-या पिढ्या तयार करत आहोत काय? का बरं आम्ही बुध्द मागणारी माणसं घडवू शकत नाही? आमची शिक्षण व्यवस्था कामचलावू आहे का? कि फक्त संवेदनाहीन कारखुन तयार करणारी प्रणाली बनलीय? या शिक्षणाने आम्हाला माणूसपणाची मूल्य शिकवायची सोडून माणसाला उधवस्त करणारी शस्त्रे हाती घ्यायची शिकवलीत. म्हणून आम्हांला बुध्द नकोय युध्द हवय़ का?. पण युध्दाने पुन्हा एकदा जग नष्ट होईल याचा विचारही शस्त्रे हाती घेणा-यांच्या लक्षात येत नाही का? जगभर आज युध्द हवय असं म्हणा-यांची संख्या वाढताना ही कविता डोळ्यात अंजन घालते.
     खरंतर सर्वच कविता विचार करायला भाग पाडतात. संग्राहाच्या शॆवटी “परंपरेचा कासोटा” ही कविता शेवट करते पण तिथून पुढे विचाराला सुरवात होते . या शेवटच्या ओळी-
“आजही
परंपरेच्या कासोट्याला लोंबकळत
समरस होऊन करताहेत, परिवर्तनाची बात”
-    कवी जयप्रभू (गोवा)

Monday, November 11, 2019

ताडोबा अभयारण्याला “ताडोबा” का म्हणतात?



ताडोबा अभयारण्याला “ताडोबा” का म्हणतात?

डोक्यात खूप वर्षांपासून घोळत असलेल्या प्रश्नाच उत्तर चंद्रपूरला ताडोबा अभयारण्यात गेल्यावर मिळाल. प्रश्न तसा साधाच आहे. ताडोबाला ताडोबा का म्हणतात? याच्या अगोदर खूप लोकांना विचारलं होतं आणि तिथही बाहेर असणा-यानां विचारलं होत पण उत्तर मनाला पटेल असं काही मिळालं नाही. मग आम्ही ज्यावेळी अभयारण्यात फिरत होतो. त्यावेळी आमच्या सोबत असणा-या गाईडला विचारलं तर त्यांन सांगितलं की “ताडोबा हा शब्द ब्रिटिंशांच्या उच्चारातून तयार झाला. म्हणजे त्या जंगलात खूप वर्षांपुर्वी अदिवासी राहायचे. त्या अदिवासीपैकी सुरवातीच्या टोळ्यात तारू नावाचा अदिवासी नेतृत्व करत होता. त्याने अनेक निष्पाप अदिवासींचे जंगली प्राण्यांपासून प्राण वाचवले होते. तो कोणत्याही जंगली प्राण्यापासून टोळीच संरक्षण करायचा. विशेष करून वाघापासून तर अनेक जणांना त्याने वाचवलं होतं. पण एकदा तारूवरच वाघाचा हल्ला झाला. आणि वाघाबरोबर झुंझत असताना तो जखमी झाला. आणि त्या हल्यात तारूचा मुत्यु झाला. अदिवासी समाजात आजही एक प्रथा आहे. जर वाघाच्या हल्ल्यात कोणाचा मृत्यू झाला तर त्याचं स्मारक (समाधी) जंगलात उभा केलं जात आणि नंतर त्या ठिकाणी वर्षाला स्मरण केलं जातं. त्यावेळी तारु हा पालक होता त्यामुळे त्याच्या नावापुढे “बा” हा शब्द जोडण्यात आला. बा म्हणजे मोठा.  मग तारू+बा= तारुबा असा शब्द तयार झाला. आजही  या तारूबाचं छोटसं स्मारक आहे. आज त्याला तिथे मंदिराच स्वरूप दिलं आहे. तिथं दरवर्षी प्रथेप्रमाणे अदिवासींची यात्रा होते. त्यामुळं या जंगलाला तारूबा जंगल असं म्हंटल जायचं.  
    पुढं सतराव्या शतकात ब्रिटीशांनी या जंगलाचा ताबा मिळवला. ब्रिटिंशांना तारूबा हा शब्द उच्चराता येत नव्हता. त्यांनी ताडूबा असं उच्चार केला. पुढं इंग्रजीत तो “TADOBA”  लिहला गेला. पुढं ब्रिटिंशांच्याच कागदपत्रावरून मराठीत हा शब्दा आहे तसा घेताला. आज ताडोबा हा शब्द सर्वांन कडून सर्रास वापरला जाऊ लागला. त्यालाच आपण ताडोबा अभयारण्य असे म्हणतो.  
धन्यवाद मंगेश सर या अत्यंत महत्वाच्या माहिती बद्दल.
धन्यवाद राजाभाऊ आणि उषाताई... आपण खूप व्यस्त वेळातून ताडोबा चा फेरफटका घडवला.


Wednesday, October 2, 2019

सत्य आणि अहिंसेची आज जगाला गरज





या जगाला शिकवण्यासारखे माझ्याकडे नवीन काहीच नाही. सत्य आणि अहिंसा या तर डोंगराइतक्या जुन्या गोष्टी आहेत.”
                                       - महात्मा गांधी

