Monday, March 30, 2020

खंत वाटतेय!




         काल सकाळी किराणा आणि भाजीपाला आणण्यासाठी बाजारात गेलो होतो. खरं तर १० दिवसापासून बाहेर गेलोच नव्हतं. भाजीपाला संपला होता. आणि काही इतर सामान हि आवश्यक होत. पण तोंडाला रुमाल बांधून गेलो.  रस्त्यावर गेल्यावर माणसांची गर्दी जाणवली. तस बाजारात नेहमीच गर्दी असते. पण अगदी दुपारची वेळ होती. मला वाटलं गर्दी नसेल पण माणस बिंदास फिरताना दिसली.
        एक कोप-यावरच्या भाजीवाल्याकडून भाजीपाला घेतला. आणि किराणा दुकानात सामान घेण्यासाठी गेलो. माझ्यापुढ एक ४५-ते ५० वर्षाची बाई दुकानदारांला हात जोडत होती.
“ दुकानदार मला पाच किलो ज्वारी आणि एक तेलाची पिशवी द्या.”
त्या बाईने असं म्हनाताचा दुकानदार जोरात ओरडला, “ ओ बाई माग व्हा , मला गिर-हाईक करू द्या . तुम्हाला कालच हाकलून दिलं होत ना , आज पुन्हा आलात तुम्ही? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? उधार माल मिळणार नाही.”
असं म्हणून त्या दुकानदाराने त्या बाईला बाजूला जायाला सांगितल. आणि मला विचारलं काय काय पाहिजे . मग मला पाहिजे ते सामान त्यांन बाधून दिल. सामान घेत असताना त्या बाईकडे माझं दोन-तीन वेळा लक्ष गेलं.
तसा तो दुकानदार म्हणाला, “ आहो, ती बाई दोन दिवसापासून येतेय आणि म्हणतेय कि कामाच पैसे आले कि देते. आता मला सांगा सध्याच्या परीस्थित कोण कोणला पैसं देणार आहे.”
मी त्या दुकानादारां कडे बघत मान डोलावली आणि माझ्या   सामानांच पैसे दिले. आणि बाहेर आलो. थोडावेळ त्या मावशी कडे बघितलं . ती रडू लागली होती. हे बघून मला राहवलं नाही.
जवळ जाऊन त्यांना विचारलं, “ मावशी काय झालाय?”  मावशीने पदराने डोळं पुसत, “काय नाय बाबा , सगळीकडून गरीबाच मरण हाय, दोन दिसापासून सैपाक केला नाय, आन उधार बी कोन देत नाय.”
त्यांच रडण आणि केविलवाणा तोंड बघून कसतरीच वाटलं. परत त्यांना विचारलं , “कुठं राहाताय?” मग त्यांनी हात करून पलीकडे बांधकाम चालू असणारी इमारात दाखवली. मला त्यांचा विश्वास वाटला म्हणून त्यांना पाच किलो ज्वारी आणि एक तेलाची पिशवी घेऊन दिली. आणि त्यांच्या सोबत त्या इमारती कडे चालू लागलो.
 चालत असताना त्यांनी मला विचारलं, “ भाऊ तुम्ही कोणत्या गावाचं?” माझ्याहातातील सामानाची पिशवी सावरत , “बार्शी , सोलापूर”.
लगेच त्या म्हणाल्या, “ आताव, मग तुम्ही गेला नाव्हुत  गावाकडं करुणामुळं. ”