     मला कमाल वाटते बापूंजींची कारण एवढं सारं जगाला देवूनही ते म्हणतात सत्य आणि अहिंसा या जुन्या गोष्टी आहेत. मान्य आहे कि सत्य आणि अहिंसा ही खूप जुनी तत्व आहेत म्हणजे गौतम बुध्दांनी ही हिच शिकवण दिली. पण बुध्दां नंतर जगाला सत्य आणि अहिंसा कुणी शिकवली असेल तर ती माहत्मा गांधी यांनी. हे सांगण्याच कारण म्हणजे मी २००९ साली माहात्मा गांधी यांच साकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेलं सत्याचे प्रयोग (आत्मकथा) हे पुस्तक वाचलं होतं. त्यावेळी पुस्तक खूप आवडलं होतं. पण आज ज्यावेळी मी विचार करतो कि पुस्तकातील काय आवडलं होतं तर ते म्हणजे “गांधीजींचा प्रमाणिकपणा जो त्यांच्या जगण्यातून जाणवतो. पुस्तकातील प्रत्येक प्रसंगात गांधी आजूबाजूच्या भवतालाबद्द्ल आणि स्वता:च्या आतील भवताल यांच्यात होणा-या संघर्षाबाबत बोलतात. तो संघर्ष झाला नसता तर कदाचित गांधी सत्य आणि अहिंसे पर्यंत पोहचले नसते. त्या संघर्षातूनच त्यांना बाहेरील जगात जगण्यासाठीच्या संघर्षाची शस्त्रे मिळाली आणि ती म्हणजे सत्य आणि अहिंसा. हे जगासमोर मांडताना त्यांनी स्वता:चा विचार तसा बनवला म्हणून आचार तसाच झाला आणि आचार तसा झाल म्हणून प्रचार आपोआप तसाच झाला. जो जगातील त्या कालखंडातील माणसांच्या ह्रदयात कोरला गेला. आजही तो काही प्रमाणात काहीच लोकांच्या मनात शिल्ल्क आहे.
     सत्यग्रही मार्गाने लढण्याची ताकत त्या कालखंडात गांधींनी बाळगली म्हणूनच आज जग शांततेच्या मार्गाने चालत आहे. अन्यथा १९१५ पासून सातत्याने जगात युध्दजन्य परिस्थिती होती. पहिलं महायुध्द, दुसर महायुध्द, याच्यात प्रत्येक राष्ट्रातील नेता हिंसेवर विश्वास ठेवून लढाई लढत होता. म्हणजे १९४२ ते १९५२ या दशकात तर प्रचंड मोठ्या प्रमाणात युध्दाने मानवी आणि साधनसंपत्तीची हानी झाली आहे. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, जपान, रशिया आणि इतर अनेक देशांच्या नेत्यांना वाटत होत की दुस-यांचा परावभ केला कि आपण सुरक्षित राहू आणि आपण जगावर राज्य करू. पण त्यांच्या हे लक्षात आलं नाही की कोणतीच राज्य ज्यांनी हिसा केली ती कायमस्वरूपी टिकली नाहीत. जगाला जर टिकून राहायच असेल तर प्रेम, अहिंसा आणि सत्याच्या मार्गावरच चालल पाहिजे हे माहात्मा गांधीने ओळखलं. मग गांधीने सत्याग्राच्या मार्गाने लढाई उभा केली. गांधी कोणालच शत्रू मानत नव्हते. त्यांना वाटायचं की जगात जन्मालेल्या प्रत्येकांने प्रेमाने, सत्याने आणि अहिंसेन चाललं तर ईश्वराला (निर्गाला) अभिप्रेत असणारा मानवी समूह तयार होईल.    
माहात्मा गांधी जयंतीच्या आपणास शुभेच्छा!

Saturday, September 28, 2019

“यशानाना बायकोसह आत्महत्या का करतो?”






नुकतीचं वाचनात आलेली कादंबरी “अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट”
लोकवाड:मय गृह प्रकाशित व आनंद विंगकर लिखित कादंबरीने गेली दोन दिवस झालं अस्वथ केलंय आणि विचार करण्यास भाग पाडलय. कारण एखादा माणूस ज्यावेळी आत्महत्या करतो त्यावेळी तो फक्त माणूस मरत नाही तर संपूर्ण कुंटूब उधवस्त होतय. नव-याच्या डोक्यात हा विचार आला तर तो बायकोला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडतो, बायको लाहान मुलांना भाग पाडते. का बरं असं होतं असेल? त्यावेळी त्यांना कोणताच जगण्यासाठी आशेचा किरण मिळत नाही का? गावातील, भावकीतील कोणीच कसं त्यावेळी आधाराला धावून येत नाही. मानसिकता एवढी कशी खचते. एकट्या शेतक-याने आत्महत्या करण वेगळ पण सामुहिक आत्महत्या करण म्हणजे ज्याच्या डोक्यात पहिल्यांदा नकारात्मक विचार आला तो व्यक्ती इतर व्यक्तीनां आत्महत्या करण्यास भाग पाडतोय याचा अर्थ दिवसेंदिवस नकारात्मक विचारांचे प्राबल्य वाढलेलं आहे. कौटुंबीक, सामाजिक नकारात्मकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावेळी ओळखीच्या लोकांची मानसिकता काय असते? नातेवाईक कसे वागतात? गावातील इतर माणसं त्या कुटंबाशी कसं वागतात? आत्महत्या केल्यावर तरी या लोकांची मानसिकता बदलते का? तर.. नाही. हेच या कादंबरीत रेखाटलय.   
     ज्वारी व शाळू काढण्याचे दिवस आहेत. कथेचा नायक यशानाना आपल्या बायको – मुलासह रानात शाळू काढत असतो. अचानक त्या रात्री आभाळ गर्जत आणि अवकाळी पाऊस येण्याचं चिन्हं दिसतं. त्या अवकाळी पावसामुळे कोणी आत्महत्या करतो का? तर वरवर पाहाता कोणीही नही म्हणेल पण ज्याचे आयुष्याच त्या पिकावर आहे आणि ते पिकचं आता पाऊसाच्या पाण्यात वाहून जाणार म्हटल्यावर तो माणूस खचतो तसं यशानाना खचला. कारण घर चालवण्यासाठी घेतलेलं सावकाराचं देणं, पतसंस्थेच कर्ज आणि सातत्याने त्यांना येणार अपयश त्यामुळे त्यांना जगावास वाटत नाही. अजून एक महत्वाचा सामाजिक घटक म्हणजे त्यांना मुलगा पाहिजे असतो पण तीनही मुलीच असतात. त्यामुळे यशानाना बायकोवर सारखा चिडायचा व ओरडायचा. त्याच्यातून त्यांच्यात वादावादी व्हायची. त्यातूनच त्यांना नैराश्य येत. पण ते दु:ख पचवूनही संसार करत असतो. मात्र एका टप्प्यावर त्याला हे सारं असाह्य होतं. मुलीनां शिकवतो. थोरली उषा धाडसाने शेतातील काम करत माहाविद्यालयीन शिक्षण घेते. मधवी आशा आणि धाकली नकुशी. नको असताना झाली म्हणून तीला नकुशी म्हणायची. हे सारं कुटुंब यशानाना आणि पार्वती मिळेल त्या कामावर, शेतातील मजुरीवर चालवत असतात. मग अचानक का बरं हे सारं कोलमडत. तर ते अचानक नाही. हे हळूहळू सुरू झालं. पत्येक टप्प्यावरं ते वाढतच गेलं. कधीच त्यांच्या मनासारखं घडलं नाही. त्यांनी त्याच्या नौकरी असणा-या भावाकडं अपेक्षा केली पण मदत नाही मिळाली. गावातील लोकांना मदत मागितली पण नाही मिळाली. शेतीतून उत्पन्न मिळाल नाही. कधी पिक चांगल यायच पण काहीतरी नैसर्गिक अपत्ती यायची आणि नुकसान व्हायचं. वंशाला मुलगा नाही याची खंत. बायकोबरोबर होणारी भांडण. घर चालवण्यासाठी घेतलेले सावकाराचे कर्ज जे दिवसेंदिवस वाढतच गेले. ते फेडता आले नाही म्हणून सावकाराने जमीन मागितली. त्याचा त्रास यशनानाला झाला. मग मात्र त्याला वाटलं की जगण आता शक्य नाही. म्हणून त्याने मृत्यू जवळचा केला. बायकोनेही नव-याचा शब्द प्रमाण मानला आणि दोघांही विष घेतलं.
     या सा-या अडचणीच्या काळात कोणत्यातरी टप्प्यावर जर गावातील कोणीही पाठीशी उभा राहिलं असतं आणि धिर दिला असता तर यशनानांन आत्महत्या केली नसती. आज कित्येक यशानाना आणि पार्वतीबाई आधार नाही म्हणून आत्महत्या करतात. कारण आज गावातील निर्मळ मनाची, प्रमाणिक, दुस-यांना आधार देणारी जाणकार पिढीचं संपुष्टात आलीय. जे आहेत त्यांना आजची गावव्यवस्था विचारात घेत नाही. अगदी बोटावर मोजण्याएवढे प्रमाणिक गावकरी शिल्लक आहेत. ते या व्यवस्थेच्या बाहेर फेकले आहेत. एकटे पडलेत. गावात धुमाकूळ आहे तो स्वार्थी राजकारणी, सावकार, काही नौकरदार आणि ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांचा. हा एक गट तयार झाला आहे.  त्यामुळे कष्टकरी लोकांना नैतिकतेने आधार देणारी गावव्यवस्था दिसेनासी झालीय. एवढ्यातही गावातील नवबौध्द जे आजही गरीब आहेत तेच मराठा व इतर जातीतील गरीबांना मदत करतात म्हणजे जात विसरून मदतीस येणारा हा वर्ग आर्थिक विवेचनातील आहे. आणि दुस-या बाजूला सर्व जातीतील श्रीमंत एका बाजूला येत आहेत आणि तेच गावावर राज्य करत आहेत. पण त्यात सर्वांगीन विकासाला आणि माणसाला मानसिक आधार देणा-या मूल्यांना महत्व नाही. यातून आहिरे आणि नाहिरे वर्गाचा उदय आज गावव्यवस्थेत बघायला मिळतोय. त्यामुळे अशा आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. याच आठवड्यात जालना जिल्ह्यात तीन मुलीसह आईने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. तिच्या नव-या ने काही महिन्यांनपूर्वच आत्महत्या केली होती. परवाच्या दिवशी बार्शीत एका कुटंबाने दोनमुलांसह विष घेवून आयुष्य संपवलय. कुठे चाललीय आपली मानवी व्यवस्था कोणी सांगेल का?
     कादंबरीत पुढे यशानानाच्या मृत्यू नंतर त्या तीन मुलीच काय होत? कोण आधाराला धावून येत.? उषा ही थोरली ,त्यामुळे सारी जबाबदारी तिच्यावर येते.. ती सावरण्याचा प्रयत्न करते पण तरीही गावातील नाठाळ लोकांच्या नजरा त्यां तिघी बहिणीना जगू देतील का? हे सारं आपणाला कादंबरीत सापडेल. उषा ही आर्मीतील सुभाष नावाच्या कानाड्याच्या मुलावर प्रेम करतेय. ते लाहनपणापासूनचे दोस्त आहेत. ती त्याच्याबरोबर पूळ्न जाणार असतेय आणि त्याच दिवशी अवकाळी पाऊस येतो. आणि घरी आई वडिल विष पेतात. आईला दवाखान्यात नेहलं जात. तिथ हा सुभाष मदतीला धावून जातो. गावातील आणि भावकीतिल एकच माणूस असतो. तिथली बिल हा सुभाष देतो. पण पार्वती काही वाचत नाही. तिच प्रेत मिळेपर्यंत गावकरी पोहचतात आणि त्यांची चर्चा सुरू होते की पोरगी पळून जाणार म्हणून आईने विष घेतलय. गावात उषावरच आरोप होतात. पण शेवटी उषाच स्वात:ला धीर देऊन लहान बहिनीना आधार देते. उषाचे चुलते गेल्यावर त्या घरात त्या तिघी राहातात. त्यावेळी मात्र त्यांची काय अवस्था होते ह्याची कल्पना न केलेली बरी. ज्या घरात काल पर्यंत आई-वडिलां सोबत राहेचे आणि आज तेच घरात नाहीत. त्यावेळी त्या चिमुकल्या मुलीची काय स्थिती झाली असेल. पुढं जगण्याचा त्यांना धिर मिळेल का? का त्यांनाही वाटेल आपण संपवून द्याव आयुष्य.. हे येणारा काळच सांगेल.
  आनंद विंगकर यांनी आत्महत्या घडण्यापूर्वीचं आणि घडल्या नंतरचं कुटंबातील व त्यांच्या अवतीभवतीच वातावरण जे मांडलय ते अस्वस्थ करतयं.

Thursday, September 5, 2019

तू आहेस तरी कोण?