 मी , “नाही”. 
त्या थोड्याश्या काळजीच्या स्वरात , “ आवं जायचं कि गावाकड आई-बाप काळजी करत असत्याल, आवं आम्हाला जायचं व्हतं पण ते बिल्डींग चा मालक कडू मेला , काम करून घेतलय आन पैसे दिना झालाय. आज देतो उद्या देतो असंच म्हणतोय. आता तुम्हीच सांगा कसं करायचं? हाताला काम नाय. काम केलेली मजुरी मिळाली नाय. व्हता तेवढा शिल्लक पैसा संपलाय. आन वरून तो मालक म्हणतोय तुम्ही गावाकडं जावा. दोन महिनं काम बंद राहाणार हाय.  आन गावाकडं जायचं म्हणालं तर ते लॉक डाऊन का फोक्दाउन झालय. आता तुम्हीच सांगा आम्हा गरिबांन काय फाशी घ्यायची का?
त्यांच बोलन ऐकूण कोड्यात पडलो होतो. त्यांच्याकडे बघून फक्त हो हो म्हणत होतो.  तो पर्यंत त्यांच घर आलं होत.  त्यांनी मला घरा कडे बोलावलं पण मी गेलो नाही. बांधकाम चालू असणा-या इमारतीच्या खाली पत्र्याच शेड मारलेल तेच त्यांच घर होत.
तिथून येताना त्यांनीच माझा नंबर घेतला आणि म्हणाल्या, “ भाऊ , कामाच पैसं आले कि फोन करून तुम्हाला देईल.”  मी त्यांना म्हणत होतो राहू द्या मावशी त्याची काही गरज नाही.  
       असं म्हणून मी तिथून घरी आलों. मनातील विचार काही केल्या जात नव्हता. वाटायचं कि आपण जास्त मदत करायला पाहिजे होती. काय काय करायला पाहिजे या विचारात मी दोन तिन मित्रांना हा प्रसंग सांगितला. आम्ही मिळून त्यांना एक महीन्याच राशेन भरून द्यायचं ठरवलं.
      मग मी दुस-या दिवशी संध्याकाळी  त्या शेडकडे गेलो तर इमारतीच्या खाली रिकामं होत . ना तिथ पत्र्याच शेड होतं ना त्या मावशी दिसत होत्या. गेटवर असणा-या वाचमनला  विचारलं कि कुठ गेलेत?
तर तो वाचमन म्हणाला, “ पाहाटच गेली सारी गावाला” मी त्याच्याकडे बघत , “कशी गेलीत?”
त्यांन त्याच्या तोंडावर चा रुमाल सारत , “ गेली असत्याल चालत?”
      वाचमनच हे उत्तर ऐकूण मनाला खंत वाटली. या जगात कोणतीही आपत्ती आली  कि त्याची पहिली झळ कष्टकरी मजूर वर्गाला बसतेय. कोरोनाच्या साथीत सुद्धा हेच घडतंय. शहरातील  नौकरदार, व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक सावरतील कसेही पण आज हातावरच पोट असणारा मजूर वर्ग उद्या  जिवंत राहाण्याच्या अपेक्षेने  आज उपाशीच दोन-तीनेशे किलोमीटर पायी चालत त्यांच्या मूळ गावाकडं  निघालाय. कारण त्याना विश्वास वाटतोय कि त्यांचा गाव त्यांना कसही असेल तरी आईसारखा कुशीत घेणार आहे.          
      