         एक व्यक्ती दररोज फिरण्यासाठी नदी किना-यावर जायचा. तो किना-यावर फे-या मारायचा. लाट आली कि त्या लाटेसोबत छोटे छोटे मासे बाहेर यायचे. फे-या मारताना किना-यावर आलेले मासे तो एक एक घेऊन आत फेकायचा. असं दररोज घडायच.  त्या दिवशी मात्र नदीमध्ये पाणी भरपूर आलं. त्यामुळे खूप मासे बाहेर आले होते. तर त्या व्यक्तीने एक एक मासा घेऊन आत टाकायला सुरवात केली. समोरच्या बाजूला कोप-यावर एक म्हातारा बसलेला होता. त्याने विचारलं, “ ऒ पाव्हण, आव किती मास्यांना वाचवाल? सा-या किना-यावर मासंच मासं पसरलेलं आहेत.” त्यावर त्या व्यक्तीने काहीच न बोलता, पुढं वाकून बाहेर आलेला मासा उचलला आणि पाण्यात सोडला. हे करताना त्या म्हाता-याकडं बघत म्हणाला, “बाबा, मला माहित आहे की मी सर्वच मास्यांचे प्राण नाही वाचवू शकणार पण इकडं बघा जरा तुमच्या लक्षात येईल. मग परत त्या व्यक्तीने बाहेर तडफडणारा मासा उचलला आणि पाण्यात टाकला. “हे बगा बाबा, फरक या एका मास्याला पडतोय, तो कसा पण्यात आनंदात पोहतोय.” त्यावर त्या म्हाता-याने पुन्हा प्रश्न विचारल, “तू आहेस तरी कोण?” त्यावर त्या व्यक्तीने बाहेर पडलेला मासा आत फेकत उत्तर दिलं, “मी शिक्षक आहे. मला माहित आहे कि हजारो विद्यार्थ्यांच आयुष्य नाही घडवू शकत पण एका तरी विद्यार्थ्याच आयुष्य निश्चितच घडवू शकतो.
ज्या शिक्षकांनी प्रामाणिकपणे एका तरी विद्यार्थ्यांच आयुष्य घडवलयं त्या सर्वना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!!!

Friday, August 30, 2019

बैलपोळा (यसन सैल केलेला दिवस)



वयात आल्या आल्या बैलाच्या नाकात यसन बांधली जाते ती बैल जिंवत असे पर्यंत नाकात असते पण ज्यादिवशी सैल केली जाते तो दिवस म्हंणजे बैलांचा सण “बैलपोळा”.
माझं आता बालवाडीत जाण सुरू व्हतं. खायाला सुकडी मिळायची. कवा कवा भात, आन एक एक अंडी बी द्यायची. मला लय भारी वाटायंच. बई बी मला पुढ बसवायच्या. लेकरांना गप बसवायला सांगयच्या. म्या मोठा असल्यामुंळ सारी लेकरं भ्यायची. एकदा तर म्या मला दिल्याली सुकडी कागदात बांधून सादू बैलाला आणली. त्याच्या म्होर ठिवली. त्यान बी दोन घासातच संपवली. म्या मग दररोज माझ्यातली थोडी सुकडी आणायचॊ आन सादुला द्यायचॊ. मला लई वाटायच. म्या जर डाकटर असतो तर ह्याला एका झटक्यात निट केला असता. बप्पा का ह्याला दवाखान्यात नेत नायती. लय ब-या म्या नानाला अन बप्पा ला म्हण्लं सादूला दवाकान्यात दाखवा. एकदा दोनदा डाकटर बोलवला पन काय फरक पडला नाय.
बैल पोळ्याचा सन जवळ आला व्हता. दोन दिसावर व्हता. बैल धुवायची. त्यांना चांगली आंगूळ घालायची. म्या दुस-या बैलाकड नाय पन सादुचं सार करू लागायचॊ. म्या बैलाला रंगवायचो. त्यांच्या शिंगाला हेंगुळ लावून त्याच्यावर रंगाच्या पताका लावायच्या. पाठी-पोटावर चित्र काढायचॊ. त्या दिशी बैलाला खाऊ पिऊ भरपूर घालायच. कोणत्याच कामाला जुपायच नाय. सगळं झालं की गावातून हलकी वाजवत मिरवणुक काढायची. नेमकं सादुला उठायला बी येत नव्हतं. बळच उठवलं. जाग्यावरच आंग धुतलं. शिंगाला हेंगुळ लावला. आंगावर झुल टाकली. आन दोन्ही बैलाची गावातून मिरवणूक काढायची म्हनून बप्पान धरून पुढ आणली.
गावात बैल मिरवण्याचा पहिला मान हा पाटलाचा. पाटलाची बैल इशीवरून गेली की मग त्याच्या माग सा-या गावान न्यायची. पन त्या साली गावात एका धनगाराच्या माणसांन नविनच बैल जोडी घेतली व्हती. त्यांन गावात सगळ्याच्या आधी मिरवणूक काढायला सुरवात केली. ही बातम्या पाटलाकडं गेली. तशी पाटलाची माणसं भाडंणाला आली. जोरात भांडण लागली. बैलाला काठ्यान माराया लागली. चार गावातली शाहाणी माणसं पुढं हुवून वाद मिटवाया लागली. धनगाराची पोरं बी मारामारीला उठली. कसं तर वाद मिटला. त्या धनगाराला माहिती नव्हतं की पहिला मान हा पाटलाचा असतो. त्यो पहिल्यांदाच बैल घेऊन शेती कराया लागला व्हता.
आमचा सादू काय चालाना. शेवटी वैतागून म्हादुची आन एका वासराची आमच्या भावकीतल बबनआण्णाच्या बैलासोबत मिरवणूक काढली. मिरवणुक झाली की एक गाय् जोडीला उबा करून लगीन लावायची परंपरा हाय. तसं भावकीतील तीन बैल जोड्या एक गाय आन आमची बैल उबा केली. सादू थोडायेळ उबा राहिला. पुन्हा खाली बसला. लगीन लावण्यासाठी बामनाला बोलवाव लागंत. गावात एकच बामन असल्यामुळं सगळ्या गावातील लगनं लावायच म्हण्ल की उशीर व्हायचा. आमच्या बप्पाला बी मंगळअष्टका यायच्या. बामन नाय आला की बप्पा बी बैलाची लगनं लावायचं. मग बप्पानंच मंगळ अष्टक सुरू केलं. म्या सादूच्या जवळंच बसलो व्हतो. लगनं लाऊन झालं की एका मोठ्या पाटीत चाड-नळ (पेरणी करण्यासाठी वापरतात) गाडग, पुरण-पोळ्या, अन गाईच गोमतर ठिवून ती पाटी बैलाच्या मालकाच्या डोक्यावर दिली जाते. मालकांन आंगावर घोंगडी घ्यावी लागते. हे सगळ घेऊन बैलाच्या बाजून पाच फे-या मारावा लागतात. हे करताना माग एक दोन लेकरं परात नायतर पाटी वाजवत पळतात. त्या साली म्या परत घेतली अन.. नानाच्या माग पळत व्हतो. ते पुढ म्हनायचे “चौर चौर चांगभल!  म्या माग म्हनायच “चांगभल”  “चौर चौर चांगभल!  म्या “चांगभल”   “चौर चौर चांगभल! म्या “चांगभल”   म्हसोबाच्या नावान! मागून म्या “चांगभल” येडाईच्या नावान “ चांगभल” असं करत फे-या माराव्या लागल्या.  
मला लय भारी वाटलं परात वाजवाताना. झाल्यावर म्या सादूच्या जवळ आलो. सा-याची बैल त्यांच्या त्यांच्या दावणीला बांधली. म्हादू ला बी नेऊन बांधल. पन सादू काय उठाना. रात्रभर तीथच व्हता. दुस-या दिशी पाच-सहा माणसानी काट्याटाकून उचलून दावणीला आणून ठिवला. पुन्हा काय जाग्यावरचा उठला नाय. त्याचा शेवटाचा दिसं व्हता. म्या बालवाडीतून आलो. त्या दिशी आम्हांला सुकडी आन अंड बी दिल्याल. म्या थोडी सुकडी आन आंड घिऊन आलो. सादुच्या म्होर ठिवलं. त्यान काय खाल नाय. का खात नाय म्हनून म्या त्याला उठवाया लागलो. पन त्यो काय हालाचना. माशा घोंगावत व्हत्या. माझा आवाज ऎकून बप्पा आलं. त्यांनी बगीतंल आन तोंड बारीक करून नाना ला आवाज दिला “नाना आर इकड ये, सादु मेला” असं म्हणल्य म्हणल्या मला रडू आलं. म्या मोठ्यान रडाय लागलो. आय आन काकू बाहिर आल्या. आयन मला काकाला घेतलं. नानाच बी डोळ पाणावल् व्हतं. बप्पा बी रडाय लागलं. थोड्या येळानं खाटीक आला. बप्पानी त्याला द्यायचा ठरवलं व्हतं. पन म्या लय रडलो. बैल काय खटकाला इकु दिला नाय. आमच्या रानात नेहुन पुरला. त्याच्यावर आम्ही एक मोठा दगड ठिवल्याला हाय.  आन काटाडी टाकली. पाच –सहा वरिस ऊसाला गाडी वडायला हाच सादू बैल व्हता. हिरीचा खड्डा बघून उडी मारणारा हाच सादू व्हता. रस्त्यांनी सरळ चाळणारा हाच सादु व्हता. गाडित कितीबी बोजा भरला तरी नेट लावून वडणारा हाच सादू व्हता. ट्राफिक बघून जाग्यावर थांबणारा हाच सादू. तरीबी बप्पा आज त्याला खाटकाला द्यायला निघाल व्हतं का तर संसार लय फाटल्याला व्ह्ता ! पुन्हा न शिवण्यासाठी!