ज्ञानेश्वर जाधवर (९६५७९८५९३५)        

Thursday, March 26, 2020

“मानवी नात्याची मळणी”












“असा सांगावा काय म्हणून धाडला असल वं? माज्या लेकरावर काई आळ तर आला नसेल ?”
“आगं, दिवस कसेल हायीत बागत न्हाईस का ! असल्या दिसांत तेवढच घारातल खाणार एक तोंड कमी करावं आसं वाटलं आसंल त्यांला”
“म्हंजी तीकडबी असलीच हालत आसलं का?”
“सामध्या दुनियेत असली हालत झालीया, तू वांजर खेड्याच काय घिऊन बसलीस!”
शेवंता काळजीच्या आवाजात म्हाणाली,
“ तसं आसल तर आणावा पुतळाला.”

हे संवाद चुंबळ या पहिल्या कथेतील आहेत.  आणि इथून या “मळणी” ची सुरवात होते.  मराठी साहित्या मध्ये मानवी भाव-भावनांच्या चेह-याच्या पलिकडे एक बुध्दीमान किंवा दुसरा साधरण माणूस जगण्यासाठी धडपड करत असतो. जर तो गावातील असेल तर मग अनेक पारंपारिक पध्दती त्याच्या जगण्यात येतात. त्याची असणारी नाती-गोती जी त्याला जगताना कधी मदत करतात तर कधी जगन नकोसं करून टाकतात. हे ओळखून लिखाण करणा-यां लेखंकापैकी अग्रण्य नाव म्हंणजे जेष्ठ साहित्यिक रा.रं बोराडे. हे सांगण्याच कारण म्हणजे नुकतंच त्यांचा मळणी हा कथा संग्रह वाचला.
       या कथासंग्राहात एकूण १६ कथा आहेत. नवव्या क्रमांकावर असणारी मळणी कथा जे संग्राहाला शिर्षक आहे.  व्याक्तीच्या जन्माबरोबर त्याची नाती जन्म घेतात आणि त्याला इच्छा असो वा नसो त्याच्या वयाबरोबर ती वाढत जातात. हि नाती त्याला जोपासावी लागतात. नात्याच्या बंधनात त्याला गुरफटून बसावं लागत. काही वेळेला तर त्याला वैयक्तीक सुखाला पारख व्हावं लागत .  अशावेळी व्यक्ती म्हणून त्याला अस्तित्वच उरत नाही. दुसर्यासाठी जगण एवढच त्याच्या नशिबी येत आणि तोही निमुटपणे हे नशीब जगात असतो . काही वेळेला नात्याची ही बंधन त्याला आपल्याकडे खेचत असतात. अशावेळी त्याच्या मनाची अतिशय ओढाताण होत असते. शेवटी वैयक्तीक सुखाना त्याला दूर कराव लागतं . आपल्या इच्छाआकांक्षा आपल्या पायाखाली तुडवाव्या लागतात. या इच्छा आकांक्षाची त्याला मळणी करावी लागते. हेच आजही प्रत्येकाच्या आयुष्यात  घडत आहे .    
     या  संग्रहातील प्रत्येक कथा नात्यातील मर्म दाखवते. जे मर्म जगताना प्रत्येक जण अनुभवत असतो. वाचताना असं वाटत कि आपण तो प्रसंग जगतच आहोत. काही वेळेला अंगावर काटे उभा राहातात तर काही वेळेला रडायला येत. तर कुठ हसायलाही येत. काही  कथेतील पात्राबद्दल कीव वाटते तर काहीचा राग येतो. हे सर्व जणूकाही तुमच्या माझ्यातील आहे असचं वाटत राहत.
तर सध्याच्या या काळात आपणास गुंतवून ठेवून आधार देणारा एक उत्तम कथा सग्रह “मळणी”.

कथा संग्रह : मळणी
लेखक: रा.रं. बोराडे
प्रकाशन:  साकेत प्रकाशन, औरंगाबाद
टिपण
ज्ञानेश्वर जाधवर   

कोरोना: लॉकडाऊन मुळे अडकलेल्या ऊसतोड मजरुरांना अखेर दिलासा