(यसन कादंबरीतून पान नंबर ३२,३३,३४ वरून साभार- )

Thursday, August 29, 2019

“ भटक्या जमातीतील प्रकांडपंडित माणूस म्हणजे रावण (राजा राक्षसांचा)”






नुकतीच शरद तांदळे लिखीत व न्य़ू ईरा पब्लीशींग हाऊस प्रकाशित “रावण” ( राजा राक्षसांचा) ही कादंबरी वाचली आणि आजपर्यत ऎकलेल्या पुराणकथेतील गोष्टीनां छेद मिळाला. लहानपणापासून वाटायचं की रावण हा राक्षसच आहे आणि सर्व राक्षस वाईट असतात. पण कादंबरी वाचल्यानंतर जाणवल की रावण हा प्रकांडपंडित माणूस होता. शरद तांदळेनी रावणाची व्यक्तीरेखा माणूस म्हणून समोर आणली आहे. आणि ते आताच्या विवेकी विचार करणा-या माणसाला पटण्यासारखी आहे. कारण राक्षस हे वाईट होते त्यांनी अन्याय अत्याचार केला आहे असचं अनेक गोष्टीतून आणि पुराणातून ऎकायला मिळालं आहे. पण कधीच हा प्रश्न उपस्थित झाला नाही की राक्षस हे कोण होते? ते का बरं अन्याय अत्याचार करत होते? ते मूळचे कुठले? ते दिसायला एवढे कुरूप कसे असायचे? त्यांच्यात एवढी ताकत कशी यायची? ते जंगलातच का राहायचे? त्यांची घर नव्हती का? ते रानटी आदिमानवासारखे का वागायचे? या सा-या प्रश्नांचा विचार केल्यावर हळू हळू जाणवायाला लागतं की राक्षस हा मुळचा जंगलात राहाणारा, मांसाहार करणारा, रानटी जमातीतील माणुस होता. त्यांना माणूस होण्याची संधीच मिळाली नाही त्या कालखंडात. म्हणून त्यांच्यावर राक्षस असा शिक्का मारला गेला. याच्या पाठीमागे महत्वाच कारण आहे ते राजसत्ता या जमातीत वारंवार युध्द व्हायची आणि रज्य तू चालवू शकतो का मी? यात अनेक जमाती होत्या. त्यातील आपल्या लक्षात राहिल्या त्या “देव” व “रक्षास” या नावाने. यातील मधला मार्ग निघाला तो नंतरच्या कालखंडात तो म्हणजे “माणूस”. देव जमातही माणूसच होती आणि राक्षस जमातही माणूस च होती हे कळायला मोठा कालखंड लोटला. हेच शरद तांदळेची रावण कादंबरी वाचल्यावर कळायला मदत होते.   
       असुरांच्या कुळात अनेक वंश होते. दानव, दैत्य, आसुर, नाग, गरूड, या वंशातील लोक हे जंगलात राहत असत. त्यांना जगण्यासाठी वृत्तासुरांन स्थर्य दिलं. नंतर त्याच कुळातील बळी राजांनं त्यांना स्थैर्य दिलं. शेतीचा विकास केला. आणि रानटी जंगली माणसांना शॆती करायला लावलं. त्यामुळे काही प्रमाणात गाव वसली आणि आसुरांचा रानटीपणा कमी झाला. पुढं बळीराजांचं राज्य वामनानं जिंकलं आणि परत आसुरारंनवर अत्याचार सुरू झाले. या सर्व कुळातील रानटी माणसांना रावणाने राक्षस कुळाच्या नावाखाली एकत्र आणलं आहे. आणि तिथेच त्यांना राक्षसातील माणूस घडवण्याचा प्रयत्न झाला आहे असं कादंबरीत वाचायला मिळतं. लंके मध्ये प्रत्येक नागरिकाला मुलभुत जगण्याचे हक्क होते. प्रजेला सोन्याचे भवन बांधून दिले होते. रावणाच्या सेनेत काम करणा-या प्रत्येक सैनिकाला घर आणि पगार दिला जायचा. त्यामुळेच लंकेच राज्य व्यवस्थित चालत होत. जर ते राक्षस असते तर सोन्याची लंका उभा राहिलीच नसती. त्यांच्यात खूप मतभेद होते, ते क्रूर, निर्दयी होते पण ते तसे का झाले याचं उत्तर रावण या कादंबरी तून मिळतं. कादंबरीत पान नंबर ७१ वर एक वाक्य आहे. “कपटाची लढाई कपटान लढलो तरच सहज विजय मिळेल. आज पर्यंत आपल्या जमाती कधीच कपटान लढल्या नाहीत त्यामुळे राज्य गमावून बसल्या”. रावणाने वेदांचा आणि इतर ग्रंथाचा अभ्यास केलता म्हणून त्याला वाटायच की “शारीरिक शक्तीपेक्षा बौद्धीक शक्ती अधिक श्रेष्ठ असते.  म्हणून रावणाने अनेक  प्रकल्प चतुराईने हाती घॆतले, लढाया ही लढला आणि इंद्रालाही पराजित केलं. सर्वदूर राक्षसांच राज्य पसरविणारा हा एकमेव राजा होता.
       काही ठिकाणी कादंबरीत आलेले संदर्भ आजच्याही काळाला लागू पडतात. त्यातील एक म्हणजे “ कोणा एकाला सर्व सुखांची आहुती देवून संघर्षाकरिता रक्ताचा अभिषेक घालावा लागतो. त्यानंतरच त्याचे आप्त, स्नेही किंवा पुढच्या पिढीला स्थैर्य व सुखसमृध्दी मिळते.” हे वाक्य रावणाच्या दूरदृष्टीचे व त्याच्या माणसांच्या प्रेमाविषयीची भावना दाखवून देत. पण जर राज्य उभा करायच असेल तर ज्ञान आवश्यक आहे. आणि ती ज्ञानाची भुक कुटुंबापासून दूर करते. याच्यात अनेक कुटुंबाची वाताहात होते. ते सहन केलं तरच आपलं भविष्य स्थिर असेल नाहीतर दुसरं कोणीतरी आपल्यावर राज्य करेल.
      मानसिक भीती पोटी आर्यांच्या मनात खोलवर गुलामगिरी रुजली आहे. हे जर रावणने सांगण्याचा प्रयत्न केला असता तर तो वैदिक परंपरेचा सर्वात मोठा शत्रू ठरला असता.  आणि तो वौचारिक गुलाम झाला असता ते रावणाला मान्य नव्हत. अविकसित लोकांना गुलाम म्हणून वागवण्यात सध्यातरी देव जमातीला आनंद मिळतोय. विद्धवान आर्य ऋषीसुध्दा मृत्यूयच्या भयान एक प्रकारे वौचारिक गुलाम बनतातच. विद्धवान जेव्हा वौचारिक गुलाम बनतो त्यावेळी तो राजसत्ता आणि धर्माचा गैरफायदा घेतो. आणि त्याच्यासारखेच वौचारिक गुलाम बनवतो किंवा शोधतो.  कोणी नविन विचार मांडला तर धर्माच्या आणि राजसत्तेच्या विरोधात आहे म्हणून त्याला राजव्यवस्थेतून हाकलून दिलं जात. देव जमात बुध्दीमान होती त्यांनी आर्याला याचकाच्या भुमिकेत ठेवलं आणि  स्वता:ची स्तुती करुन घेण्यासाठी बंधने लादली. शेवटी आर्य व आनार्य दोघेही गुलामच राहिली.
     आस्तिक आणि नास्तिक यावरही चांगले विचार यातून पुढे आलेत. नास्तिक म्हणजे तो असतो जो निसर्गान निर्माण केलेल्या जमाती, प्राणी-पक्षी, वृक्ष यांना निषिध्द मानतो. काहीजण तर जन्म देणा-या स्त्रीलाही निषध्द मानतात. निसर्गान निर्माण केलेल्या गोष्टी निषिध्द व अपवित्र ठरवतो, तो नास्तिक होय. नास्तिकपणा हा मानवनिर्मीत धर्म आणि वेदांना न मानण यावरून ठरत नाही.  दुसरं म्हणजे स्वतंत्र्य हे धर्माने किंवा राजसत्तेनं देण्याची काहीच गरज नाही ते तर निसर्ग नियमाचा अविज्यभाग आहे. जन्मताहाच सर्व जण स्वातंत्र्य आहेत पण मानवनिर्मित नियमांमुळे जगण कठिण होत आहे. ज्या धर्माने जागृत समाज निर्माण होत नाही तो धर्म कसला? जन्मावरून प्रतिष्ठा ठरतं असते असं समजणा-या धार्मीक विचारांचा गुलाम जो गुलाम होतो तो अजून माणूसच झाला नाही. निसर्गाचा मूळ आधार आसलेली धर्मसहिंता बनवून माणसांत पेरण म्हणजे माणुस धर्म प्रस्तापित करण होय. बदल हा निसर्गाचा मूळ नियम आहे. म्हणून समानता आणि स्वातंत्र्य मिळेल अशी नवीन संस्कृती रावणाने तयार केली. समानता ही माणसा-माणसात असावी, ज्या धर्मात वर्गवारी जन्माने येते, कर्माने नाही, ते योग्य नाही. वर्गवारी असली पाहिजे पण त्या आधी प्रत्येकाला कर्तृत्व आणि ज्ञानग्रहणाची संधी मिळाली पाहिजे, मगच त्यांच्या बुध्दीच्या आणि क्षमतेच्या मूल्यांवरून वर्गवारि करावी.  हे सारं उभा करण्यासाठी ज्ञानी विचारांची फौज लागते व ते टिकवण्यासाठी विशाल ह्र्दयाचे राज्यकर्तेही लागतात. आणि सर्वात महत्वाच म्हणजे जगण्याचा लढा सांस्कृतिक लढ्यात परावर्तित झाल्याशिवाय मोठं यश मिळूच शकत नाही. व्यक्तीपेक्षा साम्राज्य आणि साम्राज्यापेक्षा संस्कृती महान असते. हे ठरवूनच रावणाने स्वातंत्र्य, सुरक्षितता व समानता ह्या मूल्यांच्या आधारे राक्षस साम्राज्यांचा पाया रचला.
    दुस-यांचा अदांज घेण्यासाठी वापारलेली चाल ब-याचदा आपलाच अंदाज घेण्यास दुस-याला फायदेशीर ठरते. याच बेरजेचं गणित रावणाने अनेक लढायात लावली. स्वार्थीपणान, लाचारीन किंव भीतीन आपल्याला कुणी मोठेपणा देत असेल तर तो दिर्घकाळ टिकत नसतो. अशा लोकांवर फार विश्वास ठेवायचा नसतो, अशा प्रकारच्या स्तुतुची भुरळ पडली तर घात निश्चितच असतो. रावणाच्या चिंतनातून अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. ज्या धर्माच्या धारणा कालानुरूप बदलत नाहीत तो धर्म गुलामांची फौज तयार करत असतो. एका विशिष्ट काळात किंवा विशिष्ट परिस्थितीत धर्माचे नियम बनवले जातात. कालानुरुप त्या नियमांमध्ये बद्द्ल झाले नाहीत तर त्या विचारांना ढोंगी लोक शाश्वत सत्य मानतात. खरं तर शाश्वत असं काहीच नसतं. विचारांमध्ये बदल जसा अपेक्षीत असतो तसाच धर्माच्या नियमातही बदल असलाच पाहिजे. पान नंबर ३०२ वर रावण आणि मेघनाद यांच्यात एक संवाद आहे. त्यात रावणाने दिलेल उत्तर हे आजही लागू पडतं. “हा वारसा उभा करण सोपं होतं, पण तो टिकवण अवघड काम आहे. त्यात परिपूर्ण होण्यासाठी तुला तुझ्या कुवतीशी संघर्ष करायचा आहे. संघर्ष करण म्हणजे केवळ शस्त्र उचलून समोरच्याला पराजित करणं नव्हे. वैयक्तिक प्रतिमा उंचावण हा सर्वात अवघड संघर्ष असतो आणि मेघनाद तो तुला करायचा आहे.” यावरून लक्षात येत की एका बापाची प्रगल्भता किती ताकदीची होती. कादंबरी वाचत असताना असे अनेक प्रसंग आले आहेत. रावणाची पत्नी मंदोदरी ही किती सुस्कृंत विचार करायची हे तीच्या सीतेबद्दलच्या विचारातून लक्षात येत. लंकेत सर्वच राक्षस या विचाराने राहत होते म्हणुनच लंका उभा राहिली होती. मंदोदरी रावणाल म्हणते “राजन, स्त्रीच शील व पावित्र्य हे तिच्या आत्म्यान, विचारांन किंवा प्राप्त अवस्थेवरून नाही ठरवलं जात, तर ते फक्त तिच्या शरिरानं ठरविलं जात.  समाज सीतेचं दुख आणि आक्रोश बघणार नाही, तिच्या भावनेचाही विचार करणार नाही. अपहरण तिच्या चारित्र्यावर डाग लागला आहे. जो आता कधीच पुसून निघणार नाही. जो आपल्या मुळं झालं आहे.  राजन राजकिय डावपेचात कोणीही जिंकत असेल, पण पराजय मात्र कायम स्त्रीचाच होत असतो. तो पराजय शूर्पणखा व सीता या दोघींमध्ये दिसत आहे”. या पध्दतीने लेखकाने त्या कालखंडातील घडलेल्या घटनेचा मागोवा घॆतला आहे. जो सध्याच्या परिस्थितीत लागू पडतोय.        
         कादंबरीचा शेवट हा रावण व लक्षम्ण यांच्यातील मृत्युच्या अगोदरच्या संवादाने होतो, ते संवाद वाचून रावण किती समजदार आणि महान होता हेच निदर्शनास येत. “लक्षम्णा ज्ञानाची हत्या कोणीही करू शकत नाही. कारण निसर्ग मानव जातील ज्ञान देत आला आहे. त्याच्यावर कोणत्याच धर्माची वा व्यक्तीची मालकी नाही. मी मेलो तर ज्ञान लुप्त होणार नाही, त्यामुळे ज्ञानाची हत्या झाली, हा समज डोक्यातून काढ. लक्षम्णा, ज्ञान ग्रहण करण्यासाठी आधी निसर्गाशी एकरूप होणं गरजेच आहे. त्याचबरोबर स्वत:शी संवादही महत्वचा आहे. स्वत:शी केलेला संवाद ज्ञानाच्या कक्षा रंदावतो. कोणतही ज्ञान अंतिम नाही. चिकित्सक वृत्तीन ज्ञानग्रहण केलं, तर जरासं ज्ञानही जीवनात प्रकाश बनून जीवन तेजोमय करत”   हा संवाद पुढं बराच वेळ सुरू राहतो. लक्षण म्हणतो, “गुरूवर्य, माझ्याविषयीचा राग व व्देष विसरून शत्रूलाही ज्ञान देण्याचं आपलं औदार्य बघून मी कृतकृत्य झालो. आपण तीन्ही लोकांमधील श्रेष्ठ गुरू आहात.”  पुढं प्राण कंठाशी येतो आणि राक्षसी साम्राज्य सोडून जावसं वाटत नसताना, रावणाचा प्राण निघून जातो. कादंबरी वाचत असताना मानवी दृष्टीकोनातून जर याच्याकडं पाहिलं तर अनेक गोष्ट मनला पटतात आणि लेखकाने ज्या पध्दतीने शैली वापरलीय ती अत्यंत भेदक आहे. त्यामुळे कथानक शॆवट पर्यंत वाचनीय झालं आहे.  