दर वर्षी साधारत: गुडीपाडाव्या पर्यंत किंवा त्याच्या  एक -दोन आठवडे मागे किंवा पुढे साखर कारखाने बंद होतात. आणि ऊसतोड करणारे मजूर गावाकडे जातात. या वर्षी नेमक काही कारखाने बंध होण्यास आणि करोना रोगाची साथ पसरण्यास सुरु  झालं. त्यामुळे ज्या काराखान्याचा पट्टा पडलाय त्या कारखान्यावरील मजुरांना सध्या काहिच काम नाही. मग कोपिवर बसून करणार काय. जवळ अन्न धान्य संपल आहे. बैलांना चारण्यासाठी वाढ व वैरण नाही. हाताला काम नाही. मग हे मजूर बसून करणार काय ? हे वास्तव मोठं चिंता वाढवणार आहे.
             एक लाखांहून अधिक ऊसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागात अडकले असून कोरोना व्हायरस व लॉककडाऊनमुळे त्यांच्यासमोर गंभीर प्रश्न उभे राहिले होते, याच पार्श्वभूमीवर फोन व विविध माध्यमातून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना अनेकांनी याबाबत विनंत्या व तक्रारी केल्या होत्या. मग सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांनी या मजुरांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे  बंद झालेल्या कारखान्यातील ऊसतोड मजूर  स्वगृही परतन्यास काल पासून सुरवात झाली. आणि चालू कारखान्यातील ऊसतोड मजुरांची आहेत तिथेच भोजन, निवारा व आरोग्यविषयक व्यवस्था होणार; असं उपमुख्यमंत्री  अजितदादा पवारांनी सांगितल आहे.
        या निर्णयानुसार बीड , नगर जिल्ह्यासह अन्य भागातील असंख्य ऊसतोड कामगार उसतोडणीला पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भागासह इतरत्र अडकलेले आहेत, ज्यांचे कारखाने बंद झालेले आहेत अशा कामगारांना कारखान्याच्या  एम. डी. किंवा शेतकी अधिका-याचे पत्र घेऊन स्वगृही परतता येणार आहे.
       तसेच ज्या कारखान्यांचा गळीत हंगाम बाकी आहे तेथील ऊसतोड कामगारांची निवारा, आरोग्य तपासणी व उदरनिर्वाहासाठी आवश्यक अन्न-धान्य आदी सुविधा कारखाना प्रशासन व राज्य सरकारकडून करण्यात येणार आहेत.
        उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ निर्णय घेऊन पुण्याचे विभागीय आयुक्त श्री. म्हैसकर यांच्याशी संपर्क करून हा निर्णय घेतला याबाबत या कामगारांना घरी परततांना कोठेही अडवले जाणार नाही याबाबत पोलीस महासंचालक यांच्याकडून निर्देश दिले जाणार आहेत तर  चालू कारखान्यावर कामगार यांची सोय करण्याबाबत  साखर आयुक्त यांना याबाबत निर्देशित केले जात असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
          कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव व उदरनिर्वाह अशा समस्या बाबत असंघटित व असुरक्षित असलेल्या ऊसतोड कामगारांची संख्या लक्षात घेता हा घेतलेला निर्णय मजुरांच्या हिताचा आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे अभार !!!

ज्ञानेश्वर जाधवर (९६५७९८५९३५)

Tuesday, December 10, 2019

“शेवटची रक्ताळलेली जिलबी”





त्या वक्ताला लय वंगाळ घडलं. आमच्या गवचा धनाप्पा लय भला माणूस पण परिस्थितीन गांजला. लेकाला आन सुनाला घिऊन कारखाना करत व्हता. धनाप्पान जल्मभर कारखाना केल्याला. त्यातूनच त्यान तीन पोरीची लग्न करून दिल्याली. शेवटचा पोरगा व्हता. त्याच बी लगीन झाल्याल. त्याला तीन वरसाच एक पोरग हाय. त्याच नाव प्रविण ठिवल्याल पन लाडान त्याला प-या म्हणायची.  लेकाच लगीन झाल्यापासून ऊस तोडायच बंद केलं व्हत. पण धनाप्पाच्या बायूकच्या पोटाच आपरेशन झालं. त्याला लय खर्च आला. दवाखान्यासाठी कर्ज घेतलं. ते फॆडण्यासाठी उतारत्या वयात लेकाला आन सुनाला संग घिऊन ऊस तोडायला गाडी लावली.
दररोजच्या प्रमान त्या दिसीबी लवकर उठून फडात गेली. धनाप्पाला वयामुळं काम व्हत नव्हतं पण बळचं आंगात ऊसन आवसान आनून काम करत व्हतं. त्या दिशी बायकून लेकाला आन सुनाला आवडतय म्हनून वांग्याच भरीत करून चिरगुटात भाकरी बांदून दिल्या. नातासाठी दूध गरम करून बाटलीत भरून दिल्यालं. फडात आल्या आल्या धनाप्पान चांगली पात धरून ऊस तोडायला सुरू केलं. लेक बी तोडू लागत व्हता. दोघानी भराभरा गाडीभर ऊस तोडला. पाठीमागून सुन मोळ्या बांधत व्हती. आन ऊसाच वाड्याच भेळ बाजूला काडून ठिवीत व्हती. ऊस तोडून झाला की सारीजन राहिल्याल्या मोळ्या बांधायची. मोळ्या बांधून झाल्यावर सुनबाई तान्या प-याला घिऊन आडूसा बघून पाजू लागली. सासून दिलेल दूध बी प-याला पाजलं. तवर बाप लेकांनी ऊसाची गाडी भरली. दिस आता टक-यावर आला व्हता. जेवायला गाडीतच घिऊ असं म्हणून गाडी हाणायला सुरू केलं. धनप्पाचा लेक म्होरल्या तोडांला बसून ऊसान भरल्याली गाडी हाकाया लागला. फडातून गाडी रस्त्याला लागली की सुनबाईन चिरगुटातील भाक-या सोडल्या. आज सासून वांग्याच भरीत दिलं व्हतं. लय आप्रूप वाटाया लागलं म्हणून म्हनाली,
“ आव आज बघा तुमच्या मायन तुम्हांला आवडतय म्हणून वांग्याच भरीत दिलय”
“ तुला नाय काय आवडत? औ,,,,”
“मला आवडतय पन तुमच्या एवढ नाय, पन जाऊ द्या मायचा लयच जिव हाय बघा तुमच्यावर”
“ आग किती केलं तरी माय हाय ती माझी”
       असं बोलत बोलत तिन सा-यांस्नी भाकरी आन त्याच्या वर वांग्याच भरित दिलं. धनाप्पा गाडीच्या मागच्या बाजूला बसून हातावर भाकर घिऊन येना-या जाना-या वाहानाकडं बघून घास तोंडात कोंबत व्हता. लेकांन बी खायाला सुरू केलं. जर गाडी पळाया लागली तर मध्येच बैलाला दापायचा आन यसन वडायचा. असं करता करता गाडी आता गावाच्या कडाला आली. कोप-यावरच हाटेल बगून लगेच बारक्या प-यान आई कडं बघत,
“आयंव मला दिलबी (जिलेबी) खायचीय”
“ कुथं दिसतीय माझ्या सोन्याला”
हात त्या हाटेलाकडं करत “तोक त्या कोपल्यावल”
जस गाडी कोपरा वलांडून पुढ चालली तसं प-या मोठ्यान वरडाया लागला. आई त्याला गप बसवित व्हती पण तो काय गप बसत नव्हता. आता मातर तो पाय खोडून खोडून रडायाला लागला.
“आयव.......... SSSSSSS..आयवSSSSS, मला दिलबी खायचीय”
“आपून पुन्हा घिऊ, आज ऊशील झालाय”
“नाय मला आजच, घ्यायचीय”
हा आवाज ऎकून प-याच्या बापान झपकन एक रटा मारला तसा प-या जोरात रडाया लागला. हे बघून धनाप्पाला काय राहवलं नाय.
“आर लेकराला मारत असत्यात व्ह्य? त्या मोहरल्या कोप-यावर गाडी थांबव”
“आव सारख लेकराच लाड पुरवून वौताग आलाय नुसता? नाय खाल्ली जिलबी एकांद्यादिसी म्हंजी काय मरतय काय ?”
“आर बट्या तसं नसतय, लेकराचा नाद असतोय, थांबव गाडी म्या घिऊन येतो, माझ्याकड हायती इसीक रुपये”
मग हाटेला म्होरं गाडी थांबवली. धनाप्पा खाली उतरलं आन पावशेर जिलबी घिऊन आलं. गाडीवर चडताच नातवाच्या हातात पुढा दिला. लगेच प-यान पुढा सोडला आन जिलबीचा एक येडा घिऊन,
“आय... तू खा.. धल.. ह्यो चांगला हाय. धल.. धल की”
“बाबा तुला धल.. ह्यो मोता येला हाय, घे”
“आन हे अप्पाला... आप्पा धल्ला तुम्हाला”
प-यानं सा-यास्नी एक एक येडा दिला अन त्यान एक हातात घेतला. खात खात आई कड बघत..
“अप्पाच चांगल हायती”
“आम्ही बी चांगल हाव कीर.. तू बी हाय, पन बाबा थोलाच चांगला हाय”
“ आजून खा”
“ नाय, लाहूदी सांच्याला खायाला, आता बास मला”
नातान दिलेला येडा तोडांत घातला आन धनाप्पा आतल्या आत हसतबी आन रडतबी व्हता. आता गाडी कारखान्याच्या जवळ आली व्हती. पुल वलांडला की कारखानाच व्हता. पण पुलाच्या आगुदर मोठ वळण व्हतं. त्याला उतार बी व्हता. नेमक त्या वळणावर गाडी आली आन मागून ऊसान भरलेला टरक आला. पुढच्या बाजून काही वाहन व्हती. चार पाच ऊसाच्या गाड्या म्होर चालत व्हत्या. मागून आल्याला टरक वेगात व्हता. पुढून आल्याल्या वाहानाला धडक बसलं म्हनून टरकवाल्यान टरक डाव्या बाजूला वळवली तशी धनाप्पाच्य़ा गाडीला धडक बसली. गाडी जाग्यावर पलटी झाली. पुढच्या दोन तीन गाड्या बी आदाळल्या. पण धनाप्पाच्या गाडी मातर दहा मिटर तरी घसरत गेली. बैलांनी मातर मोठ्य़ान डरकाळी फोड्ली. टाहोफोडून माणसं रडतात तसं दोन्ही बैलं मार लागल्या लागल्या वरडली. बैलाला बी लय मार लागला. लेक आन सुन टरकाच्या मागच्या चाकाखाली सापडली. आन चेद्यामेंध्या झाली. धनाप्पाच्या पायावरून ऊसाची गाडी गेली. दोन्ही पायच तुकड पडलं. नातू मातर लांब जाऊन पडला व्हता. त्याच्या हाता जिलेबीचा येडा तसाच व्हता. त्याच्या लेकाच्या तोंडात जिलेबी व्हती. सुनाचा हात खरकटाच व्हता. उरलेली भाकर आन जिलेबीच तुकडं रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेलं व्हतं. अपघात झाल्या झाल्या कुनालाच काय सुधराना. बाकीच्या ऊसतोड गाडीवानानी गाड्या बाजूला घेतल्या. धनाप्पाला बाहेर काढायाला धावून आली. तवर पोलीस आले. टरक ड्रायव्हरला पकडलं पण त्याच बी पायं मोडलं व्हतं. धनाप्पाला आन त्याच्या लेका सुनाला नातासोबत दवाखान्यात नेहलं. दोन चार दिसांन धनाप्पा सुद्धीवर आल्यावर कळंल की लेक आन सुन जाग्यावरच मेली. नातू जिवंत हाय. पण मुका मार लागला व्हता. धनाप्पाच पाय तर मोडला व्हताच शिवाय मनक्याला मार लागला व्हता. मनक्यातली नस तुटल्यामुळं तो कवाच जोडला जावू शकनार नव्हता. कोन सांगायच पुण्याच्या नायतर मुंबईच्या दवाखान्यात जोडला जातोय पण तो  पाच सहा लाख रूपयेचा खर्च कोन करणार? कुठून आननार एवढा पैसा.? पहिलचं बायकूच्या दवाखान्याच कर्ज फॆडता फॆडता नाकी नव आलं व्हतं.  आन आता हे वाढून ठेवल्यालं. नातू मातर शुद्दीवर आला व्हता. हातपायानी धडधाकट व्हता. धनाप्पाला त्याचच कौतुक वाटायचं. एवढ्या मोठ्या आपघातातून लेकरू वाचलय. म्हणतात ना देव तारी त्याला कोन मारी. तवा पासून धनाप्पा गावातच पांगूळ गाड्यावरून दोन शेरडं हातात धरून ५५ वर्षाच्या बायकूच्या आधारावर नातवासाठी जिव मुठित धरून जगतोय.  स्वता:च्या जिवापरिस नाताला जपतोय. नातानं कवा जिलबी मागितली तर धन्नाप्पा आतल्या आत रडतोय. पण जिलबी खायचं नाव घेत नाय.



हा प्रसंग यसन या कादंबरीतील आहे.

Thursday, November 21, 2019

“बुध्द की युध्द ” असं मांडणारा कवी “जयप्रभू”






“बुध्द की युध्द ” असं मांडणारा कवी “जयप्रभू”

     गोव्यात गेल्यावर जयप्रभू नावाच्या एक प्रमाणिक शिक्षकाची ओळख झाली. ओळख झाल्यावर त्यांनी मला त्यांचे दोन कविता संग्रह दिले ते म्हणजे “लॉग आऊट” व “ठळक नोंदी आणि इतर कविता”. घरी परत आल्यावर रिकाम्या वेळेत सहज त्यांचा ठळक नोंदी आणि इतर कविता हा संग्रह चाळला आणि आवकच झालो. कारण ज्या माणसाने अत्यंत शांतपणे आमचा पाहुणचार केला. बोलताना साधेपणा व कमीत कमी शब्दात मत व्यक्त करणारे जयप्रभू हे कवितेतून सभोवतालच्या एकंदरित परिस्थिती बद्द्ल त्यांचा अस्वस्थपणा अत्यंत मार्मिकपणे टिपतात.  
     या कविता संग्रहात ३९ कविता आहेत. संग्राहाची सुरवात ही “विठ्याची सैर आणि रूक्मिणीचा एकांतवास” या कवितेने होते. विठ्ठल पसार होतो आणि रूक्मिणी शोधायला जाते. पण लवकर काही विठ्ठल सापडत नाही. मग शेवटी वैतागून रुक्मिणी परत येते तर विठठल तिच्या अगोदर गाभा-यात असतो. हे प्रतिकात्म माणसाच जगण आणि जगाच्या शोध घेणं या कवितेतून मनापर्यंत जात. यातील काही कविता थेट काळजाला भिडतात. ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार भिडणा-या कविता आहेत. ज्यांनी विनाअनुदानित, खाजगी कॉलेज, व अनुदानितवर तासिकेवर काम केलं आहे किंवा करत आहेत. त्यांना नक्कीच अस्वस्थ करणारी कविता म्हणजे –
“कवच”
पगार कधी होणार? तिचा जिवघेणा प्रश्न
आणि हॅंग झालेल्या कंप्युटरसारखा असतो तिच्या समोर उभा.
मागणी तसा पुरवठा हे तत्व लागू होत नाही तिच्या आयुष्यात.
तिने केलेल्या कोणत्याही मागणीचा पुरवठा
पुरा करू शकत नाही
माझ्या जगण्यातील पंचेचाळीस मिनिटाचा काटा
तिने सांगितलेल्या वेळेत.
म्हणूनच तिने दिलेली वस्तूंची यादी
छेदत जाते माझे नेटसेटचे कवच आणि
उघडा पडत जातो मी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी
तिच्या पगाराच्या प्रश्नाने.
या कविता वाचल्यानंतर जयप्रभू यांच्या विचारांतील प्राणिकपणा जाणवला. खरं तर हल्ली प्रामाणिक माणसाना जगण खूप अवघड झालय. त्यावेळी कथा, कविता, नाटक, चित्र, संगीत या सारख्या कलाच आधार देतात. असचं जयप्रभूंच्या कविता संग्रह वाचल्यावर भासलं. सर्व काही समजतय पण करता काहीच येत नाही. कारण हाताशी काहीच नाही. अशावेळी मनातल्या मनात कलाकृतीच्या माध्यमातून मनाचीच समजूत घालत आयुष्य जगणारे असंख्य कलाकार आहेत. खरंतर साहित्यीक आणि कलाकारांच्या विचारांचा फायदा हा समाजव्यवस्था उत्तम व्हावी आणि टिकून राहावी याच्यासाठी अपेक्षीत आहे. पण हल्ली तसं होताना दिसत नाही म्हणूनच संवेदनशील व अस्वस्थ असणारा माणूस तडफडतोय जगण्यासाठी. हे सारं वास्तव या कवितासंग्राहातून पुढं आलं आहे.
 “बुध्द की युध्द” या कवितेतून तर असं जाणवतय की खरच आम्ही युध्द करणा-या पिढ्या तयार करत आहोत काय? का बरं आम्ही बुध्द मागणारी माणसं घडवू शकत नाही? आमची शिक्षण व्यवस्था कामचलावू आहे का? कि फक्त संवेदनाहीन कारखुन तयार करणारी प्रणाली बनलीय? या शिक्षणाने आम्हाला माणूसपणाची मूल्य शिकवायची सोडून माणसाला उधवस्त करणारी शस्त्रे हाती घ्यायची शिकवलीत. म्हणून आम्हांला बुध्द नकोय युध्द हवय़ का?. पण युध्दाने पुन्हा एकदा जग नष्ट होईल याचा विचारही शस्त्रे हाती घेणा-यांच्या लक्षात येत नाही का? जगभर आज युध्द हवय असं म्हणा-यांची संख्या वाढताना ही कविता डोळ्यात अंजन घालते.
     खरंतर सर्वच कविता विचार करायला भाग पाडतात. संग्राहाच्या शॆवटी “परंपरेचा कासोटा” ही कविता शेवट करते पण तिथून पुढे विचाराला सुरवात होते . या शेवटच्या ओळी-
“आजही
परंपरेच्या कासोट्याला लोंबकळत
समरस होऊन करताहेत, परिवर्तनाची बात”
-    कवी जयप्रभू (गोवा)

Monday, November 11, 2019

ताडोबा अभयारण्याला “ताडोबा” का म्हणतात?



ताडोबा अभयारण्याला “ताडोबा” का म्हणतात?

डोक्यात खूप वर्षांपासून घोळत असलेल्या प्रश्नाच उत्तर चंद्रपूरला ताडोबा अभयारण्यात गेल्यावर मिळाल. प्रश्न तसा साधाच आहे. ताडोबाला ताडोबा का म्हणतात? याच्या अगोदर खूप लोकांना विचारलं होतं आणि तिथही बाहेर असणा-यानां विचारलं होत पण उत्तर मनाला पटेल असं काही मिळालं नाही. मग आम्ही ज्यावेळी अभयारण्यात फिरत होतो. त्यावेळी आमच्या सोबत असणा-या गाईडला विचारलं तर त्यांन सांगितलं की “ताडोबा हा शब्द ब्रिटिंशांच्या उच्चारातून तयार झाला. म्हणजे त्या जंगलात खूप वर्षांपुर्वी अदिवासी राहायचे. त्या अदिवासीपैकी सुरवातीच्या टोळ्यात तारू नावाचा अदिवासी नेतृत्व करत होता. त्याने अनेक निष्पाप अदिवासींचे जंगली प्राण्यांपासून प्राण वाचवले होते. तो कोणत्याही जंगली प्राण्यापासून टोळीच संरक्षण करायचा. विशेष करून वाघापासून तर अनेक जणांना त्याने वाचवलं होतं. पण एकदा तारूवरच वाघाचा हल्ला झाला. आणि वाघाबरोबर झुंझत असताना तो जखमी झाला. आणि त्या हल्यात तारूचा मुत्यु झाला. अदिवासी समाजात आजही एक प्रथा आहे. जर वाघाच्या हल्ल्यात कोणाचा मृत्यू झाला तर त्याचं स्मारक (समाधी) जंगलात उभा केलं जात आणि नंतर त्या ठिकाणी वर्षाला स्मरण केलं जातं. त्यावेळी तारु हा पालक होता त्यामुळे त्याच्या नावापुढे “बा” हा शब्द जोडण्यात आला. बा म्हणजे मोठा.  मग तारू+बा= तारुबा असा शब्द तयार झाला. आजही  या तारूबाचं छोटसं स्मारक आहे. आज त्याला तिथे मंदिराच स्वरूप दिलं आहे. तिथं दरवर्षी प्रथेप्रमाणे अदिवासींची यात्रा होते. त्यामुळं या जंगलाला तारूबा जंगल असं म्हंटल जायचं.  
    पुढं सतराव्या शतकात ब्रिटीशांनी या जंगलाचा ताबा मिळवला. ब्रिटिंशांना तारूबा हा शब्द उच्चराता येत नव्हता. त्यांनी ताडूबा असं उच्चार केला. पुढं इंग्रजीत तो “TADOBA”  लिहला गेला. पुढं ब्रिटिंशांच्याच कागदपत्रावरून मराठीत हा शब्दा आहे तसा घेताला. आज ताडोबा हा शब्द सर्वांन कडून सर्रास वापरला जाऊ लागला. त्यालाच आपण ताडोबा अभयारण्य असे म्हणतो.  
धन्यवाद मंगेश सर या अत्यंत महत्वाच्या माहिती बद्दल.
धन्यवाद राजाभाऊ आणि उषाताई... आपण खूप व्यस्त वेळातून ताडोबा चा फेरफटका घडवला.


सोयाबीनचे बियाणे न उगवल्यामुळे शॆतक-यांना आर्थिक भुर्दंड

       या वर्षी अवकाळी पाऊस मे महिन्याच्या शॆवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला. अवकाळी पाऊस बंद होताच मा...

Popular Posts