Monday, August 26, 2019

“अंगावरच्या कपड्यांवर आलेल्या युवकाच्या कंपनीची करोडो रुपायांची उलाढाल आणि १०० बेकार युवकांच्या हाताला दिलं काम”




(नौकरी करता करता बनला उद्योजक आणि बेकार युवकांना दिली नौकरी)

      अंगावरच्या कपड्यानुसार गाव सोडलं. पुण्यात आला. शिक्षणाची पदवी सोबत होती. मग सुरू झालं या दारावरून त्या दारावर नौकरी मागण. पण कोणी नौकरी देत नव्हत. बीसीए ची पदवी असूनही म्हणावी तशी नौकरी मिळाली नाही. मग फायनान्स मध्ये एका कंपनीत काम मिळालं. मिळालेल्या संधीच सोन करायचं म्हणून पडेल ते काम करायला सुरू केली. गावाकडचा गडी असल्यामुळे शारीरीक कंटाळा कधीच नव्हता. मानसिक थोडाफार त्रास व्ह्यायचा पण हार मानली नाही. कामाचा दर्जा सुधारला, नविन गोष्टी शिकून घेतल्या त्यामुळे कंपनीत सर्वजण कौतुक करयला लगले त्यातुनच पुढे पगार वाढ झाली. कंपनीतल्या वरिष्ठ अधिका-यांनी कामाचं कौतुक केलं. त्यामुळे या गड्याचा आत्मविश्वास खूप वाढला. काही दिवसांतच स्वता:च स्थान निर्माण केलं. पण सतत वाटू लागलं की आपण काम करतोय पण आपल्या मनाला त्या कामातून समाधान मिळतं नाही. आपण स्वता:चा व्यवसाय सुरु करावा. आसं मनातल्या मनात वाटत होतं. पण लगेच धाडस करता येत नव्हत. घरी चर्चा केली पण मार्ग निघत नव्हता. तसचं काही दिवस काम करत राहिले. आता मात्र पगार वाढून लाखरूपाया पर्यंत पोहचला होता. त्यामुळे घरच्याना वाटत होतं की नौकरी सोडू नये कारण सर्व काही व्यवस्थित झालं आहे.
      पण त्यांचं मन त्यांना काय स्वत बसू देत नव्हत. मग ठरवलं इव्हेंट कंपनी सुरू करायची आणि एका राहात्या खॊलीत दोघांना बरोबर घॆऊन टोटल इव्हेंट कंपनीची स्थापना २०१४ मध्ये केली. आज कंपनीचा करोडो रुपायात टर्नओव्हर आहे आणि १०० पेक्षा जास्त युवकांच्या  हाताला प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष काम मिळवून दिलयं ते गणेश वाघमारे यांनी. आज ते टोटल इव्हेंट कंपनी च्या माध्यमातून बॅंकीग, फायनान्स, आयटी, एज्युकेशन व अनेक कॉर्पोरेट कंपनीच इव्हेटं मॅनेजमेन्टंच काम करतात. शिवाय आपल्याकडे लग्नाचं व्यवस्थापन करूनही करोडपती होता येत हेच गणेश वाघमारेनी त्यांच्या कामातून दाखवून दिले आहे. आपल्या सर्वांना आश्चर्य वाटलं की हे पाच वर्षात कसं शक्य झालं. तर ते म्हणतात, “कोणतीही आर्थिक मदत नव्हती, उद्योग सुरु केला त्यावेळी स्वत:हा जवळ सेव्हीग्जं केलेले थोडेफार पैसे होते. त्याच्याच जिवावर आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि आज ह्या व्यवसायात पाय रोवला आहे”.
      कोणत्याही प्रकारचा कोणाचाही आधार नसताना एखाद्या उद्योगात उतरून आणि तो यशस्वी करून दाखवण खूप कठीण काम आहे. पण गणेश वाघमारेंनी हे आत्मविश्वास, चिकाटी, संवाद कौशल्य, व्यावाहारिक चातुर्य, सातत्य व सहकार्याची भावना याच्या जोरावर हे सिध्द करून दाखलं की तुम्ही कोणताही व्यवसाय निवडून स्वता:च्या हिमत्तीवर यशस्वी करु शकता. आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याला उत्तर म्हणजे तरुणांनी आपापल्या परीने रोजगार निर्माण करावा व बेकार तरूणांना रोजगार द्यावा. तरच बेरोजगारी कमी होईल.
      यासंर्दभात गणेश वाघमारे म्हणतात की, “युवकांनी या व्यवसायात उतरावे, अडचणीच्या वेळी आम्ही मदत निश्चित करू. सुरवातील वेन्डर म्हणूनही आमच्यासोबत काम करता येईल, त्याच्यासाठी मार्गदर्शन करू”. “या व्यवसायात स्टेज व्यवस्थापनापासून ते सेलिब्रिटी मॅनेज करण्यापर्यंतच काम असतं. साध्या जेवणापासून ते पंचतारकंती पंचपक्कान्न पर्यंत सेवा पुरवाव्या लागतात. छोटा मंडप ते भव्यदिव्य पेन्डॉल उभा करण्यासाठी खूप काम असतं. मनोरंजनाचे विविध कार्यक्रम, सांस्कृतिक, राजकिय, कॉर्पोरेट आणि इतरही अनेक प्रकारचं इव्हेंट मॅनेजमेन्ट करण्यासाठी येत्या काळात खूप मोठी संधी आहे. हे काम करण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक आहे. ज्यांच्याकड कौशल्य आहे ते खूप चांगल्यापध्दतीने काम करून अर्थार्जन करू शकतात.” असं वाघमारेनी सांगितलं. ज्यांना इंव्हेटं व्यवस्थापनाची आवड आहे त्यांनी त्यांच्या आवडीचं रुपांतर व्यवसायात करून नविन वाट निर्माण करण्यास तयार व्हावे.       

ज्ञानेश्वर जाधवर

(यसन कादंबरीचे लेखक-९६५७९८५९३५) 


सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts